.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
गंगा बाकले
Education Guidance : आदरभाव प्रकट करण्याचा सर्वांत महत्त्वाचा दिवस ‘शिक्षक दिन’ आहे. अखिल भारतीय शिक्षकांना ५ सप्टेंबर रोजी सर्वत्र आनंदाने अभिवादन केले जाते. एक आदर्श शिक्षक-तत्त्वज्ञ आणि भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करतो. आधुनिक काळात अनेक मतप्रवाह निर्माण झालेले आहेत, शिक्षणाचे जनक फुले दांपत्यांना अभिवादन करण्याची नवीन विचारसरणी मान्य होत आहे.
असो, समाजकारण-अर्थकारण-साहित्य आणि मानवतावादी महत्त्वाची कार्ये विचारार्थ घेऊन सर्व भारतीय डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शिक्षकांप्रति कृतज्ञता दर्शवितात. कारण समाजातील सर्व नागरिकांपेक्षा शिक्षकांचे काम मोलाचे आहे. इथे ज्ञान आणि कृती, निर्मिती, रचनात्मक बांधणी, उत्तम संस्कार, मूल्यांची रुजवण आणि जपणूक, सामाजिक एकात्मता, राष्ट्रभावना आणि राष्ट्रबांधणी या सर्व गुणांचे संवर्धन शिक्षक शिक्षणातून सातत्याने करत असतात.
शिकविण्याबरोबर चांगला माणूस घडविणे हे शिक्षणाचे सर्वांत मोठे कार्य शाश्वत आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षणाविषयी म्हणणेच होते, की साक्षरता निर्माण करणे हे शिक्षण नव्हे, तर माणूस निर्माण करणे हे खरे शिक्षण होय. पूर्वीचा-आजचा आणि उद्याचा भारतीय समाज निकोप राहण्यासाठी त्यांच्या शिक्षणविषयक विचारांचा अर्थ खूप खोलाचा आणि उच्चतमही आहे.
शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निपुण करतात. पण विद्यार्थ्यांचे मानसिक परिवर्तन घडविणे आणि निर्भयता अभेद्य ठेवणे, हे आजच्या गुंतागुंतीच्या युगात गरजेचे झालेले आहे. शिक्षक उत्तम निर्माता आणि कल्पक दिग्दर्शक आहेत. आपल्या याच समाजात आपणांस ‘असे गुरुजी-असे शिष्य’ गवसतात. त्यांची काही उदाहरणे मला माहीत आहेत.
गाव-खेड्यात राहणारा एक विद्यार्थी चौथीच्या वर्गात फुकटपास, सातवीच्या वर्गात ढकलपास आणि दहावीला चक्क नापास होतो. त्याचे वडील मग त्याला त्याच्यापाठच्या भावाला भाकरी भाजायला त्याच्यासोबत ठेवतात. दोघेही वसमतसारख्या तालुक्याच्या ठिकाणी शिकतात. पहिल्या मोठ्या भावाने नापास झाल्यामुळे गुरेढोरेही वळलेले असतात. पण धाकला भाऊ जिद्दीने शिकतो आणि आपणही कष्टपूर्वक शिकून मोठे होऊयात, हे तो मनोमन ठरवितो.
नंतर तो दहावी पास, बारावीनंतर पदवी संपादन करतो आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगरमध्ये मराठी पदव्युत्तर वर्गात ‘सुवर्णपदक’ प्राप्त करतो. प्राध्यापक होतो. नामांकित कवी होतो. ज्या कवीच्या कविता शालेय अभ्यासक्रमात आणि अनेक पुस्तके महाविद्यालयीन व विद्यापीठ अभ्यासक्रमात अभ्यासली जातात. त्यांच्या साहित्यावर अनेक जण संशोधन करतात.
मालिका आणि चित्रपट गीतकार म्हणून ते नावाजलेले आहेत. अशा कवीचे नाव आहे इंद्रजित नारायणराव भालेराव, त्यांचे कृषिशास्त्रज्ञ भाऊ आहेत प्रभाकर भालेराव. इंद्रजित भालेराव यांना सर्वप्रथम साहित्य वाचनाचे बाळकडू देणारे गुरुजी आहेत केशव बाबनराव वसेकर. बालपणापासून होतकरू व अभ्यासू विद्यार्थ्यांना शिकविणारे गुरुजी विद्यार्थ्यांच्या भविष्याला चांगलाच आकार देतात.
