

मुकुंद पिंगळे
नाशिक जिल्ह्यातील उंदीरवाडी (ता. येवला) येथील क्षीरसागर कुटुंबाने आले पिकातून समृद्धी, संपन्नता मिळवली आहे. सुमारे बारा वर्षांपासून या पिकात सातत्य ठेवत एकरी २३ ते २५ टन उत्पादकता ठेवली दर्जेदार बेणे, सुयोग्य व्यवस्थापन, मालाची गुणवत्ता, बाजारपेठेचे ज्ञान ही त्यांच्या शेतीची वैशिष्ट्ये आहेत.
त्यामुळेच ‘प्रगतिशील आले बागायतदार’ असा नावलौकिक त्यांनी मिळविला आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याचा पूर्व भाग दुष्काळाच्या झळा सोसणारा. त्यामुळे प्रामुख्याने जिरायती पिके येथे घेतली जातात. काही शेतकऱ्यांनी सिंचन सुविधा उभारून पीक पद्धतीत बदल केला.
बदलातून प्रगती शक्य आहे याच विचारसरणीतून तालुक्यातील उंदीरवाडी येथील कै. बबन वामन क्षीरसागर यांनी नव्या संधीचा शोध घेतला. सन २००९ मध्ये कन्नड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे आले पिकाच्या लागवडी त्यांच्या पाहण्यात आल्या. अधिक अभ्यास केल्यानंतर हे पीक आपणही करून पाहावे असे त्यांच्या मनात आले. कन्नड येथील प्रगतिशील आले उत्पादक श्री. दाबके यांच्याकडून बेणे खरेदी केले. एक एकरांत प्रयोग केला खरा. पण दर कमी मिळाल्याने उत्पन्न अपेक्षेप्रमाणे मिळाले नाही.
प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेत पुन्हा प्रयत्न केले. आज बारा वर्षे झाली. सुयोग्य व्यवस्थापन, कुटुंबाची एकी आणि प्रयोगशीलतेच्या बळावर क्षीरसागर यांनी हे पीक यशस्वी केले आहे. कै. बबन यांची मुले भाऊसाहेब, बाबासाहेब पूर्णवेळ शेतीत कार्यरत आहे. त्यांचे बंधू ज्ञानेश्वर यांची त्यांना साथ आहे. भाऊसाहेबांचा पुतण्या सुभाष हा देखील शेतीत राबतो.
आले पीक व्यवस्थापन (ठळक बाबी)
-दरवर्षी दोन- चार एकर क्षेत्र. यंदा १५ एकर.
-मजुरीखर्च व टंचाई या समस्या दूर करण्यासाठी यांत्रिकीकरण.
-काढणी करण्याच्या वेळी बाजारात दर समाधानकारक नसल्यास आले काही महिने शेतात ठेवता येते हा त्याचा महत्त्वाचा फायदा असल्याचे भाऊसाहेब सांगतात.
-१५ मे ते ५ जून या कालावधीपर्यंत लागवड. त्यासाठी साडेचार फुटी सरी व ठिबकचा वापर.
-बेणे घरचेच, दर्जेदार व एकरी ११ क्विंटल प्रमाणात वापर. माहीम-२ या वाणाचा वापर. सरळ वाढणारे, जोमदार फुटवे असलेले व वजनदार असे हे वाण असल्याचे भाऊसाहेब सांगतात.
-लागवडीआधी शेणखत, कोंबडी खत व मळी एकत्रित करून दोन महिने खताचा डेपो तयार करून त्याचा वापर.
-पीक फेरपालट. पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड
-शिफारशीनुसार कीडनाशकांचा वापर. हवामान स्थितीनुसार सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये १५ ते २० दिवसांच्या अंतराने फवारण्या. (गरजेनुसार).
