राजेश कळंबटे
Ratnagiri News : वेहेळे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथील अन्नपूर्णा महिला शेतकरी स्वयंसाह्यता गटातील सदस्यांनी गटशेतीच्या माध्यमातून गेली दहा वर्षे भाजीपाला आणि कलिंगड लागवडीतून खात्रीशीर उत्पन्नाचे साधन निर्माण केले. यातून गावातील पंधरा कुटुंबाचा आर्थिक प्रश्न सुटला. गेल्या दहा वर्षांत महिला गटाने गावाच्या शेती विकासाला नवी दिशा दिली आहे.
कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुकड्या तुकड्यांची शेती, पावसाळा सोडल्यास पाण्याचे दुर्भिक्ष, डोंगर उतारावरील गावे-वस्त्या, एकाच सातबारामध्ये अनेक शेतकऱ्यांची नावे, अशा अनेक प्रश्नांमध्ये येथील शेतकरी त्रस्त आहे. जे शेतकरी रब्बी हंगामात शेतीसाठी प्रयत्न करतात, अशा शेतकऱ्यांना उनाड जनावरे, वणवे, वन्यप्राणी यांचा त्रास होतो. अशी परिस्थिती असल्याने पावसाळ्यात केवळ भात पिकावर समाधान मानावे लागते. कोकणातील पारंपरिक शेतीची ही ओळख बदलण्यासाठी दिशांतर या स्वयंसेवी संस्थेने वेहेळे गावातील महिलांना संघटित करून प्रगती आणि भाग्यश्री महिला गट तयार केला. या गटामध्ये पीक बदल तसेच शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार केला.
भाजीपाला लागवडीसाठी गटशेतीला सुरुवात
दिशांतर संस्थेने २०१४ मध्ये वेहेळे गावातील राजवीरवाडीतील महिलांनी एकत्र करून प्रगती आणि भाग्यश्री असे दोन महिला गट स्थापन केले. सुरुवातीला दिशांतर संस्थेने गटातील महिलांना प्रशिक्षण दिले. गटाला ठिबक सिंचन संच, पंप, पाइप, पॉवर टिलर, मोबाइल राइस मिल, मळणी यंत्र दिले. सेंद्रिय खत आणि कीडनाशक निर्मितीसाठी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर वैयक्तिक स्तरावर शेतकऱ्यांना फळभाज्यांची रोपे आणि बियाण्यांचे वितरण करण्यात आले. यामुळे महिलांनी शेतीमध्ये भाजीपाला लागवडीला सुरुवात केली.
गावशिवारातील बाजारपेठेतील भाजीपाला मागणीची गरज लक्षात घेऊन संस्थेने दोन्ही बचत गटातील वीस महिलांना एकत्र करून शेती विकासासाठी अन्नपूर्णा महिला शेतकरी स्वयंसाह्यता गटाची स्थापना केली. गटाने भाजीपाला लागवडीसाठी गावातील पडीक जमीन सहा महिन्यांसाठी एक हजार रुपये प्रति एकर याप्रमाणे भाडेतत्त्वावर घेतली. यातून गटातील महिलांनी १५ एकर जमीन दुबार ओलिताखाली आणली. भात शेतीनंतर रब्बी हंगामात पंधरा एकर क्षेत्रावर गटातर्फे वांगी, मिरची, दोडके, कारले, पडवळ, दुधी भोपळा, काकडी, पालक, मेथी, माठ, मुळा आणि कलिंगडाची लागवड सुरू केली. पहिल्याच वर्षी विविध प्रकारचा भाजीपाला, २५ टन कलिंगड विक्रीतून गटाला सहा लाख रुपये उत्पन्न मिळाले.
शेतीतील पंचसूत्री ः
सहकारातून शेती, सामुदायिक शेती आणि आता शेतीमध्ये केवळ महिलाच काम करतात म्हणून महिलांकृत शेती. अतिप्रमाणात रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या फवारणीमुळे मानवी आरोग्यावर परिणाम दिसत आहे. तसेच जमिनीचा पोत देखील बिघडला आहे. त्यामुळे गटातील महिलांनी जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय शेतीवर भर दिला आहे. दलालमुक्त शेतीमाल विक्री व्यवसाय म्हणजेच शेतकरी पिकवेल आणि शेतकरीच विकेल, यावर गटाने भर दिला आहे.
शिवार फेरीतून मार्केटिंग ः
अन्नपूर्णा प्रकल्पातील सेंद्रिय भाजीपाल्याची चव आणि एकूणच महिला शेतकऱ्यांनी उभारलेले शेती आणि ग्राम विकासाचे काम पाहण्यासाठी चिपळूण शहर आणि परिसरातील नागरिकांसाठी संस्थेतर्फे शिवार फेरीला सुरुवात करण्यात आली. शिवारफेरीतील सहभागी मंडळींनी त्याचा प्रचार आणि प्रसार केला. त्याचा परिणाम म्हणजे चिपळूण शहरांमध्ये उभारलेल्या भाजी स्टॉलला चिपळूणमधील नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. दरवर्षी केवळ चार महिन्यांमध्ये विविध भाजीपाला, कलिंगड विक्रीतून या गटाने मोठी आर्थिक उलाढाल सुरू केली आहे. कोविड काळात दरवर्षी सात लाखांच्या सरासरीने या महिला गटाची आर्थिक उलाढाल झाली.
