Sugarcane Worker : ऊसतोड मजूर दांपत्याची जोडी कमाईत ‘नंबर वन’

Sugarcane Crop : सव्वाशे दिवसांत ३ लाख ९० हजारांची मजुरी
Sugarcane Worker
Sugarcane WorkerAgrowon

Kolhapur News : राजाभाऊ नारायण धस आणि मनिषा राजाभाऊ धस (रा. इकुरका, ता. केज, जि. बीड) या ऊस तोड मजूर दांपत्याने १२५ दिवसांत ऊस तोडणीतून ३ लाख ९० हजारांची मजुरी मिळविली आहे. शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याच्या ऊस तोडणीतून त्यांनी ही रक्कम मिळवली आहे. त्यामुळे ही ‘जोडी नंबर वन’ ठरल्याची चर्चा आहे.

धस दांपत्य पहाटे पावणे चार वाजता उठायचे. त्यानंतर प्रथम ते बैलांना अंघोळ घालायचे. बैलांना सरकी पेंड, गव्हाचा आट्टा, शेंग पेंड आणि पाणी द्यायचे. यानंतर स्वतःचे आवरायचे. पाच वर्षाचा दत्ता हा त्यांचा मुलगा आहे. त्याची अंघोळ, त्याची देखभाल करायची आणि पहाटे सवा पाचच्या दरम्यान बैलगाडीतून दत्ताला सोबत घेऊन दत्त साखर कारखान्याने ज्या शेतकऱ्याचा ऊस तोडण्यासाठी चिठ्ठी दिली आहे, त्या ठिकाणी पोहोचायचे.

पहाटे सहा पासून ऊस तोडणी सुरू करायची. ३६० ते ४०० मोळ्या होतील याची दक्षता घ्यायची. मोळ्या डोकीवर घेऊन बैलगाडीत भरायचे. त्यानंतर सोन्या आणि गुण्या या बैलांना गाडीला जुंपायचे. रानामाळात गाडी अडकली तर एकाने खांदा द्यायचा, ढकलायचे आणि दुसऱ्याने गाडी हाकायची.

Sugarcane Worker
Sugarcane Production : देशात ऊस उत्पादनात हे राज्य नंबर वन ; महाराष्ट्राचं स्थान कितवं?

गाडी रस्त्याला आली की मुलगा दत्ताला रात्री केलेल्या जेवणाचा घास भरवायचा. त्याला पिण्याचे पाणी द्यायचे आणि त्यानंतर या दाम्पत्याने बाजरीची भाकरी आणि रात्री बनवलेली पातळ भाजी कुस्करून घ्यायची असा दिवसाचा दिनक्रम.

दिवसातून दोन बैलगाड्या म्हणजे जवळपास ९ टन ऊस शिरोळच्या दत्त कारखान्यात पोहोचवायचा. सूर्य मावळला की सात वाजता झोपडीत यायचे, पुन्हा स्वयंपाक करायचा, दुसऱ्या दिवशीची तयारी करायची. असे करत या जोडीने कष्टाच्या जोरावर रक्ताचे पाणी करून १२५ दिवसांत ६६१ टन ऊस तोडला आहे.

गरिबीत कष्ट ठरले मोलाचे
यंदा सूर्य आग ओकतोय. पाला अंगाला कापायचा, लाही लाही करायचा. पण, त्यांनी पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष केले, चांगल्या खाण्याकडे दुर्लक्ष केले, झोपेकडे दुर्लक्ष केले आणि ६६१ टन ऊस स्वतः तोडायचा, त्याचा पाला सोलायचा, कंडके करून मोळ्या बांधायच्या.

बैलांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून त्यांच्याही आरोग्याकडे लक्ष द्यायचे. झोपडीत ना लाइट, ना पंखा, ना मिनरल वॉटरचे पाणी. एकवेळ जेवण बनवायचे आणि तीनवेळा ते खायचे. या स्थितीत गरिबीच्या चटक्याला लाखमोलाचा मुलामा त्यांनी दिला आहे.

दत्त कारखान्याकडून गौरव
श्री दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी धस दांपत्याला कष्टाची पोच पावती दिली. कारखाना कार्यस्थळावर त्यांचा सत्कार करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com