Pune News : ऊस शेतीमधील उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच एकरी उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, जैविक आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर करण्याबरोबच, बेणे प्रक्रिया करणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे प्रक्षेत्र व्यवस्थापक वैभव शिंदे यांनी केले.
कळंब येथे दै.सकाळ-अॅग्रोवन आणि रिवुलिस इरिगेशन कंपनीच्या संयुक्त विद्यमाने ‘ऊस पीक व पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञान’ या विषयावर झालेल्या ‘अॅग्रो संवाद’ कार्यक्रमात शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
या वेळी रिवुलिस इरिगेशन कंपनीचे व्यवस्थापक योगेश कुलकर्णी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डी. आर. भालेराव, वितरक अनिल चिखले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक बाबूराव कानडे, शरद सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सूर्यकांत थोरात, प्रगत शेतकरी सागर चिखले, शंकर भालेराव आदींनी चर्चेत भाग घेतला.
नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे प्रक्षेत्र व्यवस्थापक वैभव शिंदे म्हणाले, ‘‘ऊस लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया करून घ्यावी. माती परीक्षण करून खतांची मात्रा द्यावी. उस उत्पादन वाढीकरिता शेतकऱ्यांनी एकात्मिक खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
हिरवळीची खते, जैविक खते व पाण्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. पाचट व्यवस्थापन करून जमिनीचे सेंद्रिय कर्ब वाढवून जमिनीचे व पिकांचे आरोग्य सुधारता येते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी लक्ष देणे फायदेशीर ठरते.’’
शासकीय योजनांचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन रिवुलिस कंपनीचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ नितीन जाधव यांनी केले. भीमाशंकर कारखान्याचे विकास अधिकारी विकास टेंगले यांनी खोडवा व्यवस्थापन, कृषी साहाय्यक दीपाली धिमते यांनी कृषी विभागाकडून ठिंबक सिंचनासाठी असलेल्या अनुदानाची माहिती दिली. रुद्रमणी गिराम, गणेश शेळके, विठ्ठल चिणके, पवन नलावडे, विजय येवले यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन नांदूरचे उपसरपंच शेखर चिखले यांनी केले. ‘सकाळ’चे बातमीदार विवेक शिंदे यांनी आभार मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.