Water Management : पाणलोटाचा अभ्यास अन् नियोजन कसे करावे?

मृद्‍संधारण उपाय योजनांचे आकृतिबंध ठरविण्यासाठी साधारणपणे १० ते २५ वर्ष कालावधीची प्रत्यावर्ती शिखर पर्जन्य घनता विचारात घ्यावी लागते. मागील काही वर्षांत पडलेल्या पर्जन्याची सरासरी काढून त्या क्षेत्राचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ठरविले जाते. या पर्जन्यमानावर एखाद्या पाणलोट क्षेत्रातील एकूण पाणलोट ठरविला जातो.
Water Management
Water ManagementAgrowon

डॉ. सचिन शिंदे, प्रा. प्रवीण मताई

Water Planning : जमिनीची जलधारणाशक्ती व निचराशक्ती यावर त्या जमिनीतील जलअंत:सरणाचे प्रमाण ठरते. जमिनीची जलधारणाशक्ती जर जास्त असेल तर पावसाच्या पाण्याचा बराचसा मोठा भाग ती शोषून घेईल. परंतु अशा जमिनीत पाण्याचा नैसर्गिक निचरा होत नसल्याने पाण्यामुळे त्या नापिक होण्याचा धोका असतो.

ज्या जमिनीची निचराशक्ती जास्त असेल अशा जमिनीत जास्तीत जास्त पाणी जिरविले जाईल. भूपृष्ठावरुन वाहणारा पाणलोट कमी होईल. ज्या जमिनीची जलधारणा व निचरा अशी दोन्ही क्षमता कमी असतील अशा जमिनीवरून वाहणारा पाणलोट जास्त असेल.

१) भूगर्भ - भूगर्भाचे स्तर व खडक यावर मातीचा प्रकार अवलंबून असतो. म्हणून याचाही अभ्यास करणे पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचे दृष्टीने महत्त्वाचे आहे.

२) मातीची खोली - मातीची खोली देखील जमिनीची धूप, तिच्यावरून वाहणारा पाणलोट इत्यादी बाबींवर परिणाम करणारा एक घटक आहे. याचाही अभ्यास मृद्‍ सर्वेक्षणात केला जातो.

Water Management
Water Conservation Scheme : जल संवर्धन योजनांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

३) पर्जन्यमान - पर्जन्य हा पाणलोटाचे व जमिनीच्या धुपेचे प्रमाण ठरविणारा सर्वांत मोठा व अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तेव्हा पाणलोट क्षेत्रातील पर्जन्याचा अभ्यास केल्याशिवाय पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचे नियोजन करणे केवळ अशक्य आहे. पर्जन्याचे अनेक गुणधर्म वेगवेगळ्या प्रकारे पाणलोटाच्या परिमाणावर व जमिनीच्या धुपीवर परिणाम करीत असतात.

- पर्जन्यमान म्हणजे भूपृष्ठावर पडणारे पावसाचे पाणी. ते मिलिमीटरमध्ये मोजले जाते. पृष्ठभागाच्या ठरावीक क्षेत्रावर जितक्या जाडीचे पावसाचे पाणी ठरावीक कालावधीत पडते, ते त्या संपूर्ण क्षेत्राचे त्या कालावधीचे पर्जन्यमान समजले जाते.

- संपूर्ण वर्षात ठरावीक दिनांकापर्यंत अशा प्रकारे मोजलेले पाणी म्हणजे त्या दिनांकापर्यंतचे संचित पर्जन्यमान व संपूर्ण वर्षात पडलेल्या अशा प्रकारे मोजलेल्या पावसाचे एकूण पर्जन्य म्हणजे त्या क्षेत्राचे वार्षिक पर्जन्यमान समजले जाते.

- मागील काही वर्षांत पडलेल्या पर्जन्याची सरासरी काढून त्या क्षेत्राचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ठरविले जाते. या पर्जन्यमानावर एखाद्या पाणलोट क्षेत्रातील एकूण पाणलोट ठरविला जातो.

पर्जन्य कालावधी

- पाऊस सहसा सतत पडत नाही, तर काही वेळा पडून थांबतो, नंतर काही वेळाने पुन्हा पडू लागतो. जितक्या काळापर्यंत पाऊस एका वेळी पडत रहातो त्यास पर्जन्यकाळ असे म्हणतात. जर पर्जन्यकाळ कमी असेल तर, जास्तीत जास्त पाणी जमिनीत शोषले जाते. भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पाणलोटाचे प्रमाण कमी होते.

- पर्जन्यकाळ जर जास्त असेल तर जमीन संपृक्त होत जाऊन तिची पाणी शोषण्याची क्षमता कमी कमी होत जाऊन संपुष्टात येते.

४) पर्जन्य घनता

- पर्जन्य घनता म्हणजे ठराविक काळात पडलेले पर्जन्यमान. याची गणना साधारणपणे दर ताशी मि.मी. अशी केली जाते. एका विशिष्ट तासात पडलेले एकूण पर्जन्यमान म्हणजे त्याची त्या तासातील पर्जन्य घनता.

- पर्जन्यघनता ठरविण्यासाठी स्वयंचलित आरेखन प्रकारच्या पर्जन्यमापक उपकरणाचा वापर करावा लागतो. यातील आलेखावरून प्रत्येक दिवसाच्या, प्रत्येक तासाची पर्जन्य घनता काढली जाते. संपूर्ण वर्षात ज्या तासात अशा प्रकारे जास्तीत जास्त पर्जन्य घनता आढळली असेल, ती त्या वर्षाची त्या पाणलोट क्षेत्राची महत्तम पर्जन्य घनता धरली जाते. अशा मागील काही वर्षांच्या (उदा.१०, २५, ५०) पर्जन्य घनता धरुन त्यातून जी सर्वांत जास्त असेल ती, त्या कालावधीची प्रत्यावर्ती शिखर घनता समजली जाते.

- मृद्‍संधारण उपाययोजनांचे आकृतिबंध ठरविण्यासाठी साधारणपणे १० ते २५ वर्षे कालावधीची प्रत्यावर्ती शिखर पर्जन्य घनता विचारात घ्यावी लागते.

Water Management
Catchment Area : पाणलोट क्षेत्राचे गुणधर्म तपासणे का आहे आवश्यक?

५) वारंवारता

-प्रतिवर्षी एकूण पडलेले पर्जन्यमान विचारात घेऊन मागील काही वर्षांतील (उदा.१०, २५, ५०) जास्तीत जास्त पर्जन्यमान म्हणजे त्या पर्जन्यमानाची वारंवारता होय. उदा. एखाद्या क्षेत्राचा १२५० मि.मी. पर्जन्यमानाची वारंवारता म्हणजे जास्तीत जास्त १२५० मि.मी.पाऊस हा त्या क्षेत्रात १० वर्षांतून एकदाच पडतो.

६) वितरण

- पाऊस संपूर्ण क्षेत्रात सारखाच पडत नाही किंवा प्रत्येक वेळीही सारखा पडत नाही, तेव्हा ज्या भागात आणि ज्या काळात तो जसा जसा पडत असेल त्या प्रमाणे त्याचे वितरण ठरते.

- पर्जन्याचे गुणधर्म हे सर्वसाधारणपणे एकमेकांशी निगडित असतात. यासाठी काही ठोकताळे लक्षात ठेवणे उपयुक्त ठरेल.

संपर्क - डॉ. सचिन शिंदे, ९४२१६१८७९० - (विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी), कृषी विज्ञान केंद्र, लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com