Sugar Production : महाराष्ट्रात साखर उत्पादन १४ टक्के घटणार?

Sugar Export : चार वर्षांतील नीचांक; निर्यातबंदीची शक्यता
Sugar Production
Sugar ProductionAgrowon

Sugar : महाराष्ट्रात येत्या गळीत हंगामात (२०२३-२४) साखर उत्पादन तब्बल १४ टक्के घटण्याची शक्यता आहे. गेल्या चार वर्षांतील हा नीचांक असेल. ऑगस्ट महिना कोरडा गेल्यामुळे ऊस उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाळपाला कमी ऊस उपलब्ध होऊन साखर उत्पादन घसरण्याची चिन्हे आहेत.
रॉयटर्स वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने मात्र देशात साखर उत्पादन घटण्याची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात ऑगस्टमध्ये पाऊस कमी असला, तरी सप्टेंबरमध्ये पाऊस सुरू झाल्यामुळे ऊस उत्पादनाचे चित्र बदलेल. तसेच उत्तर प्रदेश व इतर राज्यांत ऊस उत्पादन चांगले राहील. त्यामुळे देशातील साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत घटण्याची शक्यता नाही, असे महासंघाने म्हटले आहे. दरम्यान, गेल्या वर्षीही महासंघाने ऊस व साखर उत्पादनाबद्दल सकारात्मक चित्र रंगवत रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या बातमीचे खंडन केले होते. परंतु नंतर मात्र महासंघाला आपल्या उत्पादनाच्या आकड्यात घट करावी लागली होती.

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने मात्र राज्यातील साखर उत्पादनात घट होणार असल्याचे भाकित केले आहे.
महाराष्ट्र साखर उत्पादनात देशात अग्रेसर आहे. महाराष्ट्रात साखर उत्पादनात मोठी घट झाल्यास देशातील एकूण साखर उत्पादनात मोठी तूट येईल. त्यामुळे अन्न महागाईत वाढ होईल. वाढत्या महागाईमुळे चिंतेत असलेले केंद्र सरकार अशा परिस्थितीत साखर निर्यातीवर बंदी घालण्याची शक्यता आहे.
यंदाच्या हंगामात साखर उत्पादनात घट होईल, असे वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले. यंदा उसाच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पुरेसा पाऊस नव्हता. त्यामुळे जवळपास सर्व ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्ये पिकाची वाढ खुंटली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.  

Sugar Production
Sugar Production : साखर उत्पादन गतवर्षीपेक्षा २३ लाख टनांनी घटणार

देशात यंदा ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली. गेल्या १२२ वर्षांत ऑगस्ट महिन्यात इतका कमी पाऊस झाला नव्हता. महाराष्ट्रातही ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा ५९ टक्के कमी पाऊस झाला.
राज्याचे साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले, की साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक घेतल्यानंतर यंदा पावसात पडलेला मोठा खंड आणि तापमानात झालेली वाढ यामुळे ऊस उत्पादन घटणार असल्याचे चित्र समोर आले आहे.
पावसात मोठा खंड पडल्याने पिकाचे झालेले नुकसान काही अंशी भरून काढण्यासाठी सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.
सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीइतका पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. परंतु राज्यात मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये नेमका किती पाऊस पडतो आणि त्याचे वितरण कसे राहते, यावर ऊस उत्पादनाचे गणित मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.

साखर निर्यात महाराष्ट्रावर अवलंबून

महाराष्ट्रात किती साखर उत्पादन होते, यावर देशाच्या साखर निर्यातीचे धोरण अवलंबून आहे. सन २०२१-२२ मध्ये महाराष्ट्रात विक्रमी १३७ लाख टन साखर उत्पादन झाले होते. त्या वेळी केंद्र सरकारने विक्रमी ११२ लाख टन साखर निर्यात केली होती. त्या पुढच्या हंगामात म्हणजे २०२२-२३ मध्ये महाराष्ट्रातील साखर उत्पादन १०५ लाख टनांवर घसरले़. त्या वेळी केंद्र सरकारने साखर निर्यातीला लगाम घालून केवळ ६१ लाख टन साखर निर्यात केली. येत्या ऑक्टोबरमध्ये साखरेचा नवीन हंगाम सुरू होईल. केंद्र सरकार यंदा साखर निर्यातीवर बंदी घालण्याची शक्यता आहे. पाच राज्यांतील होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर लगेचच सुरू होणारी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची धामधूम लक्षात घेता केंद्र सरकार महागाईच्या मुद्यावर राजकीय जोखीम घेण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून विविध शेतीमालांवर निर्यातबंदी आणि आयातीला मुक्त परवानगी देणारे निर्णय घेतले जात आहेत. तीच मालिका पुढे सुरू ठेवून सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी घालेल, असा कयास बांधला जात आहे. तसे झाल्यास गेल्या सात वर्षांतील ही पहिलीच साखर निर्यातबंदी ठरेल.   

देशातील एकूण साखर उत्पादनात एक तृतीयांश वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. यंदाच्या हंगामात (२०२३-२४) राज्यात ९० लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्या हंगामात १०५ लाख टन साखर उत्पादन झाले होते.
- बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com