Sugarcane News : महाराष्ट्रात १ नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्र सोडल्यास राज्यातील अन्य भागात ऊस गाळप हंगामाने वेग पकडला असून, १०३ साखर कारखान्यांकडून ३५ लाख टन ऊस गाळप पूर्ण झालेले आहे. तसेच ६.६६ टक्के सरासरी उताऱ्यानुसार २३ लाख ४३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन हाती आले आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात माजी खासदार राजू शेट्टी यांचे ऊस दराबाबत आंदोलन सुरू असल्याने या भागात मात्र ऊस तोडी बंद आहेत.
दरम्यान ऊस गाळपाच्या हंमाच्या सुरूवातीस काही कारणास्तव उसाची उपलब्धता कमी होती. मात्र, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून गाळप हंगाम वेगाने सुरू झाला आहे. साखर आयुक्तालयाकडे यंदाच्या २०२३ -२४ च्या हंगामासाठी २१७ साखर कारखान्यांनी गाळप हंगामास परवाना मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत.
ऊसतोडणी महामंडळाच्या कपात रकमेसह एफआरपीची रक्कम आणि अन्य निधींची पूर्तता केलेल्या आणि छाननीमध्ये परिपूर्ण प्रस्ताव असलेल्या साखर कारखान्यांनाच ऊस गाळप परवाने वितरित करण्यात आले आहेत. आयुक्तालयाने सोमवार अखेर ८० सहकारी आणि ९२ खासगी मिळून एकूण १७२ साखर कारखान्यांना यंदाचे ऊस गाळप परवाने ऑनलाईन वितरित केले आहेत.
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळास १७ रुपये प्रतिटन या दराने द्यायची थकीत रक्कम चार टप्प्यात वसूल करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. त्यामुळे कारखान्यांनी तातडीने ही रक्कम भरून ऊस गाळप परवाना मिळविण्याची लगबग केली आणि परवाने घेण्याचे प्रमाण वाढले. सध्या केवळ ४५ कारखान्यांना परवाने देणे बाकी असल्याची माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.
उसाचे घटलेले क्षेत्र आणि दुसरीकडे कारखान्यांनी वाढविलेली संख्या व क्षमता यामुळे यावर्षी ऊस गाळप हंगाम केवळ तीन महिने चालण्याची शक्यता आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे उसाचे वजन घटणार आहे.
याचा साखर निर्मितीवर परिणाम होण्याची भीती आहे, तर मागील हंगामाची थकबाकी दिल्याशिवाय यावेळेस कारखान्यांना गाळप परवाना देऊ नका, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे. त्यामुळे यंदा कारखान्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.