Sunflower Farming : वेळेवर करा सूर्यफूल लागवड

Sunflower Crop Update : सूर्यफूल हे पीक सूर्यप्रकाश व तापमानास संवेदनशील नसले तरी अधिक उत्पादन मिळण्यासाठी योग्य वेळी पेरणी करणे महत्त्वाचे आहे. पेरणी जूनचा पहिला पंधरवडा ते जुलैचा पहिल्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणीपूर्वी बियाणास बीजप्रक्रिया अवश्य करावी.
Sunflower Cultivation
Sunflower CultivationAgrowon
Published on
Updated on

डॉ. शहाजी शिंदे

Oil Seed Update : सूर्यफूल हे वर्षभर घेतले जाणारे महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. हे पीक सूर्यप्रकाश व तापमानास संवेदनशील नसते. त्यामुळे खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात लागवड करता येते. हलक्या ते भारी अशा सर्व प्रकारच्या जमिनीत पीक उत्तम येते.

सूर्यफुलाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे पाण्याचा ताण सहन करू शकते. त्यामुळे दुष्काळी भागातही चांगले उत्पादन मिळते. साधारण ८५ ते ९० दिवसांत पीक तयार होते. त्यामुळे कमी कालावधीत चांगले उत्पादन मिळून जाते.

सूर्यफुलामध्ये तेलाचे प्रमाण ५ ते ४० टक्के इतके असते. थोड्या क्षेत्रात कमी कालावधीत या पिकापासून जास्त तेल उत्पादन मिळू शकते. सूर्यफूल तेलास चांगला बाजारभाव असल्यामुळे इतर तेलवर्गीय पिकांच्या तुलनेत किफायतशीर कमी खर्चात येणारे पीक म्हणून सूर्यफूल ओळखले जाते. आरोग्यासाठी देखील सूर्यफूल तेल चांगले मानले जाते.

हवामान

- पिकाच्या वाढीसाठी २० ते २९ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते.

- फुलोऱ्याच्या अवस्थेत ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान, सतत रिमझिम किंवा मोठा पाऊस, तसेच पीक धुक्यात सापडल्यास दाणे भरण्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे फुलोऱ्याची अवस्था पावसात व धुक्यात सापडणार नाही, याची काळजी घेऊनच पेरणीची वेळ ठरवावी.

जमीन

- किफायतशीर उत्पादनासाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. थोड्याफार चोपण जमिनीत देखील हे पीक येते.

- जमिनीचा सामू ६.५ ते ८.५ पर्यंत असावा.

Sunflower Cultivation
Oil Seed Sowing : परभणी जिल्ह्यातील पाच तालुक्यात उन्हाळी तेलबिया पिकांचा वाढला पेरा

पूर्वमशागत

जमिनीची खोल नांगरणी करून कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणीपूर्वी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी ५ ते ६ टन प्रमाणे द्यावे.

बियाणे

पेरणीसाठी सुधारित वाणाचे ७ ते ८ किलो आणि संकरित वाणाचे ५ ते ६ किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरावे. सूर्यफुलाचे सुधारित किंवा संकरित वाणाचे प्रमाणित बियाणे निवडावे.

वाण निवड

सुधारित वाण

वाण---कालावधी (दिवस)---उत्पादन (क्विं/हे.)---वैशिष्ट्ये

१) भानू---८० ते ८५---१२ ते १४---सर्व हंगामात पेरणीस योग्य, अवर्षणप्रवण भागासाठी योग्य.

२) फुले भास्कर---८२ ते ८७---१४ ते १५---पानांवरील ठिपके रोगास सहनशील, अवर्षणप्रवण भागासाठी योग्य. अधिक तेलाचे प्रमाण ३६ टक्के.

३) एल.एस.एफ.-८---९० ते ९५---१० ते १४---पानांवरील ठिपके रोगास सहनशील

४) टी.ए.एस-८२---९० ते ९५---१० ते १२---तेलाचे प्रमाण अधिक, महाराष्ट्रात लागवडीस योग्य.

५) डी.आर.एस.एफ.१०८---९० ते ९२---१४ ते १६---अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी, तेलाचे प्रमाण ३६ टक्के.

६) डी.आर.एस.एफ.११३---९० ते ९५---१४ ते १६---अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी, तेलाचे प्रमाण ३७ टक्के

संकरित वाण

१) एल.एस.एफ.एच.-३५ (मारुती)---९० ते ९५---१६ ते १९ (बागायती)---अधिक उत्पादन, महाराष्ट्रात लागवडीस योग्य, केवडा रोगास प्रतिकारक.

२) एस.सी.एच.-३५---९० ते ९५---१२ ते १६---महाराष्ट्रात लागवडीस योग्य, केवडा रोगास प्रतिकारक, तेलाचे प्रमाण अधिक

३) डी.आर.एस.एच-१---९२ ते ९८---१३ ते १६---अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी, तेलाचे प्रमाण ४० टक्के

४) फुले रविराज---८५ ते ९०---१५ ते १९---पश्‍चिम महाराष्ट्रात खरीप हंगामात लागवडीसाठी

५) एल.एस .एफ.एच.-१७१---९० ते ९५---१८ ते २२---अधिक उत्पादन, केवडा रोगास प्रतिकारक.

