Goat Milk : निरोगी आयुष्यासाठी घ्या शेळीचे दूध

Healthy Goat Milk : शेळीचे दूध लवकर आणि चांगले पचते. पोटातील आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. शरीराला अनेक प्रकारचे उपयुक्त अन्नघटक संतुलित प्रमाणात मिळतात.
Agrowon
Goat MilkAgrowon

डॉ. भास्कर गायकवाड

Goat Milk Benefits : शेळीचे दूध लवकर आणि चांगले पचते. पोटातील आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. शरीराला अनेक प्रकारचे उपयुक्त अन्नघटक संतुलित प्रमाणात मिळतात. त्यामुळे शरीरातील सर्व पेशी चांगल्या राहून प्रतिकारक्षमता वाढते. त्यामुळे मानवाला निरोगी आयुष्य जगता येते.

दुधाला पूर्ण अन्न संबोधले जाते. अर्थात, दूध म्हटल्यानंतर आपल्याला फक्त गायीचे दूध किंवा म्हशीचे दूध आठवते. खरं तर हजारो वर्षांपासून शेळीच्या दुधाचा वापर आपल्या आहारामध्ये केला जात होता. गरीब समाज, अल्पभूधारक, जिरायती भागातील शेतकरी यांना सहज सोप्या पद्धतीने शेळीचे दूध उपलब्ध होत होते. पाहुणे घरी आल्यानंतर चहा टाकल्यानंतर पटकन जाऊन शेळीचे दूध आणून त्याचा चहा केला जात होता. परंतु धवलक्रांतीनंतर म्हणजेच १९७० च्या दशकानंतर शेळीचे दूध वापरामध्ये कमी होऊ लागले. अनेकदा घरी शेळीचे दूधही गायीच्या दुधामध्ये मिसळून ते डेअरीला देऊ लागले. हळूहळू शेतकऱ्यांकडील दुधाच्या शेळ्या कमी झाल्या. शेळीचे दूध सहजपणे उपलब्ध होत नाही. परंतु समाज आरोग्याचा विचार करून अन्नपदार्थांचे सेवन करण्याचा प्रयत्न करू लागल्यानंतर अनेक बाबी पुढे येत आहेत. यामध्ये शेळीचे दूधही मागे राहिले नसून, आज शेळीचे दूध १०० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत प्रतिलिटर या दराने विकू लागले आहे.

शेळीच्या दुधाचे हे दर बघितल्यानंतर मनात विचार आला, की खरंच शेळीचे दूध एवढे महाग का आहे? शेळीच्या दुधामध्ये असे काय आहे की ज्याचे उत्तम आरोग्यासाठी सेवन करा, असे सांगितले जाते. धवलक्रांती झाली ती अर्थात गायींमुळे. देशी गायींबरोबरच शेळी दुग्ध उत्पादनासाठी मागे पडली. मग अशा परिस्थितीमध्ये शेळीपालन दुग्ध व्यवसायासाठी खरंच फायदेशीर होईल काय? एका गायीपासून जेवढे दूध मिळते त्यासाठी पाच ते दहा शेळ्या पाळाव्या लागतील. मग याचे अर्थशास्त्र जमेल काय? दुग्ध उत्पादनासाठी शेळीपालन व्यवसायाला भविष्यात खरंच चांगले दिवस येतील काय? या सर्वांचा विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. यासाठी पहिला विचार हा केला पाहिजे, की शेळीचे दूध खरोखरच इतर दुधापेक्षा विशेषतः गायीच्या दुधापेक्षा उत्तम आहे काय? तसे असेल तर मग दुग्ध व्यवसायासाठी शेळीपालन हा विषय कशा पद्धतीने पुढे घेऊन जाता येईल, याचे चिंतन-मनन केले पाहिजे.

Agrowon
Goat Milk : शेळीचे दूध आरोग्यदायी का मानले जाते?

