
Chh. Sambhajinagar News : केद्राने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेस नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. या योजनेचा महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील साडेनऊ हजारांहून अधिक ग्राहकांनी लाभ घेतला आहे. त्यांच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवून वीज निर्मिती केली जात आहे.
घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिट वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत मिळत आहे. घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जानिर्मिती संच बसविता यावा यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे. तसेच कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यास ग्रामीण ग्राहकांना प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन निधीही देण्यात येणार आहे. याबरोबरच महावितरणकडून १० किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. तसेच सौर नेटमीटरदेखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.योजनेत कार्यान्वित झालेल्या सौर प्रकल्पांतून निर्माण झालेली वीज ग्राहकांना वापरता येते. शिवाय ग्राहकाची गरज भागवून वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून ती विकत घेण्यात येत आहे.
त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे. छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे.
याबरोबरच गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व सामाईक उपयोगासाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट १८ हजार रुपये असे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. ३०० युनिटपर्यंत मासिक वीजवापर असणाऱ्या घरगुती वीजग्राहकांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त आहे. तसेच सुमारे २५ वर्षे या सौर प्रकल्पांतून घरातील वीजवापरासाठी मोफत वीज उपलब्ध होणार आहे.
पीएम-सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प बसवण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. वीज ग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in या संकेत स्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध आहे.
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलात योजनेस ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत परिमंडलातील ९५५४ ग्राहकांनी सूर्यघर योजनेचा लाभ घेतला आहे. यात छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील ६२०१, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमधील १९२३ तर जालना जिल्ह्यातील १४३० ग्राहकांनी आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवून वीज निर्मिती सुरू केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.