Sumit Technologies : ‘सुमित टेक्नॉलॉजीज' ‘ऊस-डोळा काढणी यंत्रामध्ये अग्रेसर

Farm Mechanization : सतरा देशांमध्ये यंत्राचा पुरवठा
Sumit Technologies
Sumit TechnologiesAgrowon

Farm Machinery : ‘ऊस-डोळा काढणी यंत्र’ ही सुमित टेक्नॉलॉजीजची फ्लॅगशिप निर्मिती आहे. त्याशिवाय विविध प्रकारची रोपे उत्तम पद्धतीने बनवण्यासाठीच्या ट्रेची निर्मिती आणि रोपांचे ट्रे भरून देणारी यंत्रेसुद्धा सुमितने बाजारात आणली आहेत. या यंत्रांची गुणवत्ता उत्तम आहे.

“... उसाची रोपे करण्यासाठी ऊस डोळे काढणे हे खूप कटकटीचे, त्रासदायक काम ... यासाठी काही करता येईल का? एखादे यंत्र तयार केले तर बरे होईल...” अशी २०१४ मध्ये संजय पाटील यांना श्री. देसाई यांच्या नर्सरीकडून विचारणा झाली आणि असे यंत्र प्रथमच त्यांनी तयार केले. पाटील मुळात मेकॅनिकल इंजिनिअर. शेतीविषयीची आस्था आणि तंत्रज्ञानाचे शास्त्रशुद्ध ज्ञान यांच्या जोरावर असे पहिलेवहिले ऊस डोळे काढणारे यंत्र त्यांनी बनवले. कुठल्याही स्वतंत्र मार्केटिंग यंत्रणेची मदत न घेता केवळ ग्राहकांच्या प्रतिसादातून आणि सोशल मिडियाद्वारे सुमित टेक्नॉलॉजीजचे हे ‘ऊस-डोळे काढणी यंत्र’ बघता-बघता १७ देशांमध्ये जाऊन पोहोचले आहे. अशाप्रकारे सुमित टेक्नॉलॉजीजच्या शेतीविषयक यंत्रे निर्मितीची ही २०१४ मध्ये सुरवात झाली होती. पाटील मुळचे शिरोळ तालुक्यातील कुटवाड या गावचे. प्राथमिक शिक्षण आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण गावी पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी ते पुण्यात आले. सहा वर्षे नोकरी केल्यानंतर भागीदारीत व्यवसाय सुरु केला. पाच वर्षांनंतर त्यांच्या स्वतंत्र व्यवसायाची मुहूर्तमेढ त्यांनी २०१० मध्ये रोवली आणि आज गेली १३ वर्षे सुमित टेक्नॉलॉजीजची घोडदौड चालू आहे.

ऊस डोळा काढणी यंत्राची निर्मिती ः
पारंपरिक पद्धतीने ऊस डोळा कापणी हाताने केली जाते, जे खूपच किचकट, कंटाळवाणे आणि वेळकाढू असते. ऊस रोपे तयार करण्यासाठी योग्य पद्धतीने एकेक डोळा बाजूला काढणाऱ्या ‘ऊस-डोळा काढणी यंत्रा’चे तंत्र सुमित टेक्नॉलॉजीजने विकसित केले आणि निर्मितीपासून वितरण व निर्यातीतही आघाडी घेतली. यामध्ये २ वे (२-Way) आणि ४ वे (४-Way) अशी दोन मॉडेल्स बनवली आहेत. सुमितचे हे ‘ऊस-डोळा काढणी यंत्र’ अल्पावधीतच खूपच लोकप्रिय झाले कारण या यंत्रामुळे ऊस शेतकऱ्यांचे कष्ट एकदम कमी झाले होते.हे यंत्र शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरले. केवळ मौखिक प्रसिद्धीतून या यंत्राला मागणी वाढत गेली.


Sumit Technologies
Agriculture Technology : कृषी तंत्रज्ञान प्रसार, जैवविविधता संवर्धनात ‘स्नेहसिंधु‘ अग्रेसर

देश- परदेशात मागणी ः
आंध्रप्रदेशमधील ‘आंध्र शुगर्स’ चे डायरेक्टर नरेंद्र मुलपुडी यांनी सुरवातीच्या काळात दहा यंत्रे विकत घेतली. त्यातील काही आंध्रप्रदेश शासनाला दिली. हे यंत्रच इतके उपयुक्त होते, की प्रतिसाद वाढतच गेला. मग परदेशातूनही मागणी होऊ लागली. आजमितीला मॉरिशस, फिजी, ऑस्ट्रेलिया, युगांडा, ब्राझील, पाकिस्तान, केनिया, फिलिपिन्स, कोलंबिया, थायलंड, इंडोनेशिया, अमेरिका, फ्रान्स, जमैका, चीन, इजिप्त आणि झांबिया अशा सतरा देशांत सुमितच्या ‘ऊस-डोळा काढणी यंत्रा’ची निर्यात केली जाते. या निर्यात व्यापारात सुमित टेक्नॉलॉजीज एकमेव आहे. ऊस डोळे कापणाऱ्या तंत्रज्ञानाच्या भारतीय बाजारपेठेत ९० टक्के हिस्सा सुमित टेक्नॉलॉजीजचा आहे. भारतातील जवळजवळ सर्व राज्यांत सुमित पोहोचले आहे. विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील ऊस रोपवाटिका, ऊस शेतकरी, ऊस कारखाने आणि ज्यूस सेंटरमध्ये सुमितचे यंत्र दिसते. बहुतांशी विक्री आणि निर्यात ही ऑनलाइन पद्धतीने होते. आजवर कुणाची एकही तक्रार नाही, पण यंत्र किती फायदेशीर ठरले याच्याच प्रतिक्रिया आम्हाला मिळत आहेत, असे श्री.पाटील यांनी सांगितले.


