Sugar Production : पुढील हंगामात उसासह साखर उत्पादन घटीची शक्यता

Sugar Update : प्राथमिक माहितीनुसार महाराष्ट्र, कर्नाटकामध्ये कमी पावसामुळे ऊस लागवडीवर मोठा परिणाम झाल्याने पुढील हंगामात उसाचे क्षेत्र आणि पर्यायाने साखर उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
Sugar Production
Sugar ProductionAgrowon

Kolhapur News : प्राथमिक माहितीनुसार महाराष्ट्र, कर्नाटकामध्ये कमी पावसामुळे ऊस लागवडीवर मोठा परिणाम झाल्याने पुढील हंगामात उसाचे क्षेत्र आणि पर्यायाने साखर उत्पादन घटण्याची शक्यता आहे. देशात यंदाच्या हंगामापेक्षा कमी साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

यंदा देशाचा साखर हंगाम संपल्यात जमा आहे. येत्या चार महिन्यांत पुढील हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत अवर्षणामुळे यंदा ऊस लागवडीवर परिणाम झाल्याने याचा फटका पुढील हंगामाला बसण्याचा अंदाज आहे. साखर उद्योगातील अनेक संस्था येणारा हंगाम कसा असेल याबाबतचा अंदाज काढण्यात व्यस्त आहेत.

Sugar Production
Sugar Production : जगाचे साखर उत्पादन पोहोचले १८३० लाख टनांवर

उत्तर प्रदेशांमध्ये ‘रेड रॉट रोग’ आणि ‘टॉप बोअर’चा प्रादुर्भाव होत असल्याने या रोगाने गंभीरता वाढविली तर उत्तर प्रदेशातही साखर उत्पादन घटू शकते. सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करून पुढील हंगामात उत्पादन घटेल या निष्कर्षांपर्यंत काही संस्था आल्या आहेत.

दुसरीकडे हवामान विभागाने चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पूरक पाऊस झाला तर आहे त्या ऊस क्षेत्राचे उत्पादन वाढूही शकते. पण, या सर्व जर तरच्या गोष्टी असल्याने सध्याची स्थिती पाहता साखरेचे उत्पादन मर्यादितच होईल, असा अंदाज आहे.

अॅग्री मंडी या शेती क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संस्थेच्या म्हणण्यानुसार पुढील हंगामात अंदाजे साखर ३० लाख टन इतकी साखर इथेनॅालकडे वळाली तर २८० लाख टन साखर देशात तयार होईल. ७० लाख टनांचा कॅरिओव्हर स्टॅाक गृहीत धरला तर पुढील वर्षी ३६० लाख टन साखर देशात असेल.

Sugar Production
Sugar Production : पर्यायी साखर उत्पादनाला ‘डीएसटीए’कडून चालना

हा साठा यंदाच्या हंगामाच्या तुलनेत २ टक्क्यांनी कमी असेल. सरत्या हंगामाची सुरुवात ५० लाख टन शिल्लक साखर साठ्याने झाली. यंदाचे उत्पादन ३२० लाख टन लक्षात घेता देशात ३७० लाख टन साखर उपलब्ध झाली, असे म्हणता येईल. सर्व परिस्थितीचा विचार करता सरत्या हंगामाच्या तुलनेत पुढील हंगामात साखर उत्पादनाचे प्रमाण ५ टक्क्यांनी घटू शकते.

धोरणांवरही परिणाम

गेल्या वर्षीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी अनेक संस्थांनी उत्पादन घटीचा अंदाज व्यक्त केला. हा अंदाज गृहीत धरुन केंद्राने निर्यातीवर बंदी आणलीच पण इथेनॅालसारख्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमावरही अनपेक्षित रित्या निर्बंध आणले. हंगाम सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांतच हे अंदाज चुकीचे ठरले. मॉन्सूनोत्तर पाऊस ऊस पट्ट्यात झाल्याने उसाचे एकरी उत्पादन जितके कमी धरले होते तितके झाले नाही.

अपेक्षेपेक्षा साखर उत्पादन वाढू लागल्याने साखर उद्योगातील कारखान्यांच्या संस्थांनी साखर उत्पादन वाढत असल्याचे सांगत निर्यात परवानगीबरोबरच इथेनॅाल निर्मितीवरील निर्बंध मागे घेण्याची विनंती केंद्राकडे केली. केंद्राने याला फारशी सकारात्मकता दाखविली नाही. काही मर्यादित निर्णय घेतले पण याला विलंब लावला.

अचूक आकडेवारीवरच अंदाज अपेक्षित

सध्या साखर उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक संस्था पुढील हंगामातील साखर उत्पादनाचे अंदाज काढण्यात व्यस्त आहेत. अनेक कारखानदार अशा संस्थांना आपल्याकडे उसाची योग्य आकडेवारी देत नाहीत.

ऊस लागवड व अपेक्षित साखर उत्पादन याचा अंदाजच कारखानदारांना येत नाही की योग्य माहिती देण्याचे कारखानदार टाळतात, याबाबत साशंकता असते. यामुळे महत्त्वाच्या अनेक संस्थांचे अंदाज चुकतात. या अंदाजावर केंद्र धोरण ठरवत असल्याने चुकीच्या माहितीचा फटका कारखानदारांनाच बसत असल्याचे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com