उन्हाळी हंगामात ओलिताची सोय असल्यास स्वच्छ सूर्यप्रकाश, कीड -रोग - तणांचा कमी राहणारा प्रादुर्भाव यामुळे तीळ लागवड ही खरिपाच्या तुलनेत फायदेशीर ठरते. मात्र त्यासाठी तीळ पिकाच्या लागवडीचे तंत्र व्यवस्थितपणे राबवणे आवश्यक असते. हे तंत्र जाणून त्या प्रमाणे नियोजन केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते..उन्हाळी तिळाची पेरणी थंडीची लाट ओसरल्यानंतरच करावी. विशेषतः जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रात्रीचे तापमान साधारणत: १५ ते २० अंश सेल्सिअस पर्यंत आल्यानंतर पेरणी करण्याचे नियोजन असावा. त्यामुळे बियांचे अंकुरण व उगवण क्षमता चांगली मिळते..Sesame Farming : विदर्भात तीळ ठरतेय हुकमी पीक.जमिनीची तयारीतिळाचे बी अतिशय लहान असून, पेरणीकरिता जमीन तयार करताना अत्यंत भुसभुशीत केल्यानंतर समतल करून घ्यावी. त्यासाठी मशागतीनंतर पट्टी पास अथवा पठाल मारून घ्यावी. पेरणीची खोली २-३ सेंमी राखल्यास उगवण एकसारखी मिळते. ती कमी जास्त अंकुरण व उगवणक्षमतेवर परिणाम होतो..बियाणे एकरी प्रमाणएकरी एक ते सव्वा किलो बियाणे लागते. बियाणे आकाराने खूप लहान असते. त्यामुळे शेणाच्या गोवऱ्यांचा चुरा, भुस्सा, बारीक वाळू, राख, कोरडे व चाळलेले शेणखत, कंपोस्टखत अथवा गांडूळ खत यापैकी कुठलेही एक माध्यम त्यात मिसळावे.पेरणी पद्धतीअ) बैलजोडीचलित पेरणीयंत्राने पेरणी करताना...तीळ पिकाच्या पेरणीसाठी प्रामुख्याने बैलजोडीचलित पेरणीयंत्राने अथवा काकरी - सरत्याच्या साहाय्याने पेरणी करावी लागते. तिफणीद्वारे अथवा सरत्याद्वारे बियाणे पेरावयाचे झाल्यास हाताच्या पंजाच्या बोटांचा वापर करून पेरणी करावी लागते..Summer Sesame Sowing: उन्हाळी तीळ पेरणीची लगबग सुरू.हाताच्या अंगठा व पहिले बोट (तर्जनी) द्वारे दोन बोटांच्या चिमटीने पेरणी करताना तिळाचे बियाणे १ भाग + माध्यम १ भाग याप्रमाणे १:१ प्रमाणात योग्य प्रकारे मिसळून पेरणी करावी.हाताच्या तीन बोटांच्या साहाय्याने म्हणजेच अंगठा, पहिले बोट (तर्जनी) व मधले बोट (मध्यमा) अशा प्रकारे तीन बोटांनी पेरणी करणार असाल, १ भाग तिळाचे बियाणे + ४ भाग माध्यम अशा प्रकारे मिश्रण १:४ प्रमाणात योग्य प्रकारे मिसळून पेरणी करावी.हाताच्या पंजाच्या चार अथवा पाचही बोटांच्या साहाय्याने अथवा बियाणे मुठीत घेऊन पेरणी करणार असाल, तर १ भाग तिळाचे बियाणे + ९ भाग माध्यम या प्रकारे १:९ प्रमाणात मिश्रण करून पेरणी करावी..आ) ट्रॅक्टरचलित सोयाबीनच्या पेरणीयंत्राने पेरणी करताना...शेतात काकर म्हणजेच हलक्या सऱ्या पाडून घ्याव्यात. पेरणी यंत्राच्या खतपेटीमध्ये खतमात्रा शिफारशीप्रमाणे भरून घ्यावी. अशा प्रकारे संपूर्ण शेतात हलक्या सऱ्या पाडल्यानंतर मजुरांद्वारे वरील तीनपैकी कुठल्याही एका पद्धतीने मजुरांद्वारे काकरांमध्ये मिश्रण सोडून पेरणी करावी..