गायीच्या दुधापेक्षा शेळीच्या दुधामध्ये ऊर्जा, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने जास्त प्रमाणात असतात तर कर्बोदकामधील महत्त्वाचा घटक म्हणजे लॅक्टोज कमी प्रमाणात असते. शेळीच्या दुधात जीवनसत्त्व अ, क, ड तसेच थायमिन, नायसिन, पायरीडॉक्सिन, कोलीन ही जीवनसत्त्वे जास्त प्रमाणात असतात. तसेच कॅल्शिअम, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, सोडिअम ही खनिजेही गायीच्या दुधापेक्षा शेळीच्या दुधात जास्त प्रमाणात असतात. स्निग्ध पदार्थ जास्त प्रमाणात असली तर त्याचे सूक्ष्मकण असल्यामुळे दुधामध्ये ते एकजीव होतात. गायीच्या दुधाला स्निग्ध पदार्थयुक्त मलई येते तसे शेळीच्या दुधाचे होत नाही. शेळीच्या दुधात प्रथिने जास्त प्रमाणात असले तरी त्यांची एका विशिष्ट प्रकारची शृंखला असल्यामुळे ते पचनासाठी सोपे असतात. त्यांची अत्यंत लहान ते मध्यम प्रकारची  शृंखला असल्यामुळे पचनीय विकरांद्वारे त्यांचे लवकर विघटन होऊन ते शरीराला पूर्णपणे उपलब्ध होतात. गायीचे दुधातील प्रथिने पचायला आठ ते दहा तास लागतात तर शेळीचे दूध फक्त २० ते २५ मिनिटांमध्ये पचते. अनेकांना गायीच्या दुधामुळे पोटाचा त्रास होतो. गायीच्या दुधाचे पचन चांगले होत नसल्यामुळे त्यांना दूध वर्ज्य करावे लागते. अर्थात, हे सर्व आजच्या संकरित गायीच्या दुधाचे परिणाम आहेत, ज्याला आपण ए-१ दूध म्हणतो आणि आपल्याकडील स्थानिक गायीच्या दुधाला ए-२ दूध म्हणतो. शेळीच्या दुधामध्ये प्रथिने जास्त असून ते ए-२ बिटा केसिन, बिटा ग्लोब्युलिन केसिन या प्रकारात असून, त्यातील बिटा केसिन हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. तसेच इम्युनोग्लोबिन हा घटक मानवी दुधापेक्षा शेळीच्या दुधात जास्त प्रमाणात असतो. याचमुळे आईच्या दुधानंतर लहान मुलांना शेळीचे दूध द्यावे, असे आपले पूर्वज सांगत होते.

शेळीच्या दुधातील जलद पचनिय प्रथिने, चांगल्या प्रकारचे स्निग्ध पदार्थ, खनिजे आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आणि लवकर पचणारी असल्यामुळे मुलांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. शेळीच्या दुधामध्ये प्रो-बायोटिक, जीवनसत्त्वे बी-६, बी-१२, जीवनसत्त्व डी, फोलिक अ‍ॅसिड तसेच इतर अ‍ॅमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण चांगले असल्यामुळे लहान मुलांची प्रतिकारक्षमता वाढते. तसेच मेंदूच्या पेशींची चांगली वाढ होऊन बुद्धिमत्ता वाढते. म्हणून लहान मुलांना आईच्या दुधानंतर जो पर्याय आहे तो म्हणजे शेळीचे दूध. लहान मुलेच नाही तर तरुण, वयस्कर व्यक्तींसाठी सुद्धा शेळीचे दूध अत्यंत आरोग्यदायी आढळून आलेले आहे. शेळीच्या दुधात मॅग्नेशिअमचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्तपुरवठा सुरळीत चालू राहतो, रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत. उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या कमी होतात. रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत चालून हृदयविकारासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. शेळीच्या दुधाचे सेवन केल्यामुळे पोटातील पचनीय जिवाणूंची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे पोटाचे विकार कमी होतात. पोट दुखणे, जुलाब होणे, मळमळ होणे, अ‍ॅसिडिटी यांसारख्या समस्या कमी होऊन चिडचिड, नैराश्य, डोके दुखणे यापासून सुटका होते. शेळीच्या दुधामध्ये दाहकताविरोधी गुणधर्म असल्यामुळे तसेच इतर अनेक उपयुक्त घटकांमुळे शारीरिक अनेक व्याधींपासून दूर राहू शकतो.

शेळीच्या दुधाच्या सेवनामुळे शरीरातील इन्शुलीनचे संतुलन राहून मधुमेहापासून संरक्षण मिळते. शेळीच्या दुधामध्ये गायीच्या दुधापेक्षा २७ टक्के जास्त प्रमाणात सेलिनियम असते. विशेषतः सेल्युनो प्रोटिन ज्यामुळे शरीरात विकरांचा स्राव वाढून पेशींचा नाश होण्यापासून संरक्षण होते. त्यामुळे अतिरिक्त पेशी बाहेरून देण्याची गरज पडत नाही. तसेच शेळीचे दूध लवकर पचत असल्यामुळे अनेक उपयुक्त खनिजे आणि जीवनसत्त्वे शरीराला मिळत असतात. शेळीचे दूध दिल्यावर डेंगी झालेली व्यक्ती लवकर बरी होते. आयुर्वेदामध्ये सुद्धा शेळीच्या दुधातून अनेक उपयुक्त अन्नद्रव्ये मिळत असल्यामुळे शरीरातील अनेक प्रकारचे दोष नियंत्रणात राहून निरोगी जीवन जगता येते असा उल्लेख आहे. खरं तर शेळीच्या दुधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे आपल्या पूर्वजांनी सर्व जगाला सांगितले आहे. म्हणूनच संपूर्ण जगामध्ये शेळीच्या दुधाला चांगली मागणी आहे. शेळीचे दूध, दुधापासून बनविलेली पावडर आणि विशेष म्हणजे शेळीच्या दुधापासून बनविलेले चीज याला मोठी मागणी आहे. अर्थात, त्या प्रमाणात उत्पादन मिळत नसल्यामुळे आजही आपण शेळीच्या मौल्यवान अशा दुधापासून दूर आहोत. पुढील काळात मागणी वाढणार आहे, याचा विचार करून दुधासाठी शेळीपालन हा विषय कशाप्रकारे समृद्ध करता येईल, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
................

डॉ. भास्कर गायकवाड - ९८२२५१९२६०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com