Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाडा पाणी परिषद शुक्रवारी (ता. १३) समन्यायी पाणीवाटपाच्या प्रश्नावर लाक्षणिक उपोषण करणार आहे. परिषदेच्या या भूमिकेला मराठवाड्यातून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.
त्यामुळे पुन्हा मराठवाड्यात जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर समन्यायी पाणीवाटपाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यानिमित्ताने जल आंदोलन उभे करण्याचा इशाराही मराठवाडा पाणी परिषदेने दिला आहे.
मराठवाड्यातील ८७७ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा आताच्या घडीला केवळ ४७ टक्के आहे. त्यातही सर्वाधिक संख्येने असलेल्या लघू, मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा केवळ ३१ टक्क्यांच्या आसपास आहे. नांदेड वगळता इतर एकाही जिल्ह्यात अपेक्षित सरासरी पाऊस झाला नाही. त्यामुळे नदी, नाले कोरडेठाक राहिले. त्यामुळे पाणीसाठाही अपेक्षित झाला नाही.
पाणीसाठ्यांची स्थिती मराठवाड्यातील रब्बी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्षात तरी शासनाने सिंचन अनुशेष निवारणाचा कालबद्ध कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित करणे अपेक्षित होते, परंतु प्रत्यक्षात तसे घडले नाही.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंचनविषयक प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या नावाखाली जुने-नवे आकडे एकत्रित करून फक्त आकडे वाढवून सांगण्यात आले. यामुळे एका अर्थाने जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झाल्याचा आरोप केला आहे.
मराठवाडा पाणी परिषदेच्या मागण्या
समन्याय पाणीवाटप नियमानुसार जायकवाडीत त्वरित पाणी सोडा. अंतर खोरे पाणी वहनअंतर्गत १६८ टीएमसी पाणी गोदावरी नदीत वळवा. कृष्णा- मराठवाडा योजनेच्या कामास गती द्या.
विदर्भातील वैनगंगा - प्राणहिता नदी खोऱ्यातील अतिरिक्त पाणी येलदरी धरणात वळवा. मराठवाड्यातील पूर्ण प्रकल्प त्वरित पूर्ण करा. दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम घोषित करा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.