Sumit Technologies
Sugarcane Technology : ऊस तंत्रज्ञानासाठी ‘सिंधुरत्न’कडे ५४ लाखांचा प्रस्ताव

‘ऊस-डोळा काढणी यंत्र’ ही सुमित टेक्नॉलॉजीजची फ्लॅगशिप निर्मिती आहे. त्याशिवाय विविध प्रकारची रोपे उत्तम पद्धतीने
बनवण्यासाठीच्या ट्रेची निर्मिती आणि रोपांचे ट्रे भरून देणारी यंत्रेसुद्धा सुमितने बाजारात आणली आहेत. यांची गुणवत्ता उत्तम आहे. सुमित टेक्नॉलॉजीजचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत उत्तम दर्जाची यंत्रे अतिशय किफायतशीर किमतीमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे सामान्य शेतकरी व नर्सरीधारकसुद्धा त्याचा लाभ घेऊ शकतात. छोट्या शेतकऱ्यांसाठी ’मॅन्युअल बड कटिंग मशिन’ त्यांनी उपलब्ध केले आहे. लवकरच सुमितचे ट्रे मध्ये बी पेरण्याचे यंत्र बाजारात येत आहे.

मित्रमंडळी, कुटुंबाची मिळाली साथ ...
सुमित टेक्नॉलॉजीजचा आजवरचा प्रवास सोपा निश्चितच नव्हता. श्री. पाटील यांच्या वडिलांचे छत्र त्यांच्या लहानपणीच हरपले. आईने मोठ्या हिमतीने त्यांना शिक्षण दिले. उच्चशिक्षण आणि त्यानंतर स्वतःचा व्यवसाय यासाठी पाटील यांची मोठी बहीण स्व. मंगला जवळेकर खंबीरपणे पाठीशी उभी राहिली. बँक ऑफ इंडिया सारख्या राष्ट्रीयकृत बँकेने विश्वास टाकून वेळोवेळी वित्तपुरवठा केला. “व्यवसाय किंवा उद्योजकतेच्या प्रवासात भलेबुरे अनुभव येतच असतात. त्यात टिकून पुढे जायचे असते. मला मदतीचे हात देणाऱ्यांचा मी ऋणी आहे. सातारा येथील अभिजात इक्विपमेंटचे श्री. दोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि आर्थिक मदत व्यवसायाच्या अगदी महत्त्वाच्या टप्प्यावर लाभली,” असे पाटील यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.

आता सुमित टेक्नॉलॉजीज स्थिरस्थावर होऊन स्वतःची ओळख निर्माण झाली आहे. ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांची पत्नी सौ. मालती पाटील आणि मुलगा सुमित पाटील यांच्या मोलाच्या साथीशिवाय हे शक्य नसल्याचे ते आवर्जून सांगतात. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा स्टाफ आणि तीस जणांची संपूर्ण टिम हे सुमित टेक्नॉलॉजीजच्या कुटुंबाचा भाग असल्याचे ते मानतात. त्यांचे चिरंजीव सुमित पाटील याने सुद्धा अलीकडेच BBA चे शिक्षण पूर्ण करून व्यवसायात पाऊल टाकले आहे. मास्टर्सचे शिक्षण घेत घेत नव्या पिढीचे, नव्या जगाचे तंत्रज्ञान आपल्या व्यवसायात आणण्याचे स्वप्न सुमितने बाळगले आहे. “सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला पुढे जायचे आहे. सध्या आठ कोटींच्या आसपास असणारी आमची वार्षिक उलाढाल येत्या पाच वर्षांत ३० कोटींवर नेण्याचा आमचा मानस आहे,” असे सुमितने सांगितले.
सुमित टेक्नॉलॉजीज आज कृषीसहाय्यक यंत्रे, इंजिनिअरिंग क्षेत्रातील उत्पादने आणि पॅकेजिंग उत्पादनात एक अग्रेसर नाव आहे. त्यांची सर्वसाधारणपणे ५० टक्के उत्पादने ही कृषीविषयक असून ५० टक्के उत्पादने इंजिनिअरिंग विषयक आहेत.

उपयुक्त आणि लोकप्रिय कृषीविषयक यंत्रे :
- ‘ऊस डोळा काढणी यंत्र (Sugar Cane Bud Cutting Machines)
- ऊस रस काढणारे यंत्र (Sugarcane Juice Machines)
- रोपनिर्मितीचे ट्रे भरून देणारी यंत्रे (Tray Filling Machines)
- व्ह्यॅक्यूम फॉर्मिंग मशिन फॉर मेकिंग सिडलिंग ट्रे

पुरस्कारांनी गौरव:
राष्ट्रीय उद्योग प्रतिभा अॅवार्ड २०१०
कृषिमित्र पुरस्कार २०१६
नवभारत अॅग्री-टेक अॅवार्ड २०१७
अॅग्रोवन बिझनेस एक्सलन्स अॅवार्ड २०२१
----------------------
संपर्क ः संजय पाटील, ९०९६७७१९४२
इमेल - sales@sumeettech.com संस्थापक, सुमित टेक्नॉलॉजीज, पुणे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com