Drip Irrigation : ठिबकची जागतिक बाजारपेठ ४८ हजार कोटींच्या पुढे जाणार

Global Market Of Drip Irrigation : जगाच्या पाणी समस्या यापुढे अधिक उग्र होतील. पाण्यामुळे भविष्यात अन्न सुरक्षेचाही प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे ठिबकचा अवलंब यापुढे झपाट्याने वाढेल.
Drip Irrigation
Drip IrrigationAgrowon
Published on
Updated on

Pune News : शेती सिंचनासाठी जगभर ठिबकचा वापर झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे ठिबकची बाजारपेठ येत्या तीन वर्षांत ४८ हजार कोटी रुपयांच्या पुढे जाईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय सिंचन व जलनिःसारण आयोगाचे अध्यक्ष फेलिक्स रिएन्डर्स यांनी व्यक्त केला.

‘व्हीएसआय’ येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेत ‘सूक्ष्म सिंचन व यांत्रिकीकरण’ याविषयावर शनिवारी (ता.१३) झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील होते.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे तसेच साखर उद्योगातील पदाधिकारी उपस्थित होते.

‘‘जगाच्या पाणी समस्या यापुढे अधिक उग्र होतील. पाण्यामुळे भविष्यात अन्न सुरक्षेचाही प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे ठिबकचा अवलंब यापुढे झपाट्याने वाढेल. ठिबकची जागतिक बाजारपेठ गेल्यावर्षी २९ हजार ९०० कोटींपर्यंत पोचली.

मात्र, २०२७ पर्यंत बाजारपेठेने ४८ हजार ८०० कोटींचा टप्पा ओलांडलेला असेल. दूरस्थ नियंत्रण, फिरती ठिबक प्रणाली (मोबाईल ड्रिप इरिगेशन), ग्रीन ड्रम अशा विविध तंत्रांचा अवलंब ठिबक क्षेत्रात वाढेल,’’ असे भाकीत रिएन्डर्स यांनी केले.

राज्यासमोर मोठे आव्हान

जागतिक बॅंक संचालित सिंचन प्रकल्पाचे सल्लागार डॉ. सुरेश कुलकर्णी यांनी राज्याच्या ऊसशेतीमधील ठिबकचा वापर वाढत असल्याचे नमुद केले. ते म्हणाले की, राज्यात सध्या १४.३७ लाख हेक्टरवर ऊसशेती आहे.

याच वेगाने लागवड सुरु राहिल्यास सन २०४० पर्यंत २५ लाख हेक्टरच्या पुढे ऊस पेरा जाईल. मात्र, सध्या ७५ टक्के ऊस शेती ठिबकखाली नाही. त्यामुळे उसाला ठिबक खाली आणण्याचे एक मोठे आव्हान धोरणकर्त्यांसमोर उभे आहे.

Drip Irrigation
Drip irrigation : तुषार संचधारक शेतकऱ्यांना तीन वर्षानंतर ठिबकचा लाभ ; केंद्राकडून अनुदान धोरणात बदल

हार्वेस्टर स्मार्ट होणार

चीन कृषी विद्यापीठातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शाऊचीन मा यांनी यांत्रिक ऊस कापणीचा आढावा घेतला.‘‘होल स्टॉक हार्वेस्टर व चॉपर हार्वेस्टरने जगात ऊस कापणी केले जाते. परंतु, त्यात विविध अडचणी आहेत. भविष्यात मात्र हार्वेस्टर स्मार्ट होतील. त्यात अधिक स्वयंचलन (अॅटोमेशन) येईल,’’ असे ते म्हणाले.

Drip Irrigation
Drip Irrigation : ठिबक सिंचन संचासाठी आम्ल प्रक्रिया

रोबोटचलित यंत्रे येणार

कृषी यांत्रिकीकरण क्षेत्राचे तज्ज्ञ व माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे म्हणाले, ‘‘पुढील तीन-चार वर्षांत शेतात रोबोट्सचलित यंत्रांचे आगमन होईल. सेन्सर्स आधारित ऊस कापणी यंत्रे उपलब्ध होतील. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अवजारे व यंत्रांचा वापर ऊस शेतीत वाढलेला असेल.

सद्यःस्थितीत देशातील एकही कापणी यंत्र परिपूर्ण नाही. होल केन कटर तंत्र चांगले असले तरी ते देशात उपलब्ध नाही. समस्या काहीही असल्या तरी ऊस टंचाईमुळे हार्वेस्टर वाढत जातील. मात्र, दुर्दैवाने देशात हार्वेस्टर चालकांना प्रशिक्षण देण्याची सुविधाच नाही.’’

ठिबकमध्ये ‘ग्रीन ड्रम’चे युग येणार

जगाच्या ठिबक क्षेत्रात आता ग्रीन ड्रम टेक्नॉलॉजी येऊ पहाते आहे. हेच भविष्यातील तंत्रज्ञान राहील. ठिबक नळ्यांमधून अतिसूक्ष्म ध्वनिलहरी पाठविण्याची सुविधा या तंत्रात आहे. शेती सिंचन प्रणाली अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने वापरण्याची हमी देणारे हे तंत्रज्ञान अतिशय प्रभावी ठरेल, असे फेलिक्स रिएन्डर्स यांनी परिषदेतील भाषणात नमुद केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com