Rural Migration : ग्रामीण महाराष्ट्रातल्या स्थलांतराचा पॅटर्न

Rural Entrepreneurship : एकूणच बाजेला ग्रामीण भागात मोठी मागणी आहे. या मागणीची गरज राजस्थानमधील बेरोजगार तरुणांनी हेरली. त्यानुसार बाजेच्या पुरवठा करण्याचा व्यवसाय स्वीकारला.
Rural Entrepreneurs
Rural Entrepreneurs Agrowon
Published on
Updated on

Rural Employment Crisis : मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मी गावी (मुंडेवाडी, ता. केज, जि. बीड) गेलो होतो. अगदी सकाळीच साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एक तरुण बाज विकण्यासाठी मोटार सायकलवरून घराच्या दारासमोर आला आणि म्हणाला ‘बाज घ्या. आठ किलो लोखंडाचे वजन आणि दोन किलो पट्टीचे अशी दहा किलो वजनाची आहे.’ मी म्हणालो, ‘कितीला देताय?’ तरुण म्हणाला, ‘एक हजार रुपयांना.’ मी म्हणालो, ‘एक द्या.’ वडिलांचे वय ७५ झालेले असल्याने, त्यांना हलकी कोणीकडेही उचलता येईल अशी बाज हवीच होती. म्हणून बाज घेण्याचा निर्णय घेतला. बाजेचे सर्व साहित्य सुट्टे होते, त्यामुळे त्या साहित्याची जोडणी आणि विणकाम करण्यासाठी अर्धा तास लागला.

बाजेचे विणकाम करताना तरुणाची आणि माझी बरीच चर्चा झाली. या चर्चेतून तरुणाचे नाव, सुरेश प्रजापती, ३० वर्षे वयाचा, रा. चितोड (राजस्थान) जिल्ह्यातील एक खेडेगाव ही माहिती मिळाली. गेल्या एक महिन्यापासून बहुतांश खेड्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या केज (तालुका ठिकाण) या ठिकाणी मुक्काम होता.

सुरेश यांचे तालुक्यातील प्रत्येक खेडेगावात फिरून झाले होते. पुढील एक महिन्यात गंगाखेड (जि. परभणी) येथे एक महिना राहणार. तसेच हळूहळू उत्तरेकडे जात शेवटी राजस्थानला घरवापसी असे त्यांचे नियोजन होते. सुरेश यांच्या बरोबर इतरही चार तरुण आलेले होते. एकूण पाच तरुणांचा ग्रुप तयार करून या व्यवसायात उतरलेले.

सर्व जण दिवसभर स्वतंत्रपणे फिरून बाज विक्री करत, संध्याकाळी एकत्र येऊन मुक्काम करायचा असे दिवसभराचे नियोजन असे. बाज विक्रीच्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने, गेल्या तीन वर्षांपासून येणे चालू आहे. महाराष्ट्रातील बीड, धाराशिव, परभणी, जालना, हिंगोली, बुलडाणा जिल्ह्यांमध्ये एकूण सात-आठ महिने व्यवसाय आणि उरलेले चार महिने गावी असे त्यांचे वर्षाचे नियोजन ठरलेले.

बाज विकणे आणि विणणे या व्यवसायाविषयी सुरेश सांगतो, की ‘दिवसभर फिरून दिवसाला ९०० ते १००० हजार रुपये मागे राहतात. त्यातील ३०० रुपये पेट्रोलला जातात. रूमभाडे, जेवण असे ४०० ते ४५० रुपये जातात. २५० ते ३०० रुपये शिल्लक राहतात. तेवढ्यात समाधान’. बाजेचे साहित्य लोखंडी नळ्या आणि पट्ट्या खरेदी करून आणण्याविषयी विचारले असता, बाजेचा हा सर्व माल (साहित्य) गुजरात राज्यातील राजकोट येथे तयार होतो.

तेथून कंत्राटदारांच्या मार्फत आमच्यापर्यंत पोहोचतो. दिवसभर फिरून बाज विक्री करण्यातून मिळणाऱ्या मजुरीविषयी सुरेश म्हणतो, की ‘फार काही शिल्लक राहत नाही. फक्त बाज विणण्याची मजुरी शिल्लक राहते. तीही प्रति बाज १५० ते २०० रुपये मिळते. त्यासाठी दिवसभर फिरावे लागते, फिरून बाज विकणे हे काम जिकरीचे आहे.

Rural Entrepreneurs
Tribal Migration : आदिवासींचे स्‍थलांतर थांबणार

बाज घेणारा ग्राहक सांगितलेल्या किमतीमध्ये काहीतरी कमी करून मागतोच. त्यामुळे थोडेफार कमी करून व्यवहार केला जातो. अंगावर घेऊन बाज विक्री करावी लागते. कधी कधी तर मुद्दल रकमेवर चार पैसे जास्तीचे मिळाले तरीही बाज देऊन टाकतो. कारण काहीच न मिळण्यापेक्षा काहीतरी मिळतात यात समाधान मानावे लागते.’ राजस्थानमध्ये हा व्यवसाय का करत नाहीत असा प्रश्‍न विचारला असता सुरेश म्हणाला, की आमच्या परिसरात (राजस्थानमध्ये) काहीच कामधंदा नसल्यामुळे इकडे पोट भरण्यासाठी आलो आहोत.