नफ्याचे वाटप ः
बचत गटातील महिलांना सहा महिन्यांत मिळणाऱ्या उत्पन्नातील दीड लाख रुपये पुढील वर्षांसाठी राखीव ठेवले जातात. त्यातून बियाणे किंवा अन्य शेतीसाठी गरजेचे साहित्य विकत घेतले जाते. उर्वरित रकमेतून जेवढे दिवस महिलांनी काम केले, त्यांना तासाला २५ रुपये प्रमाणे मजुरी दिली जाते. सहा महिन्यात प्रत्येक महिलेला १५ ते २० हजार रुपये मिळत होते. गतवर्षी मजुरीत वाढ झाली असून, आता २० ते २५ हजार रुपये मिळतात, असे बचत गटाच्या अध्यक्ष शुभांगी राजवीर यांनी सांगितले.
जल व्यवस्थापनामध्ये सहभाग ः
शेतीसाठी पाणी हा महत्त्वाचा घटक. अडरे गावातील पाझर तलावातून वाहून जाणारे आणि वशिष्टी नदीला मिळणारे पाणी कोणीही अडवत नव्हते. दहा वर्षांपूर्वी येथे पाणी साठवण्यासाठी बंधारा बांधण्यात आला. यासाठी माती मिश्रित रेती पोत्यांमध्ये भरून ही पोती नदीपात्रामध्ये व्यवस्थितरीत्या रचण्यात आली. त्यामुळे कमी खर्चात बंधारा तयार झाला. तत्कालीन कृषी अधिकारी आर. के. जाधव आणि ‘आत्म्या‘चे व्यवस्थापक पंकज कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला गट आणि दिशांतर संस्थेने हे काम केले.
या बंधाऱ्यात सुमारे १ कोटी २० लाख लिटर पाणी अडविले जाते. यामुळे रब्बी हंगामात भाजीपाला लागवडीसाठी या संरक्षित पाण्याचा वापर होतो. त्याचबरोबरीने महत्त्वाचा फायदा म्हणजे परिसरातील विहिरी, कूपनलिकेतील पाणीपातळी वाढली. गेल्या काही वर्षांत गाव शिवारातील नदीमध्ये विविध मंडळांच्या माध्यमातून विविध ठिकाणी बंधारे बांधण्यात आले. यामुळे मोठ्या प्रमाणात गावशिवारात पाणी साठा झाला. त्यातून भाजीपाला, कलिंगड लागवडीला चालना मिळाली.
स्व मालकीचे वाहन ः
महिला गटातर्फे चिपळूण शहरामध्ये भाजीपाला विक्रीसाठी स्टॉल लावण्यात येतो. या ठिकाणाहून भाजी, फळभाज्या तसेच कलिंगडची विक्री करण्यात येते. भाजीपाला वाहतुकीसाठी गटाला वेहेळे ते चिपळूण अशी दररोज भाडेतत्त्वावर गाडी करावी लागे. कधी गाडी वेळेत न येणे तसेच भाड्याचा मोठा आर्थिक भुर्दंड गटाला होत होता. ही अडचण दूर करण्यासाठी महिला गटाने दुसऱ्या वर्षामध्ये स्वमालकीचे वाहन घेतले. स्टॉल व्यतिरिक्त परिसरातील विविध गावांच्यामध्ये फिरून भाजी, कलिंगड विक्रीसाठी या वाहनाचा चांगला उपयोग होत आहे.
महिला गटशेतीची दशकपूर्ती...
दिशांतरतर्फे पथदर्शी अन्नपूर्णा प्रकल्पाला २०१४ मध्ये सुरुवात झाली. या प्रकल्पात सहभागी झालेल्या वेहेळे येथील अन्नपूर्णा महिला शेतकरी स्वयंसाह्यता गट दरवर्षी रब्बी हंगामातील चार महिन्यांमध्ये विविध भाजीपाला आणि कलिंगड विक्रीतून सरासरी सहा लाखांची उलाढाल करतो. भाजीपाला शेतीमधील प्रगती लक्षात घेऊन ग्रामपंचायत, चिपळूण पंचायत समिती आणि जिल्हा कृषी विभागापर्यंत या गटाचा सन्मान झाला. महाराष्ट्र शासनातर्फे मुंबई येथे राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराने गटाला सन्मानित करण्यात आले.
गटशेतीचे यंदाचे दहावे वर्ष आहे. महिला गटामुळे गावातील शेतीला वेगळी दिशा मिळाली आहे. राजवीरवाडी येथील श्रम सन्मान कार्यक्रमावेळी गटामध्ये २ लाख ९३ हजार ५१४ रुपयांचे वितरण करण्यात आले, अशी माहिती गटातील सदस्या श्रुती राजवीर, सविता घाणेकर यांनी दिली.
दिशांतर संस्थेने खेड्यांच्या पुनर्जागरणाचा हाती घेतलेला उपक्रम महत्त्वाकांक्षी ठरला आहे. शेतीला योग्य दिशा दिली तर ग्रामीण महिलांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते, हे वेहेळे येथील महिलांनी सिद्ध केले आहे, असे संस्थेचे अध्यक्ष राजेश जोष्ठे यांनी सांगितले.
- राजेश जोष्ठे, (अध्यक्ष, दिशांतर संस्था), ९८२२९८७४१०
- शुभांगी राजवीर, (अध्यक्षा, अन्नपूर्णा महिला शेतकरी स्वयंसाह्यता गट) ९३२५५३७०३२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.