तीळ पिकासाठी शिफारशीत पेरणीचे अंतर - दोन ओळीतील अंतर ४५ सेंमी आणि दोन झाडातील अंतर १०-१५ सेंमी अशाप्रकारे राखावे लागते. दोन झाडातील राखावयाचे १०-१५ सेंमी अंतर योग्य प्रकारे राखल्या जात आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी वरील प्रमाणे बोटांमध्ये बियाणे + माध्यमाचे मिश्रण, मोकळ्या टणक व स्वच्छ जागेवर सरळ रेषेत सोडावे, म्हणजेच बियाणे नेमके किती अंतरावर पडत आहे, याचा अंदाज येईल. त्यानुसार मिश्रणामध्ये बियाणे व माध्यम यांचे प्रमाण अॅडजस्ट करावे.शेतकरी पद्धत - ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्राने तिळाची पेरणी करतेवेळी अनेक शेतकरी तीळ बियाणे आणि माध्यमामध्ये प्रति एकरी एक बॅग डीएपी खत मिसळतात. मात्र ट्रॅक्टरने पेरणी करताना बियाणे खोल पेरले जाते. त्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. हे टाळावे..Summer Sesame : उन्हाळी तिळाच्या लागवडीचे सुधारित तंत्र काय आहे?.विरळणीबियाण्याचा वापर जास्त झाल्यास तीळ झाडांची दाटी होऊन योग्य प्रकारे वाढ होत नाही. हे टाळण्यासाठी पीक थोडे मोठे झाल्यानंतर म्हणजेच पेरणीपासून १८-२० दिवसांनी आणि पुन्हा २५-३० दिवसांनी विरळणी करावी लागते. विरळणीला वेळ आणि मजूर खूप लागतात. हा पुढील खर्च टाळण्यासाठी पेरणी करतानाच तिळाचे बियाणे + माध्यम यांचे मिश्रण आणि पेरणीची प्रक्रिया याला फार महत्त्व प्राप्त होते. विरळणी करताना दोन झाडातील अंतर साधारणत: १०-१५ सेंमी राखून प्रति एकरी झाडांची संख्या एक लाख ठेवावी..जातीउन्हाळी तीळ पिकासाठी पीडीकेव्ही एनटी-११ (शुभ्र पांढरा तीळ), एकेटी -१०१ (पांढरा मळकट तीळ), फुले पुर्णा, फुले तीळ -१ यासारख्या वाणांची शिफारस आहे.पाणी व्यवस्थापनतिळाचे पिक जास्त पाण्याला अतिशय संवेदनशील आहे. सिंचन व्यवस्थापन चुकल्यास किंवा अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्यास मुळांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन मोठे नुकसान संभवते. त्यामुळे तीळ पिकाची पेरणी झाल्याबरोबर लगेचच प्रत्येक १२ ओळीनंतर, डवऱ्याच्या - कोळप्याच्या जानोळ्याला दोरी गुंडाळून सऱ्या पाडून घ्याव्यात अथवा प्रत्येक १३ वी ओळ खाली ठेवावी. त्या ठिकाणी पेरणीनंतर सरी पाडून घ्यावी. त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल. ज्यांना तुषार सिंचन करावयाचे आहे, त्यांच्यासाठी ही खाली ठेवलेली १३ वी ओळ स्प्रिंकलरचे पाइप टाकण्यासाठी उपयुक्त ठरते. पाइप टाकताना व काढताना होणारी पिकांची नासाडी टाळता येते..Sesame Varieties: कमी पाण्यात जास्त नफा देणारे रोगप्रतिकारक उन्हाळी तीळ वाण.खत व्यवस्थापनपिकाला सेंद्रिय कर्बासोबतच दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता होण्यासाठी एकरी २ टन शेणखत द्यावे. एरंडी अथवा निंबोळी पेंड उपलब्धता असल्यास प्रति एकर साधारणत: ४ क्विंटल द्यावे. भर खते जमिनीची मशागत करताना शेवटच्या टप्प्यात जमिनीत ओल असताना द्यावीत.नत्र, स्फुरद, पालाश, गंधक (सल्फर) व जस्त (झिंक) या अन्नद्रव्यांची तीळ पिकाला गरज असते. शिफारशीनुसार प्रति एकर ५-८ किलो नत्र, १० किलो स्फुरद, १० किलो पालाश पेरणीवेळी द्यावे. यासोबतच ८-१० किलो झिंक सल्फेट द्यावे. पुढे पीक साधारणत: २५-३० दिवसांचे झाल्यानंतर प्रति एकर ५ ते ८ किलो नत्र युरियाच्या माध्यमातून द्यावे..