Iron Deficiency : लोह कमतरतेची लक्षणे अन् उपाययोजना

Symptoms and Remedies of Iron : पिकातील प्रकाशसंश्‍लेषण, श्‍वासोच्छ्वास व इतर जैवरासायनिक प्रक्रियेमध्ये लोह अन्नद्रव्य महत्त्वाचे आहे. लोह हरितद्रव्यांच्या संश्‍लेषणात आवश्यक घटक आहे.
Iron Nutrient
Iron NutrientAgrowon
Published on
Updated on

Iron Deficiency Symptoms and Remedies : पीकवाढीच्या विविध अवस्थांमध्ये आवश्यक अन्नद्रव्यांपैकी नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर महत्त्वपूर्ण आहे. पीक उत्पादनासाठी आवश्यक असलेले लोह हे एक महत्त्वपूर्ण सूक्ष्म पोषक घटक आहे, जे वनस्पतींच्या शारीरिक आणि जैवरासायनिक प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. लोहाची कमतरता पीक उत्पादन आणि गुणवत्तेत लक्षणीयरीत्या अडथळा आणू शकते. वनस्पतींच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये लोहाचे महत्त्व समजून घेऊन योग्य प्रकारच्या खतांचा वापर करणे हे पिकाची उत्पादकता आणि उत्पादनक्षम वाढ होण्यास मदत करते.

लोह कमतरतेची मुख्य कारणे

माती आणि पाण्याच्या अल्कधर्मी सामू.

चुनखडीयुक्त जमीन.

पाण्यात जास्त प्रमाणात असणारे कार्बोनेट्स आणि बायकार्बोनेट्स.

खतांचा अयोग्य आणि अनियोजित वापर.

जमिनीत वनस्पतींच्या पोषक अन्नद्रव्यांची अनियमित अनुपलब्धता.

Iron Nutrient
Agriculture Technology : लोहाची कमतरता, रोगप्रतिकारक्षमता यातील संबंधाचा झाला उलगडा

कार्य

प्रकाशसंश्‍लेषण, श्‍वासोच्छ्वास व इतर जैवरासायनिक प्रक्रिया यामध्ये महत्त्वाचा सहभाग.

लोह हरितद्रव्यांच्या संश्‍लेषणात आवश्यक घटक आहे. पानांचा हिरवेगारपणा वाढविण्यास मदत करते.

वनस्पतींमध्ये ऑक्सिजनचे वहन करण्यास फायदेशीर.

श्‍वासोच्छ्वासाच्या दरम्यान इलेक्ट्रॉन वाहतूक साखळीमध्ये लोहाचा सहभाग. ज्यामुळे इलेक्ट्रॉनचे हस्तांतर आणि ऊर्जेचे उत्पादन सुलभ होते.

झाडांचे श्‍वसन, अन्ननिर्मिती प्रक्रिया तसेच ऑक्सिडेशन-रिडक्शन प्रक्रियांमध्ये सहभागी घटक.

पानांमधील एकूण लोहाच्या ९० टक्के लोह लायपाप्रोटीन्स क्लोरोप्लास्ट व मायटोकॉड्रीया मेन्ब्रेनशी निगडित असते. पेशीतील एकूण लोहाच्या ७५ टक्के लोह क्लोरोप्लास्टशी निगडित असते.

सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी लोहाची उपलब्धता ही पिकाची वाढ आणि उत्पादनक्षमता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. देशभरातील मातीचे विविध प्रकार आणि सामू पातळी पाहता, चिलेटेड स्वरूपातील फेरसची चांगली विद्राव्यता आणि जलद शोषण यामुळे कमतरता दूर करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. लोहाची योग्य उपलब्धता पिकाची चांगली वाढ, उत्पादन आणि उत्पादकतेसाठी महत्त्वपूर्ण आहे.

कमतरतेची लक्षणे

लोह हे स्थिर आहे. याच्या कमतरतेची लक्षणे पहिल्यांदा नवीन (कोवळ्या) पानांवर क्लोरोसिस म्हणजे शिरा दरम्यान पिवळेपणा दिसतो.

क्लोरोफिल कमी झाल्याने पाने फिकट पांढरी पडतात.

गंभीर कमतरतेच्या वेळी पानांच्या पिवळ्या भागात नेक्रोसिस किंवा उतींची मृत्यू होऊ शकतो, ज्यामुळे तपकिरी, मृत ठिपके तयार होतात.

पिकामध्ये मुळांचा विकास, फुलधारणा व फळधारणा यांवर परिणाम दिसून येतो. यामुळे उत्पादन आणि गुणवत्तेवर परिणाम होतो.

