
New Delhi News: ‘‘मी जेव्हा मराठी भाषेबाबत विचार करतो, तेव्हा मला संत ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आठवते. ‘माझ्या मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके,’ म्हणजे मराठी भाषा ही अमृताहूनी गोड आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रति माझे प्रेम आहे. मी मराठी बोलण्याचा प्रयत्न नेहमी केला आहे,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुकवारपासून (ता. २१) दिल्लीतील विज्ञान भवनात संमेलनाचे उद्घाटन झाले. ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी साहित्य संमेलन महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
तसेच राज्यातील साहित्यिक या सोहळ्यास उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी सुरुवातीलाच, ‘‘मराठी सारस्वतांना माझा नमस्कार,’’ असे म्हणत मराठीतून भाषणास सुरुवात केली. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये बोलत असताना त्यांनी मध्ययुगीन काळापासून ते अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होईपर्यंतच्या महत्त्वाच्या घटनांचा आणि महापुरुषांचा उल्लेख करून त्यांना वंदन केले. ते म्हणाले, की मराठी मातीत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पहिले बाजीराव पेशवे यांनी त्या काळात शत्रूंना पराभूत करून जेरीस आणले.
ब्रिटिश काळात वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर यांसारख्या सेनानींनी ब्रिटिशांची झोप उडविली. त्यांनीही मराठी भाषा आणि साहित्यात अभूतपूर्व असे योगदान दिले. केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांनी भाषेला आकार दिला. मराठी साहित्यातून राष्ट्रप्रेमाचा ज्वर दिसून आला. संपूर्ण राष्ट्राची मशागत या साहित्याने केली. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य मराठीत लिहिले. त्यांच्या रचनेने देशभरात एक ऊर्जा संचारली.
संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, की भाषा बोलली गेली तरच जिवंत राहते. फक्त पुस्तकातून आणि ग्रंथांमधून भाषा जिवंत राहत नाही. त्यामुळे भाषा ही जैविक आहे. महाराष्ट्राला पांडुरंगाचे चिंतन करायला लावणारी मराठी भाषा आहे. ही भाषा संतांनी जिवंत ठेवली आहे. ज्या दिवशी आईने आपल्या बाळासाठी पहिली ओवी म्हटली असेल, त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली असेल.’’
संमेनलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, की मराठी माणूस हा अटकेपार झेंडा फडकविताना दिसतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अमृत अनुभव घेण्यासाठी आज आपण यमुनेच्या तीरावर जमलो आहोत, याचा मला अभिमान आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीत दुसऱ्यांदा होत आहे. तसेच या कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान मोदी हे उपस्थित आहेत याचा मला आनंद आहे. सर्वांनी एका गोष्टीचा पाठपुरावा केला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी भूमिका बजावली याबाबत महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. १९५४ मध्ये पहिल्यांदा दिल्लीत मराठी साहित्य संमेलन झाले. तेव्हा पंडित नेहरू यांनी संमेलनाचे उद्घाटन केले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या भाषणाचे कौतुक केले. ते म्हणाले, की खरे म्हणजे संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचं भाषण ऐकल्यानंतर त्या भाषणामध्येच आपण राहावे असे आपल्या सर्वांना वाटते. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिले संमेलन दिल्लीत होत आहे. तसेच या संमेलनाला पंतप्रधान मोदीदेखील उपस्थित आहेत, ही अभिमानाची बाब आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे म्हणाल्या, की दिल्ली दूर आहे असे पूर्वी म्हटले जायचे. पण आता दिल्ली दूर नाही असे सांगणारे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. अनेक चाकोरीबाहेरील कार्यक्रम यामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. मराठीतील अनेक पुस्तके देखील या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.