Malegaon News : गिरणा नदीला आलेल्या पूरपाण्यामुळे मालेगावसह कसमादेतील विविध पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळाला आहे. गिरणा डाव्या कालव्यातून मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणारा तळवाडे तलाव भरुन घेतला जात आहे.
८७ दशलक्ष घनफुट क्षमतेच्या तलावात ६१ दशलक्ष घनफुट जलसाठा (७० टक्के) झाला आहे. तयाशिवाय दाभाडीसह बारागाव पाणीपुरवठा योजनेचा तलावही भरण्यात येत आहे. त्यामुळे मालेगावकराना काहीसा दिलासा मिळाला आहे.
पावसाने ओढ दिल्याने यावर्षी गिरणेला पावसाळा सुरु झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यानंतर पहिला पुर आला. चणकापूर व पुनंद धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने गिरणेचे पुर पाणी विविध पाणीपुरवठा योजनांना संजीवनी देणारे ठरले आहे.
पुरपाण्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे असलेल्या गिरणा धरणातील जलसाठा वाढण्यास मदत होत आहे. चणकापूर धरणात एक हजार १०५ दशलक्ष घनफूट जलसाठा झाला असून धरण ४५ टक्के भरले आहे.
पुनदमधील जलसाठा ५९२ दशलक्ष घनफुटावर गेला आहे. पुनद देखील ४५ टक्के भरले आहे. धरण पाणलोट क्षेत्रांमध्ये पाऊस रुसल्याने मालेगावसह विविध पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्या होत्या. शहरात २७ जुलैपासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तळवाडे तलाव पूर्ण भरल्यास व गिरणा धरणातील जलसाठा वाढल्यास पुन्हा दोन दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लिकेजमुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय
मालेगावला चणकापूर बरोबरच गिरणा धरणातून देखील पाणीपुरवठा केला जातो. गिरणा धरणातून थेट जलवाहिनीद्वारे येथील जलकुंभात पाणी येते. चाळीसगाव फाट्यानजीक पंपिंग स्टेशनजवळ दुपारी अडीचच्या सुमारास जलवाहिनी लिक झाल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. पाणीपुरवठा विभागाने तत्काळ दुरुस्तीचे काम सुरु केले. पंपिंग बंद केल्याने शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेवर परिणाम झाला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.