६) पी. डी.के.व्ही.एस.एच.९५२---९० ते ९५---१८ ते २०---मध्यम कालावधी, विदर्भात लागवडीसाठी योग्य.

बीजप्रक्रिया - (प्रमाण - प्रतिकिलो बियाणे)

- बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पेरणीपूर्वी, ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम.

- केवडा रोग टाळण्यासाठी,

ॲप्रॉन (सक्रिय घटक मॅफेनोक्झाम) (३५ एसडी) ६ ग्रॅम.

- विषाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी, इमिडाक्लोप्रिड (७० डब्ल्यूएस) ५ ग्रॅम.

- त्यानंतर ॲझोटोबॅक्टर आणि पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम.

पेरणी

- सूर्यफूल हे पीक सूर्यप्रकाश व तापमानास संवेदनशील नसले तरी अधिक उत्पादन मिळण्यासाठी योग्य वेळी पेरणी करणे महत्त्वाचे आहे.

- खरीप पिकाची पेरणी जूनचा पहिला पंधरवडा ते जुलैचा पहिल्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण करावी.

पेरणी अंतर

- कोरडवाहू सूर्यफुलाची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. म्हणजे बी आणि खत एकाच वेळी पेरता येते. पेरणी करताना दोन ओळींतील अंतर मध्यम ते खोल जमिनीसाठी ४५ सेंमी तर भारी जमिनीसाठी ६० सेंमी इतके ठेवावे. दोन झाडांतील अंतर ३० सेंमी राहील अशा रीतीने पेरणी करावी.

खत व्यवस्थापन

- कोरडवाहू पिकास नत्र ५० किलो (युरिया १०८ किलो), स्फुरद २५ किलो (सिंगल सुपर फॉस्फेट १५६ किलो) आणि पालाश २५ किलो (म्युरेट ऑफ पोटॅश ४२ किलो) प्रति हेक्टर प्रमाणे द्यावे. सर्व खते पेरणीच्या वेळी दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावीत.

- बागायती लागवडीस नत्र ६० किलो (युरिया १२९ किलो), स्फुरद ३० किलो (सिंगल सुपर फॉस्फेट १८८ किलो)आणि पालाश ३० किलो (म्युरेट ऑफ पोटॅश ५० किलो) प्रति हेक्टरी मात्रा द्यावी. नत्राची मात्रा दोन समान हप्त्यांत विभागून द्यावी. नत्राची ३० किलो मात्रा पेरणीवेळी आणि उर्वरित ३० किलो नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे.

Sunflower Cultivation
Oil Seed Subsidy : ‘गळीतधान्य, तेलबिया’ योजनेचे अनुदान रखडले

आंतरपीक पद्धती

खरीप हंगामात दोन ओळी सूर्यफूल अधिक एक ओळ तूर (२:१) ही आंतरपीक पद्धत फायदेशीर आहे. आंतरपीक पद्धतीमध्ये वेगवेगळ्या कालावधीत तयार होणाऱ्या दोन पिकांची लागवड केली जाते.

जेणेकरून नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य कारणामुळे एका पिकाचे नुकसान झाले, तरी दुसऱ्या पिकापासून उत्पादन हाती येते. त्यासाठी सलग लागवडीपेक्षा आंतरपीक पद्धती फायदेशीर ठरते.

विरळणी व आंतरमशागत

- पेरणीनंतर १५ ते २० दिवसांच्या आत विरळणी करून पीक तणविरहित ठेवावे. विरळणी करताना ३० सेंमी अंतरावर एक जोमदार रोप ठेऊन विरळणी करावी. आवश्यकतेनुसार खुरपणी करावी.

- पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात पहिली कोळपणी आणि पाचव्या आठवड्यात दुसरी कोळपणी करावी. कोळपणीमुळे जमिनीवर मातीचे आच्छादन तयार होते. तसेच जमिनीवरील भेगावाटे ओलाव्याचे होणारे बाष्पीभवन रोखले जाऊन पिकाच्या वाढीसाठी फायदा होतो.

सिंचन व्यवस्थापन

- पीकवाढीच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षित पाणी द्यावे. रोप, फुलकळी, फुलोरा आणि दाणे भरण्याची अवस्था या सूर्यफूल पिकाच्या संवेदनशील अवस्था आहेत. या काळात पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.

- फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकास पाण्याचा ताण पडल्यास, दाणे भरण्यावर परिणाम होऊन उत्पादन घटते.

पूरक परागीकरण

सूर्यफूल हे पीक परपरागसिंचित आहे. त्यामुळे दाणे भरण्यासाठी कृत्रिम परागीकरण घडवून आणणे गरजेचे आहे. त्यासाठी तळहाताला तलम कापड गुंडाळून हलका हात फिरवावा. साधारण एक दिवसाआड सकाळी ७ ते ११ या वेळेत ३ ते ४ वेळा फुलांवरून हलका हात फिरवावा. किंवा परागीभवनासाठी मधमाश्‍यांच्या पेट्या हेक्टरी ४ ते ५ प्रमाणे ठेवाव्यात.

संपर्क - डॉ. शहाजी शिंदे, ९६८९६१७०६६, (करडई पैदासकार (नि.), अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्प, कृषक भवन, सोलापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com