Sugarcane Nursery : ‘सुपरकेन नर्सरी’ने वाचते १० लाख लिटर पाणी

Sugarcane Cultivation : ऊस लागवडीनंतर उगवण आणि सुरुवातीची वाढ अत्यंत सावकाश होते. मात्र या कालावधीमध्ये संपूर्ण शेताला नियमित अंतराने पाणी द्यावे लागते.
Supercane Nursery
Supercane Nursery Agrowon

सतीश खाडे

Sugarcane Farming : ऊस लागवडीनंतर उगवण आणि सुरुवातीची वाढ अत्यंत सावकाश होते. मात्र या कालावधीमध्ये संपूर्ण शेताला नियमित अंतराने पाणी द्यावे लागते. परिणामी, मोठ्या प्रमाणात पाणी लागत असते.

ऊस बेण्याने सरळ लागवड करण्याऐवजी एक किंवा दोन गुंठ्यांमध्ये रोपवाटिका केल्यास अत्यंत कमी पाणी द्यावे लागते. म्हणूनच रोपवाटिकेमध्ये उसाचे एक डोळे बेणे लावून वाढविल्यास दीड महिना शेताला पाणी देणे वाचते. यात एकरी सरासरी दहा लाख लिटर पाण्याची बचत होते.

आधुनिक सुपरकेन नर्सरी...

सुपरकेन नर्सरी पद्धतीचे मुख्य प्रवर्तक डॉ. बाळकृष्ण जमदग्नी आहेत. ते स्वतः या तंत्राच्या प्रसारासाठी प्रयत्न करत आहेतच. पण पुणे जिल्ह्यातील जाधववाडी (ता. जुन्नर) येथील उत्तम मारुती जाधव हे नारायणगाव, जुन्नर परिसरात या तंत्राच्या प्रसाराचे काम चोखपणे करत आहेत.

त्यांनी सुमारे साडेपाच हजार शेतकऱ्यांच्या शेतावर सुपरकेन नर्सरी मॉडेल राबवण्यास मदत केली असून, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील १५ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पाचट कुट्टीचे आच्छादन करण्यासाठी प्रवृत्त केले आहे. या दोन्ही तंत्रांच्या वापरामुळे पाण्यामध्ये मोठी बचत साध्य होते. मातीतील सेंद्रिय कर्ब वाढून सुपीकता वाढत आहे.

Supercane Nursery
AI Sugarcane Farming : ऊस शेतीत वापरा कृत्रिम बुद्धिमत्ता

सुपरकेन नर्सरीत उसाची रोपे बनविण्याची कृती

बेणेप्रक्रिया

३००० लिटर पाणी क्षमतेचा खड्डा तयार करून घ्यावा. या खड्ड्यात आतून पॉलिथिन पेपर टाकून, पाणी अर्धे भरून घ्यावे. एवढ्या खड्ड्यामध्ये चारशे उसाचे एक डोळा बेण्यावर प्रक्रिया करता येते. एका एकराला तेवढे पुरेसे आहेत. या तयार टाकीमध्ये अर्ध्यापर्यंत भरलेल्या (म्हणजे दीड हजार लिटर) पाण्यामध्ये क्लोरपायरिफॉस ७५० मि.लि., कार्बेन्डाझिम ७५० ग्रॅम मिसळावे.

त्यात नऊ ते दहा महिन्यांच्या सशक्त उसाचे निरोगी एक डोळा बेणे हळूवार सोडावे. ते तासभर द्रावणात ठेवल्यानंतर बाहेर काढावे. एका वेगळ्या भांड्यात २० लिटर पाण्यात पाच किलो कळीच्या चुन्याचे खडे घालावेत.