पिकाचे उत्पादन चांगले व गुणवत्तापूर्ण मिळण्यासाठी पिकाच्या फुलोरा अवस्थेत व बोंडामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत ना अन्नद्रव्यांची कमतरता पडू देऊ नये. फुलोरा अवस्थेपूर्वी युरिया (२%) म्हणजे २० ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि बोंड भरताना डीएपी (२%) म्हणजेच २० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. नॅनो युरिया अथवा नॅनो डीएपी फवारणी करणार असाल, तर ४ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणीचे नियोजन करावे..Sesame Cultivation: उन्हाळी तिळाचे कमी खर्चात जास्त उत्पादनाचे सूत्र.तणनियंत्रणतीळ पिकाची सुरुवातीला अतिशय हळुवार वाढ होते. सुरुवातीच्या ३०-४० दिवसाच्या काळात वाढणाऱ्या तणांशी पिकाला मोठी स्पर्धा करावी लागते. सुरुवातीच्या काळात पीक तणमुक्त ठेवण्यासाठी गरजेनुसार कोळपणी व खुरपणी करावी. खुरपणी करतानाच विरळणीचेही काम करता येते. तीळ पिकाचे ओलित करताना तुषार सिंचन संचाद्वारे पेरणीपूर्वी व उगवणीपश्चात हलके ओलीत करावे. त्यानंतर तापमानातील बदल, जमिनीचा प्रकार, जमिनीतील ओलीचा अंदाज, पिकाची अवस्था यानुसार ओलिताचा कालावधी निश्चित करावा. पिकाची फुलोरा अवस्था व बोंडातील दाणे भरताना जमिनीतील ओल कमी पडणार नाही, याची काळजी घ्यावी. पक्वतेस ८० दिवसांचा कालावधी गृहीत धरल्यास रोपावस्थेपासून पुढे एकंदर ४ ते ५ ओलित द्यावे लागतील. तीळ पिकात अतिरिक्त ओलिताचे पाणी अथवा अवकाळी पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी पेरणीपाठोपाठ लगेचच प्रत्येक १३ व्या ओळीच्या ठिकाणी सऱ्या पाडून घेतल्यास फायदेशीर राहते..पीक संरक्षणतीळ पिकामध्ये गाद माशी, बोंड पोखरणारी अळी या किडी व भूरी, करपा, मुळकुज, सांधेकूज, पर्णगुच्छ यासारखे रोग यांचा प्रादुर्भाव होतो. प्रादुर्भावाच्या प्रमाणानुसार शिफारशीप्रमाणे फवारणीचे नियोजन करावे.कापणीवाण निहाय तिळाचे पिक साधारणत: ८० दिवसांत कापणीस येते. संपूर्ण शेतात तीळ पिकाच्या झाडांची साधारणत: ७५% ते ८०% भाग बुडापासून शेंड्याकडे खोड - पाने बोंड्या पिवळसर झाल्यावर पीक कापणीस तयार झाल्याचे समजावे. खूप लवकर कापणी केल्यास शेंड्यावरील बोंड्या पोचट राहून, दाणे भरत नाही. कापणीस उशीर झाल्यास बोंड्या तडकून, दाणे जमिनीवर पडतात. दोन्ही परिस्थितीत उत्पादनात घट येते..काढणीपश्चात तंत्रज्ञानकापणी केलेल्या पिकांच्या पेंड्या बांधून घ्याव्यात. समतल जमिनीवर जाड प्लॅस्टिक अथवा ताडपत्रीवर पेंड्यांच्या झोपड्या रचाव्यात. ३-४ दिवस पेंड्या उन्हात वाळल्यानंतर ताडपत्रीवरील मोकळ्या जागेवर पेंड्या उलट्या करून काठीने हलके झोडपत बोंड्यातील तीळ झाडावेत. असे साधारणत: ४-५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा करावे लागेल. प्रत्येक वेळी जमा झालेला तीळ वाळवून स्वच्छ करावा.- जितेंद्र दुर्गे ९४०३३०६०६७(विभाग प्रमुख - कृषी विद्या विभाग, श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.