Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्ह्यात १३ साखर कारखानदार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काही ठिकाणी कारखानदार विरूद्ध कारखानदार अशी निवडणुक आहे तर काही ठिकाणी कारखानदार विरूद्ध शेतकरी संघटना अशी लढत होणार आहे. शिरोळ मतदार संघात शेतकरी संघटनांच्या मुशीतील तालुक्यात कारखानदार विरुद्ध शेतकरी संघटना अशी लढत होणार आहे. दोन साखर कारखानदारांबरोबरच शेतकरी संघटनेची ताकद एकवटली आहे. मात्र, जातीच्या विभागणीवर मतदारांचा कौल कसा जाणवणार, यावरही निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे.
महाविकास आघाडीकडून दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील तर राजर्षी शाहू विकास आघाडीकडून शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याबरोबरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेत नुकताच प्रवेश केलेले माजी आमदार उल्हास पाटील यांना संघटनेची साथ मिळणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला उर्जितावस्था आणून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी उल्हास पाटील यांचा विजय महत्वाचा मानला जात आहे.
दुसऱ्यांदा आमदार होण्यासाठी राजेंद्र पाटील -यड्रावकर यांनी कंबर कसली आहे तर सा. रे. पाटील यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहन्यासाठी गणपतराव पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. माजी आमदार उल्हास पाटील यांनी बंडाचा झेंडा हाती घेऊन स्वाभिमानीत प्रवेश केल्यानंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. उल्हास पाटील यांचा विजय संघटनेसाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. त्यादृष्टीने प्रचाराची रणनीती आखली जात आहे.
कारखानदार विरुद्ध शेतकरी संघटना असे चित्र स्पष्ट झाल्यानंतर ऊस दरावरच प्रचाराचे केंद्र असणार आहे. प्रमुख उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत प्रचाराचा प्रारंभ केला आहे. लवकरच तालुक्याच्या गावागावांत गल्लीबोळात प्रचार पोहोचणार आहे. विविध संघटनांचा पाठिंबा घेण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी कंबर कसली आहे. मतदानाची बेरीज-वजाबाकीची आकडेवारी मांडण्यात राजकीय विश्लेषक मग्न आहेत.
काही उमेदवारांकडून मतदार संघातील गावागावात लोकांचा कानोसा घेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आखण्यात आली आहे. ही यंत्रणा गावातील विरोधकांच्या हालचालींसह मतदारांच्या मतांचा आणि मनाचा ठाव घेत आहे. प्रचाराच्या काळात अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार आणि समर्थकांकडून प्रत्यक्ष गाठीभेटीसह सोशल मीडियाचाही आधार घेतला जात आहे. याबरोबरच विरोधकांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणारी यंत्रणानाही कार्यान्वित झाली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.