ही क्रिया सावकाश करावी, कारण हे द्रावण खदखदून उष्णता बाहेर पडते. थोड्या वेळाने चुन्याची निवळी तयार होते. फक्त ही निवळी तेवढी हलकेपणाने वेगळी काढून खड्ड्यातील द्रावणात सोडावी. खालची चुन्याची राळ बिलकूल घेऊ नये. अशा या द्रावणात उसाचे एक डोळा बेणे रात्रभर भिजू द्यावे. रात्रभर द्रावणात भिजलेले बेणे बाहेर पोत्यावर काढून घ्यावे. थोडा वेळ निथळ्यानंतर त्यावर ॲसिटोबॅक्‍टर १५० मि.लि. प्रति १५ लिटर पाणी या द्रावणाची फवारणी करावी.

या कीडनाशक व बुरशीनाशकाच्या बेणे प्रक्रियेमुळे बेणे निरोगी होते. तसेच ऊस बेण्यामध्ये ॲसिटोबॅक्टर जिवाणू आतपर्यंत शिरतात. हे जिवाणू बेण्यांना नत्राचा पुरवठा करण्यास मदत करतात. चुन्याच्या निवडीमुळे पेशींमध्ये कॅल्शिअमचा शिरकाव होतो. पेशीपटल आणि पेशीतील विकरे जलद कार्यान्वित होतात. रोपे जोमाने वाढतात आणि कणखर होतात.

Supercane Nursery
AI Sugarcane Farming : ऊस शेतीत वापरा कृत्रिम बुद्धिमत्ता

गादीवाफ्यावर लागवड

खताच्या रिकाम्या गोण्या उसवून त्याच्या लांब पट्ट्या तयार करून घ्याव्यात. थोड्याशा उंच केलेल्या गादीवाफ्यावर या पट्ट्या अंथरून त्यावर दोन इंच मातीचा थर द्यावा. प्रक्रिया केलेले ऊस बेणे त्यावर जवळ जवळ मांडावे. त्यावर पुन्हा अर्धा इंच चाळलेल्या मातीचा थर द्यावा. आवश्यकतेनुसार झाऱ्या लावलेल्या होज पाइपने हलके हलके पाणी द्यावे.

सहा ते सातच दिवसांत कोवळे अणकुचीदार कोंब सर्वत्र दिसू लागतात. नऊ ते दहा दिवसांनी ते आणखी मोठे दिसू लागतात. १६ ते १८ दिवसांत रोपे चार पानांची होतात. बाविसाव्या दिवशी लागवडीस योग्य होतात. साधारणपणे तिसाव्या दिवसांपर्यंतची ही रोपे लागवडयोग्य असतात. मात्र जास्तीत जास्त ४० व्या दिवसांपर्यंत ही रोपे आपण शेतात लावली पाहिजेत.

सुपरकेन नर्सरीचे अन्य फायदे

प्लॅस्टिक ट्रे, प्लॅस्टिक पिशव्या, कोकोपीट अशा खर्चिक बाबी वापरल्या जात नाहीत. त्यामुळे खर्चात बचत होते.

खतांच्या गोण्या सच्छिद्र असल्याने गादीवाफ्यावर पाणी साचून रोपे पिवळी पडण्याचा धोका नसतो.

गोणपाटामुळे त्या खालचे तण बेडवर उगवत नाही.

वाहतूकही सोईस्करपणे करता येते.

बेणेप्रक्रिया केलेली असल्यामुळे निरोगी, सशक्त ऊस रोपे मिळतात.

पारंपरिक ऊस लागवडीमध्ये बियाणे खर्च व लागवड मजुरी यासाठी सोळा ते सतरा हजार रुपये खर्च येतो. तर सुपरकेन नर्सरीमध्ये फक्त तीन हजार रुपये खर्च येतो. म्हणजेच लागवड खर्चात अंदाजे दहा ते बारा हजार रुपये बचत होते.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पाण्याच्या चार पाळ्या देणे वाचते. परिणामी, अंदाजे दहा लाख लिटर पाण्याची बचत होते.

सतीश खाडे, ९८२३०३०२१८,

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या अभिनव जलनायक या पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com