डॉ. सुरेश अंबेकर
Jowar Farming : या वर्षी रब्बी हंगामात ज्वारी पिकाची बऱ्यापैकी लागवड झाली असली तरी बऱ्याच ठिकाणी पेरणी उशिरा करावी लागल्यामुळे पिकाची योग्य तितकी वाढ झालेली नाही. परिणामी ज्वारी उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता दिसत आहे.
अशा स्थितीत ज्वारी धान्यांला चांगले दर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे कमी अधिक पाण्याची उपलब्धता असल्यास उन्हाळी हंगामात ज्वारी पिकाची लागवड करणे गरजेचे झालेले आहे.
उन्हाळी ज्वारीच्या लागवडीमध्ये डिसेंबरमध्ये ज्वारी पेरली असता अतिथंडीमुळे ज्वारीची उगवण होत नाही. ज्वारीची पेरणी साधारणतः फेब्रुवारीच्या पुढे केल्यास हे पीक अधिक तापमानात फुलोऱ्यात येते.
परिणामी त्यात दाणेच न भरल्यामुळे उत्पादनात मोठी घट होते. त्यामुळे उन्हाळी ज्वारीच्या पेरणीची योग्य कालावधी हा संक्रांतीच्या जवळपासचा मानला जातो. त्यामुळे उन्हाळी ज्वारीची पेरणी ही १५ ते २० जानेवारीच्या दरम्यान विशेषतः रात्रीचे तापमान १० अंश सेल्सिअस होईल, तेव्हा करावी.
वाणांची निवड
उन्हाळी हंगामात अधिक कडबा उत्पादनासाठी नेहमीच्या खरीप हंगामातील वाणांची पेरणीकरण्याऐवजी रब्बीसाठी शिफारसीत सुधारित वाणांचा वापर करावा. खरीप वाणाच्या पेरणीमध्ये वातावरणानुसार मर रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. एकूणच अपेक्षित उत्पादन मिळत नाही.
उन्हाळी हंगामासाठी मालदांडी-३५-१ या लोकप्रिय वाणांबरोबरच परभणी मोती, परभणी ज्योती, फुले रेवती, फुले वसुधा, फुले यशोदा, तसेच अकोला क्रांती या वाणांचे बियाणे पेरणीसाठी वापरता येईल. बियाणांसाठी या वाणांची पेरणी करणार असल्यास कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या शुद्ध बियाणांचा वापर करावा. या बियाणे क्षेत्रासाठी आपणास क्षेत्र विलगीकरण ठेवणे गरजेचे असते.
खरीप हंगामात शिफारस केलेले काळ्या ज्वारीस प्रतिकारक्षम वाण पी. वी. के. ८०१ (परभणी श्वेता) या वाणाचीही बियाणांसाठी पेरणी करता येते. या काळात बियाणांचा आकार लहान राहत असला तरी कणसांतील एकूण बियाच्या संख्येमध्ये वाढ होते. परिणामी खरीप हंगामासाठी उत्तम बियाणे उपलब्ध होते. अशा बियाणांची उगवण ९० टक्क्यांपेक्षा अधिक होत असल्यामुळे खरीप हंगामातील पेरणीसाठी हेक्टरी ७.५ किलो बियाणे पुरेसे होते.
जमिनीची निवड व बीजप्रक्रिया
उन्हाळी ज्वारीच्या लागवडीसाठी शक्यतो मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी.पेरणीपूर्वी बियाण्यास ३०० मेश गंधकाची ४ ग्रॅम किंवा ३ ग्रॅम थायरम प्रति किलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी. उन्हाळी ज्वारीच्या बियाणास थायमेथाक्झाम (७०%एफएस) ३ ते ५ ग्रॅम प्रतिकिलो प्रक्रिया करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेमुळे खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे होणारा पोंगेमर कमी होतो. झाडाचा जोम वाढण्यास मदत होते.
ताटांची योग्य संख्या आणि रुंदी पेरणी
उन्हाळी ज्वारी पूर्णतः ओलिताखालीच घेतली जाते. या ओलाव्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी दोन ओळीतील अंतर ४५ सेंटीमीटर (१८ इंच) ठेवावे. त्यासाठी हेक्टरी १२ किलो बियाणे वापरणे गरजेचे आहे.
पाण्याचे व्यवस्थापन
उन्हाळी ज्वारीस साधारणपणे ५- ७ पाण्याच्या पाळ्या देण्याची गरज असते. ज्वारी पाण्याच्या पाळ्यास उत्तम प्रतिसाद देते. उपलब्धतेनुसार वाढीच्या पुढील स्थितीमध्ये पाणी द्यावे.
जोमदार वाढीचा काळ (पेरणीनंतर २५ ते ३५ दिवस)
पोटरीत येण्याचा काळ (पेरणीनंतर ५५ ते ६० दिवस)
फुलोरा येणाच्या काळ (पेरणीनंतर ७० ते ७५ दिवस)
कणसात दाणे भरण्याचा काळ (पेरणीनंतर ८५ ते ९० दिवस)
रासायनिक खताचा वापर
ओलिताखालील उन्हाळी ज्वारीसाठी ८०:४०:४० नत्र ः स्फुरद ः पालाश किलो प्रति हेक्टर द्यावे. ही मात्रा मिश्र खतातून देणार असल्यास ३ बॅग १०:२६:२६ मिश्र खत आणि ५० किलो युरिया पेरणीच्या वेळी द्यावा. त्यानंतर ३० ते ४० दिवसांनी ५० किलो युरिया पाण्याच्या पाळीसोबत द्यावा.
- डॉ. सुरेश अंबेकर, ९४२०७०६९०८
(निवृत्त ज्वारी शास्त्रज्ञ, वसंतदादा नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.