त्यामुळे असे विद्यार्थीही चांगलेच घडतात. विद्यार्थ्यांची आवड व गुणवत्ता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना योग्य मार्गाने मार्गस्थ करणारे असे असंख्य गुरुजी असतात. दहावीपासून एका विद्यार्थिनीला ‘तू भविष्यात डॉक्टर होणार आहेस’, असे गुरुजी नेहमी सांगायचे. खरोखर ती विद्यार्थिनी दहावीला गुणवत्ता यादीत आली आणि बारावीलाही अव्वल गुणसंपादन करून नावाजली आणि आता ती परदेशात डॉक्टर होत आहे, विद्यार्थिनीचे नाव आहे श्वेता वांजोळकर आणि तिचे गुरुजी आहेत रमेश पाठक. एकाहून एक अशा गुरुजी आणि विद्यार्थी यांच्या जोड्या आपण बघतो आणि अनुभवतो.
शिक्षणाचे सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी गुरुजी चौकस असतात. वाचनाचे परिपाठ ते सातत्याने राबवीत असतात. काळाच्या गतीप्रमाणे आज तंत्रस्नेही आणि विविधांगी शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत आहे. देशासाठी लागणारे उत्तम सैनिक, वैद्यक, न्यायाधीश, शास्त्रज्ञ, समाजसेवक आणि कौशल्ये प्राप्त नागरिक घडविण्यासाठी शाळा या कार्यशाळा आणि संस्कारशाळा म्हणून जोमाने कार्य करत आहेत. बदलते शिक्षणाचे स्वरूप लक्षात घेऊन शिक्षकही स्वतःला अद्ययावत ठेवतात.
साहित्य, विज्ञान, कला-क्रीडा आणि संस्कृती आदी क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी शिक्षकांची स्वतः अभ्यासूपणाची साधना आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शिक्षक आदर्शवत विचार आणि आचार पार पाडतात. आज सगळीकडे विद्येचा प्रचार आणि प्रसार पोहोचला आहे. अनुभवाने सांगते, की गाव-वाडी-वस्ती आणि तांड्यावर शिक्षण मिळत आहे. कष्टकरी आणि शेतकरीही लेकरांना शिकण्यासाठी मन लावून प्रयत्न करत आहेत. कुटुंबातील पती-पत्नी लेकराबाळांकडे गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे लक्ष देऊन अभ्यासातील गती आणि प्रगती साध्य करण्यासाठी झटत आहेत. म्हणजेच, गुरुजींच्या शब्दांना किंमत लाभत आहे. गावातील बाई मला सांगू लागल्या, की -
लेकीचा जलम जसा
गाजराचा वाफा
जन्म घालून मायबापा
काय साधियेला नफा, ही लोकोक्ती आता बदलली आहे. शिक्षणामुळे लेकीचा जन्म पालापाचोळा न राहता त्यांचे जीवन झळाळले आहे. लेकीबाळी आता सेवाक्षेत्रात आणि सरकारी क्षेत्रात सेवा बजावत आहेत. आत्मनिर्भरता त्यांच्यात आलेली आहे. पूर्वीसारखा सासुरवास आता राहिलेला नाही. आजच्या सूनबाई सासूबाईंना सांगत आहेत, की -
आत्याबाई सासूबाई
बोलणं नको रागाचं
तुमच्या हाताखाली
पिलू नांदतंय वाघाचं, हे असे बोल मुलींना मिळालेल्या शिक्षणाचे खरे वरदान आहे. सम्यक विचार-सम्यक दृष्टी आणि सम्यक आचार आता शिक्षणातून पार पाडले जातात. आदर्शाची उपासना ही काट्याच्या टोकाइतकी टोकदार असते. पण गुरुजींनी आदर्शवान विद्यार्थी घडविलेले असतात. जिल्हा परिषदेच्या आपल्या गुरुबंधूंच्या मुलाला एक गुरुजी इतके पक्के आणि निक्के करतात, की तो विद्यार्थी राज्यमंत्री असलेल्या लोकप्रतिनिधींच्या नियमबाह्य कामाला नियमाने बगल देतो.
विशेष म्हणजे, तो सुरुवातीला डॉक्टर आणि नंतर पुढे स्पर्धा परीक्षेतून उपजिल्हाधिकारी होऊन प्रामाणिकपणे कार्य करत आहे, त्या विद्यार्थ्याचे नाव आहे नांदेड येथे विद्यमान उपजिल्हाधिकारी असलेले डॉ. सचिन खल्लाळ आणि त्यांच्या गुरुजींचे नाव आहे नामदेवराव सूर्यवंशी! जाहीर कार्यक्रमात आजही उपजिल्हाधिकारी डॉ. खल्लाळ आपल्या सूर्यवंशी गुरुजींच्या चरणी दंडवत घालतात; असे आदर्श केवळ गुरुजींमुळेच टिकतात. सर्व गुरुजींना ‘शिक्षक दिना’निमित्त मनस्वी शुभेच्छा!
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.