

Aurangabad Highway : औरंगाबाद - पैठण राष्ट्रीय महामार्गावरील ५१ वटवृक्षांच्या यशस्वी पुनर्लागवड करण्यात आली. या प्रकल्पाची पैठण येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकारी यांनी पाहणी केली. या ५१ वृक्ष पुनर्लागवडचा झालेला यशस्वी प्रयोग पाहून गडकरींनी समाधान व्यक्त केले.
यावेळी पालकमंत्री संदीपान भूमरे, सिने अभिनेते सयाजी शिंदे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्लागार अशोक कुमार जैन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे रविंद्र इंगोले, अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, तहसीलदार विजय चव्हाण आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, पर्यावरण संवर्धनासाठी हा प्रयोग समाजाला प्रेरणा देणारा ठरेल. वृक्ष लागवडीचे हे ठिकाण गार्डन म्हणून विकसित करा, जेणेकरून पैठणला आलेले भाविक भक्त येथे येतील व प्रेरणा घेतील. याच प्रेरणेतून गावागावात असे प्रकल्प उभे राहतील. अभिनेते सयाजी शिंदे यांनी केलेले काम नक्कीच प्रेरणादायी आहे असे ते म्हणाले.
पर्यावरण संवर्धनासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, सामजिक, शैक्षणिक संस्था व स्वयंसेवी संस्थानी वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घ्यावा. देशात वृक्षलागवड चळवळ उभी रहावी. बांबू लागवडीमुळे अनेकांना रोजगार मिळाला. गवतवर्गीय पीक असलेल्या बांबूची लागवड पडीक जमिनीतही केली जाते. शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर बांबूची लागवड केल्यास वर्षानुवर्षे त्यापासून उत्पादन मिळेल. बांबूला चांगला भाव न मिळाल्यास ऊसाप्रमाणे दर ठरविण्याची शासनाची तयारी आहे असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री भूमरे म्हणाले, पैठण येथे ५१ वृक्षांची लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग झाला. हे नक्कीच मोठे काम आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने राज्यात रस्त्यांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे, यातून दळणवळण सुलभ होण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.
औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असताना रस्त्याच्या दुतर्फा ५० ते १०० वर्षे जुने ५१ वटवृक्ष होते. ती तोडल्याशिवाय महामार्गाचे काम पूर्ण होणे शक्य नव्हते. त्यातूनच ही झाडे न तोडता त्याचे प्रत्यारोपण करून त्यांचे पुनर्जीवीत करण्याचा विचार समोर आला. जायकवाडी धरणामुळे पैठण परिसरातील भूजल पातळी उंचावली आहे. त्यामुळे याच परिसरात त्याचे प्रत्यारोपण करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार त्याचे प्रत्यारोपण करण्यात आले. देशात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने झाडांचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.