सन १९९० मध्ये राजाराम यांचे लग्न (Marriage) झाले. त्याच्या पत्नीचे नाव नंदा होते. राजाराम हा सैन्यदलात होता. नोकरीनिमित्त त्यास परप्रांतात राहावे लागत असे. राजाराम याचे अलका हिच्यावर देखील प्रेम होते. राजारामने नंदा हिच्याशी लग्न झाल्यानंतर साधारण सहा महिन्यांच्या काळात अलका हिच्याशी गुपचूप लग्न (Secretly Married) केले.
निरनिराळी कारणे सांगून राजाराम हा त्याची पहिली पत्नी नंदा हिला नोकरीच्या ठिकाणी सोबत घेऊन जाण्यास टाळाटाळ करीत असे. अलका ही दुसरी पत्नी कायमपणे राजाराम सोबत नोकरीच्या ठिकाणी राहत होती.
राजाराम व नंदा यांना अरुण नावाचे अपत्य होते, तर राजाराम व अलका यांना विशाल व गौरी अशी अपत्ये होती. राजारामची पत्नी नंदा गावी राजारामच्या आई-वडिलांसोबत राहत होती.
त्यांची देखभाल करण्यासाठी व सेवा करण्यासाठी जवळ कोणी तरी राहणे आवश्यक आहे ,अशी समजूत घालून तो नंदाला गावाकडे राहण्यास भाग पाडत होता.
थोडक्यात, काय तर सैन्यात असल्याचा राजारामला दुहेरी फायदा होत होता. पहिल्या पत्नीने म्हणजे नंदा ने कितीतरी वेळा तिला नोकरीच्या ठिकाणी येण्यासाठी तगादा लावला होता.
एकदा एक आठवड्यासाठी तो तिला घेऊन गेला, पण ते सुद्धा दुसरी पत्नी अलकाला तिच्या माहेरी पाठवून! किती धोरणी असतील माणसे? अक्षरशः ‘तो मी नव्हेच ‘नाटकाचा प्रयोगच!! मुलांच्या जन्माच्या वेळा, आरोग्य तपासणी, गावाकडची कामे, सैन्यातली कामे, शेताची कामे या सगळ्यांचा मेळ राजाराम घालत होता बेमालूमपणे!!
काही वर्षांनंतर राजाराम असाध्य व्याधीने खूप आजारी पडला. सदर आजारामध्येच त्याचे निधन झाले. सैन्यदलात नोकरीत असल्याने त्याची पहिली पत्नी नंदा व मुलगा अरुण यांनी वारस नोंद होण्यासाठी व पेंशनसाठी अर्ज केला.
त्याच वेळी राजारामची दुसरी पत्नी अलका हिने स्वतःच्या मुलांच्या नावे अर्ज केला. सैन्यदलातील अधिकाऱ्यांनी वाद उपस्थित झाल्याने सक्षम न्यायालयाचे आदेश घेऊन यावे अशा सूचना त्यांना केल्या.
नंदा व अलका यांनी वारस दाखला मिळण्यासाठी सक्षम न्यायालयात अर्ज दाखल केला. दोन्ही पक्षकारांचे लेखी व तोंडी पुरावा घेऊन सुनावणी झाली.
सुनावणीदरम्यान कोर्टासमोर असे लक्षात आले, की नोकरीच्या ठिकाणी सर्व कागदपत्रांमध्ये त्याची पहिली पत्नी नंदा हिचे नाव नामनिर्देशन केले होते. फोटो मात्र अलका हिचा दिला होता.
त्यामुळे पहिल्या पत्नीचे नाव व फोटो दुसऱ्या पत्नीचा अशी विचित्र परिस्थिती कोर्टासमोर उपस्थित झाली.
कुटुंबातील ज्येष्ठांनी सर्व प्रकार लक्षात घेऊन दोघींना तडजोड करण्यासाठी सल्ला दिला व उभयतांमध्ये मृत्यूनंतर मिळणारे सर्व फायदे वाटून घेण्याचा सल्ला दिला.
नाइलाजाने त्यांना तडजोड करावी लागली. मानवी वर्तणुकीमुळे आता नंदाच्या वाट्याला फसवणूक तर आलीच होती, पण आयुष्यभर त्याग करून सुद्धा प्रॉपर्टीमध्ये तडजोड करावी लागली होती.
त्यामुळे केवळ कायद्याचे ज्ञान नाही, तर आजूबाजूला घडत असलेल्या घटनांकडे डोळसपणे पाहता आले, तरच मालमत्तेचे प्रश्न सोपे होऊ शकतात.
संपूर्ण आयुष्यात एकदाही शंका न येता नंदा गाफील राहिली असेल का? दररोजचे जगणे, मुलांचे ॲडमिशन, आजारपण, फोनवरील संभाषण, आई-वडील व त्यांचे बोलणे, सामाजिक कार्यक्रम अशा गोष्टींतून तिला अंदाज करता आला असता का? माणूस गुंतागुंतीचा प्राणी आहे, हेच वारंवार सिद्ध होत आहे.
शेखर गायकवाड - ई-मेल- shekharsatbara@gmail.com
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.