उत्पादन, दर व बाजारपेठ
येवला तालुक्यात सर्वाधिक आले उत्पादन घेणारे शेतकरी म्हणून क्षीरसागर कुटुंबाची ओळख आहे. दरवर्षी एकरी २३ ते २५ टन उत्पादन मिळते. १८ महिने शेतात आले ठेवल्यास उत्पादन ३२ टनांपर्यंत मिळते. एकरी उत्पादन खर्च सुमारे दोन लाख रुपये येतो. आल्याच्या दरांमध्ये कायम चढ-उतार सुरू असतात. गेल्या दोन ते तीन वर्षांत प्रति क्विंटल एक हजार, १७००, दोन हजार ते २८०० रुपयांपर्यंत राहिले. यंदा मात्र दरांत तेजी असून, प्रति क्विंटल १४ हजार रुपये दर असल्याचे भाऊसाहेबांनी सांगितले.
सुमारे एक हजार क्विंटल आल्याची विक्री त्यांनी १६ हजार रुपये दराने केली. सातारा व छत्रपती संभाजीनगर येथील निश्चित केलेले दोन व्यापारी आले जागेवरून घेऊन जातात. काढणीपश्चात स्वच्छता करून हाताळणी व प्रतवारी झाल्यानंतर माल देण्यात येतो. विक्री नियोजनात गोरख रावते, नीलेश कदम आदी अनुभवी मंडळींचे मार्गदर्शन लाभते. दरवर्षीच्या लागवडी, बेणे विक्री, बाजारातील मागणी- पुरवठा व आवक अशी स्थिती अभ्यासूनच क्षीरसागर क्षेत्राची निवड करतात. तेजी- मंदी हे घडत असले तरी बाजारातील पुरवठ्यात सातत्य टिकवून ठेवणे गरजेचे असते. दरांचा लाभ मिळण्यासाठी गुणवत्तापूर्ण उत्पादन हा भाग क्षीरसागर महत्त्वाचा मानतात. त्यासाठी मालाचा पंजा, जाडी, चकाकी हे मुद्दे महत्त्वाचे ठरतात.
कुटुंबाने राखला एकोपा
दोन्ही भावांचे संयुक्त कुटुंब असून सर्व जण एकविचाराने नियोजन करतात. वडीलधाऱ्या मंडळींचा अनुभव त्यामध्ये विचारात घेण्यात येतो. यापूर्वी डाळिंब पिकातही कुटुंबाने असेच आदर्श कामकाज केले होते. आई कमळाबाई यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळते. तर भाऊसाहेब यांच्या पत्नी लंकाबाई, बाबासाहेब यांच्या पत्नी मीनाबाई व सुभाष यांच्या पत्नी प्रियंका यांची मोलाची मदत होते.
शेती विकासाला प्राधान्य
शेतीमुळे सर्व स्वप्न पूर्ण होतात. मात्र त्यासाठी सर्व सुविधा असाव्यात या निर्धाराने कुटुंबाने
सिंचन सुविधांचे बळकटीकरण केले. सात किलोमीटरवरून पाइपलाइन केली. दोन शेततळ्यांच्या माध्यमातून तीन कोटी लिटर साठवणूक क्षमता निर्माण केली. सुमारे ११ हजार चौरस फुटांचे गोदाम, तीन ट्रॅक्टर, तीन पॉवर टिलर व पाच ट्रॉली अशी सामग्री आहे. पूर्वी डाळिंब सात एकरांत होते. तेलकट डाग रोगामुळे बाग काढावी लागली. आता कांदा व आले हीच प्रमुख पिके आहेत.
कष्टाचे झाले चीज
वडिलोपार्जित २२ एकर जमीन होती. शेतीतील कर्तृत्वातून १४ एकर आणखी खरेदी केली.
शेती विकासाला अधिक प्राधान्य दिले. आज अनेक शेतकरी क्षीरसागर यांना ‘अद्रक किंग’ उपनावाने संबोधतात. पूर्वी सायकल नव्हती. आता चारचाकी दारासमोर आली. टुमदार बंगला उभा राहिला. शेतीचे यांत्रिकीकरण झाले. जे स्वप्नात पहिले नव्हते, ते प्रत्यक्ष पूर्ण झाले असे हे कुटुंब अभिमानाने सांगते. कुटुंबातील नवी पिढी उच्चशिक्षण घेत आहे.
संपर्क :
भाऊसाहेब क्षीरसागर, ९६५७५२८१६८
सुभाष क्षीरसागर, मो. ९६८९४५७३११
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.