
Solapur News : यंदाचा गाळप हंगाम चालू होऊन दीड महिना उलटला आहे. सरासरी ४० दिवसांचा हंगाम झाला आहे. तरीही ऊसतोडणी मजुरांचा अभाव, तोकडी ऊसतोडणी यंत्रणा, उसाच्या क्षेत्रातील व एकरी टनेजमधील घट यासारख्या कारणांनी सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची पूर्ण क्षमतेने ऊस गाळप करण्यासाठी धडपड सुरू असल्याचे दिसत आहे.
यावर्षी जिल्ह्यात ३० कारखान्यांनी हंगाम घेतला आहे. जिल्ह्याची दैनंदिन गाळप क्षमता एक लाख ६५ हजार ५०० मेट्रिक टन आहे. त्यापैकी सहकारी कारखान्यांची गाळप क्षमता ७४ हजार ३५० तर खासगी कारखान्यांची ९१ लाख १५० टन आहे. परंतु, जिल्ह्याच्या दैनंदिन गाळप क्षमतेपेक्षा ५० टक्केच गाळप सध्या होत असल्याचे आकडेवारी स्पष्ट होत आहे.
यावर्षीच्या हंगामासाठी जिल्ह्यात एक लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रातील ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात ६० हजार हेक्टरने उसाचे क्षेत्र यंदा गाळपासाठी कमी आहे. एक जानेवारीअखेर जिल्ह्यात जवळपास ५३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. हेक्टरी सरासरी ७५ टन उसाचे उत्पादन गृहीत धरले तर आतापर्यंत जिल्ह्यातील कारखान्यांसाठी साधारण ७१ हजार हेक्टर क्षेत्रातील ऊस तुटल्याचा अंदाज आहे.
म्हणजे निम्म्या क्षेत्रातील ऊसतोड झाली आहे. शिल्लक राहिलेले क्षेत्र पाहता जानेवारीअखेर अनेक कारखान्यांचा पट्टा पडण्याची शक्यता आहे. शेजारच्या पुणे, सातारा, सांगली व अहिल्यानगर जिल्ह्यातील काही कारखान्यांना सोलापूर जिल्ह्यातून ऊस गाळपासाठी जात आहे. त्यामुळे परजिल्ह्यातील कारखान्यांना किती हेक्टर ऊस गेला याचा अंदाज बांधणे कठीण आहे.
पूर्ण क्षमतेने ऊस गाळपासाठी बहुतांश कारखान्यांची कसोटी लागली आहे. काही कारखान्यांचे आताच ''नो केन'' स्थितीत गाळप सुरू आहे. कारखान्यांची केनयार्ड रिकामी पडत असल्याचे चित्र आहे. काही कारखान्यांत ऊस भरून आलेली वाहने थेट काट्यावर वजन करून रिकामी करावी लागत आहेत.
ऊसतोडणी मजूर व वाहतूक यंत्रणेची अनेक कारखान्यांकडे वानवा असल्याचे दिसते. उसाच्या क्षेत्रातील घट हेही त्यामागचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय पावसाअभावी उसाची वाढ झाली नसल्याने ऊसतोडणी होऊन वाहनांची भरती होण्यास वेळ लागत असल्याचे कारण क्षमतेपेक्षा कमी होणाऱ्या गाळपासाठी सांगितले जात आहे.
पिंपळनेरच्या विठ्ठलराव शिंदे कारखान्याने जवळपास पाच लाख टन गाळप केले आहे. सहकार महर्षी, पांडुरंग कारखान्यांनी साडेतीन लाख टन गाळपाचा टप्पा ओलांडला आहे. व्ही. पी. शुगर्स तीन लाख टनांच्या उंबरठ्यावर आहे. विठ्ठल (वेणूनगर), बबनरावजी शिंदे यांनी अडीच तर लोकनेते, लोकमंगल (भंडारकवठे), सिद्धनाथ, युटोपियन यांचे गाळप दोन लाखाच्या पुढे गेले आहे.
कारखान्यांकडून अंतिम दराबाबत सावध भूमिका
अपवाद वगळता जिल्ह्यातील कारखान्यांनी उसाचा अंतिम दर जाहीर केलेला नाही. काही कारखान्यांनी पहिला हप्ता २६०० ते २८५० रुपयांदरम्यान जाहीर केला आहे. तथापि, हे कारखाने अंतिम दर किती देणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. अधिकचा ऊसदर देणाऱ्या कारखान्यांना ऊस घालण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. मात्र, हंगामाअखेर कारखान्यांना मिळणाऱ्या सरासरी साखर उताऱ्यानुसारच उसाची एफआरपी निश्चित होत असल्याने साखर कारखानदार अंतिम ऊस दराबाबत सावध असल्याचे दिसते.
एक जानेवारीअखेरची जिल्ह्यातील गाळपाची स्थिती
कारखाने दैनंदिन गाळप
क्षमता (टन) एक जानेवारी रोजी झालेले गाळप (टन) एक जानेवारीपर्यंतचे
गाळप (टन) उतारा (टक्के)
सहकारी(११) ७४,३५० ४५,०४७ २२,८५,५६६ ८.२४
खासगी(१९) ९१,१५० ३९,११५ ३०,१६,९६६ ७.५२
एकूण(३०) १,६५,५०० ८४,१६२ ५३,०२,५३२ ७.८३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.