Nagpur News : यंदाच्या खरीप हंगामास प्रारंभ झाला असला तरी पावसाने ओढ दिल्याने पेरणीचे प्रमाण वाढलेले नाही. त्याचवेळी या कालावधीत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आलेख मात्र वाढला आहे. पेरणीसाठी आर्थिक जुळवणूक न झाल्याने व विस्कळित पावसामुळे हताश झालेल्या २४ शेतकऱ्यांनी जूनमध्ये आत्महत्या केली आहे.
यंदाच्या हंगामात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. जून महिन्यात अमरावती जिल्ह्यात सरासरी १३१ मिमी पाऊस झाला आहे. सरासरीने तो ९० टक्के आहे. मात्र जूनमधील पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा नसल्याने व विस्कळित स्वरूपात झाल्याने जिल्ह्यातील ३८ महसूल मंडले ‘रेड झोन’मध्ये आली आहेत. या मंडलांत अद्याप पेरण्यांची स्थिती गंभीर आहे.
जूनमध्ये सुरू झालेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणीसाठी आर्थिक जुळवणूक सुरू केली. मात्र जिल्हा बॅंक वगळता राष्ट्रीय व खासगी बॅंकांकडून त्यांची मोठी अडवणूक झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. महागडे बियाणे व खतांसह कीटकनाशक खरेदी करताना दमछाक शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.
यातून आलेल्या तणावातून शेतकऱ्यांनी आत्महत्यांसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. या आत्महत्या पेरणीच्या कालावधीतील आहेत. सर्वाधिक पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या अचलपूर तालुक्यात झाल्या आहेत. धामणगावरेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यांत प्रत्येकी तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.
सहा महिन्यांत १७० आत्महत्या
यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांत १७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी जिल्हा महसूल विभागाने ३३ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरविली आहेत. तर १२७ प्रकरणे चैाकशीसाठी प्रलंबित आहेत. दहा प्रकरणे अपात्र ठरविली आहेत.
जूनमधील तालुकानिहाय आत्महत्या
अचलपूर ः ५, धामणगावरेल्वे ः३, नांदगाव खंडेश्वर ः३, तिवसा ः २, भातकुली ः २, चांदूररेल्वे ः१, दर्यापूर ः २, अंजनगावसुर्जी ः २, चांदूरबाजार ः १, चिखलदरा ः १, धारणी ः२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.