Iron Nutrient
Tree Conservation : वृक्षांना राखी बांधून करूया त्यांचे संवर्धन

पिकामध्ये लोहाचे व्यवस्थापन

चिलेटेड फेरस खत हे लोहाचे एक प्रकारचे खत आहे, जे अन्नद्रव्यांच्या भोवती रासायनिकरीत्या सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थांचे साखळीमय आवरण तयार करते. ज्याला चिलेटिंग एजंट म्हणून ओळखले जाते.

चिलेशन प्रक्रिया, वनस्पती शोषण्यासाठी सहज उपलब्ध असलेल्या स्वरूपात लोह स्थिर करण्यास मदत करते.

प्रक्रिया उपलब्ध स्थितीतील अन्नद्रव्यांचा मातीतील इतर घटकांशी किंवा क्षारांशी प्रतिक्रिया होण्यापासून रोखण्यासाठी केली जाते, ज्यामुळे ते वनस्पतीच्या मुळांना बऱ्याच कालावधीसाठी अन्नद्रव्यांचा पुरवठा होत राहतो.

चिलेटेड फेरस (लोह) प्रकार

फेरस- ईडीटीए (१२ टक्के) याचा वापर फवारणीद्वारे केला जातो. हे चिलेटिंग एजंट, लोह अन्नद्रव्याला मातीतील इतर घटकांसोबत प्रतिक्रिया होण्यापासून प्रतिबंधित करते, ज्यामुळे वनस्पतींद्वारे लोहाचे चांगले शोषण करण्यास मदत करते.

६.५ पेक्षा कमी सामू असणाऱ्या जमिनीसाठी अतिशय उपयुक्त खत आहे. लोहाची कमतरता दूर करते.

जलद विरघळणारे आणि वनस्पतींद्वारे सहजपणे शोषले जाते. पीक वाढीच्या अवस्थेमध्ये ०.५ ते १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून, पाण्यात विरघळून थेट पानांवर फवारणी करावी.

फेरस- डीटीपीए (१० टक्के)

फवारणी आणि ठिबकद्वारे याचा वापर केला जातो. उदासीन ते अल्कधर्मी जमिनीसाठी (७.५ पर्यंत सामू) उपयुक्त असे खत आहे.

हे खत अल्कधर्मी जमिनीत फेरस ईडीटीएपेक्षा अधिक स्थिर; वनस्पतींना लोहाची दीर्घकाळ उपलब्धता सुनिश्‍चित करते.

फेरस ईडीडीएचए (६ टक्के)

याचा विशेषतः ठिबकद्वारे वापर केला जातो. हे खत सर्व प्रकारच्या जमिनींसाठी व मातीच्या सामूच्या, विशेषतः उच्च क्षारीय मातीत (११ पर्यंत सामू) प्रभावी असे खत आहे.

अत्यंत अल्कधर्मी स्थितीत अपवादात्मक स्थिरता आणि लोहाची उपलब्धता प्रदान करते; वनस्पतींना सतत लोह पुरवठा सुनिश्‍चित करते.

हे खत इतर चिलेटेड खतांच्या तुलनेत महाग असतात, परंतु आव्हानात्मक मातीच्या परिस्थितीत फेरस ईडीडीएचएच्या कार्यक्षमतेमुळे आणि परिणामकारकतेमुळे याचा वापर करावा.

०-४३-३० अधिक २ फेरस ईडीटीए

खतामध्ये स्फुरद, पालाश, लोह आहे. याचा सामू ४.४५ आहे.

खताची विद्राव्यता २० अंश सेल्सिअस पाण्याच्या तापमानाला २७० ग्रॅम प्रति लिटर आहे. खताच्या वापरामुळे पानांमध्ये क्लोरोफिल संश्‍लेषणात व पानांमध्ये हिरवेगारपणा वाढवून प्रकाशसंश्‍लेषण प्रक्रियेत मदत करते.

उपलब्ध स्फुरद आणि पालाश मुळांची कार्यक्षम वाढ, भरपूर फुलधारणा व फळधारणा होण्यास मदत करते. आवश्यक प्रमाणात लोहाची उपलब्धता केल्याने क्लोरोसिस म्हणजे पानांच्या शिरांदरम्यानचा भाग पिवळा होणे (केवडा रोग) हे प्रतिबंध करण्यास मदत होते.

चुनखडीयुक्त जमिनीमध्ये लोहाची उपलब्धता वाढविण्यास मदत करते.

वापरण्याची वेळ

चांगल्या वाढीसाठी सुरुवातीच्या अवस्थेत व फुलधारणा ते फळधारणा अवस्थेत लोह युक्त खताचा वापर करावा.

वापरण्याचे प्रमाण

फवारणीसाठी : ५ ते १० ग्रॅम प्रति लिटर

ठिबक किंवा आळवणीसाठी : ५ किलो २०० लिटर पाण्यामध्ये, आठ दिवसांच्या अंतराने दोनदा वापर करावा.

- संजय बिरादार, ८८८८८८२५९१ (लेखक आयसीएल इंडियामध्ये कृषी तज्ज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com