बाजेचे म्हणाल तर प्रत्येक घरात बाज असल्याचे दिसून येते. त्यामुळे तेथे विक्रीस, व्यवसायाला संधी नाही. सुरेश म्हणाला, ‘शहरातील नोकरी–कामधंदा, बिगारी कामापेक्षा ग्रामीण भागातील बाज विकण्याचे काम चांगले आहे. अंगावरील काम आहे, मालक कोणी नाही, तसेच रोजच्या रोज पैसे हातात मिळतात.’ एकूणच शहरी बिगारी काम, असंघटित-सेवा क्षेत्रातील रोजंदारी करण्यापेक्षा ग्रामीण भागातील बाज विक्रीचा व्यवसाय बरा असा बोलण्याचा रोख होता.

बाज विक्रीचा व्यवसाय असला तरीही हातावरील पोट आहे हे मात्र निश्‍चित. हातावरील पोट म्हटले की काम, श्रम, मेहनत, वेळ देणं, संयम बाळगणे अशा अनेक बाबी आल्या. एकूणच बाजेला ग्रामीण भागात मोठी मागणी आहे. या मागणीची गरज राजस्थानमधील बेरोजगार तरुणांनी हेरली. त्यानुसार बाजेच्या पुरवठा करण्याचा व्यवसाय स्वीकारला. यासाठी बाजेचा माल गुजरातमधून घेतला आणि मराठवाड्यासारख्या मागास, गरिबी, कोरडवाहू परिसरात विक्रीसाठी आले. ग्रामीण भागात इतरही अनेक सेवा पुरवठा करणारे तरुण बाहेरच्या राज्यांतून येतात.

उदा. स्टील व प्लॅस्टिकची भांडी विकणे, प्लॅस्टिकची चटई, मच्छरदाणी, छोट्या मुलांचे कपडे, रग, साड्या विकणे, भंगार गोळा करणे व इतर. एकूणच ग्रामीण भागातील रहिवाशांच्या नजरेतून कमी प्रतिष्ठा असलेला कामधंदा, सेवा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी स्थानिक तरुणांकडून भरून काढली जात नाही. मात्र उपजीविकेसाठी हीच संधी बाहेरील राज्यातील तरुणांनी हेरली आहे.

स्थानिक नजरेतून प्रतिष्ठा असलेले किराणा दुकान, पान टपरी, हॉटेल, कपड्याचे दुकान, मेडिकल, आटो सर्व्हिस अशा व्यवसायामध्ये स्थानिक तरुण उतरत आहेत. मात्र या उतरलेल्या सेवा क्षेत्रातील व्यवसाय थोडा चांगला होऊन चार पैसे मिळायला लागले की दुसरा कोणीतरी तरुण त्याच व्यवसायात उतरून स्पर्धा निर्माण करतो. उदा. अंदाजे १८०० लोकसंख्या असलेल्या मुंडेवाडी (ता. केज) या गावात १५ वर्षांपूर्वी एकच किराणा दुकान होते, आता पाच किराणा दुकान झाले आहेत.

Rural Entrepreneurs
Labour Migration : सातपुड्यातील मजुरांचे स्थलांतर

एकूणच स्पर्धा निर्माण करून व्यवसाय मारला जातो. परिणामी, तरुणांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न सुटताना दिसून येत नाही. अशीच स्थिती इतरही खेडेगावांत असल्याचे दिसून येते. पोटा-पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी पर्याय म्हणून तरुण पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व इतर शहरात रोजगारासाठी स्थलांतर करतात.

ज्या तरुणांकडे श्रम, अंगमेहनत करण्याची इच्छा आहे ते ऊस तोडणीसाठी पश्‍चिम महाराष्ट्र, कर्नाटक (बागायती, ऊस उत्पादक परिसर) येथे हंगामी काळासाठी ऊस तोडणीच्या मजुरीसाठी स्थलांतर करतात.

कारण स्थानिक लोकांना त्यांच्या नजरेत कमी प्रतिष्ठा असलेला व्यवसाय, मजुरी किंवा कामधंदा करण्यास संकोच वाटतो, कमीपणाचे वाटते. कारण समाजात, भावकीमध्ये श्रम, अंगमेहनत करणाऱ्यांना प्रतिष्ठा नाही असा समज आहे. शिवाय जास्तीचा पैसा मिळतो असे वाटत नाही.

एकूणच पोटाचा, उपजीविकेचा गंभीर प्रश्‍न असतानाही स्थानिक तरुण कोठेतरी व्यावसायिक-आर्थिक प्रतिष्ठा आणि नोकरी (गुलामी) याच मागे धावताना दिसून येतो. राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेने रोजगाराचा, पोटाचा आणि उपजीविकाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी केवळ स्थलांतर करणे हा पर्याय दिलेला आहे.

तरुणांना शहरात स्थलांतर करून करावी लागणारी बिगारी कामे, असंघटित- सेवा क्षेत्रातील रोजंदारीची कामे प्रतिष्ठेची वाटतात. एकूणच मराठवाड्यातील कोरडवाहू-दुष्काळी नाहीतर बागायती परिसरातील प्रत्येक गावातून किमान २०० ते २५० कुटुंबे शहरामध्ये बिगारी कामे, संघटित किंवा सेवा क्षेत्रातील रोजंदारी करताना दिसून येतात. त्यामुळे शेतमजुरांची, सेवा व्यवसाय पुरवठा याची टंचाई, पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी इतर राज्यातील (राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश) मजूर भरून काढताना दिसून येतात. अलीकडे शेतीत सालकरी, शेतमजुरीत देखील बाहेरील राज्यातील तरुण, मजूर उतरलेले दिसून येत आहेत.

सारांशरूपाने, बाज विकण्याचा आणि विक्री करण्याचा व्यवसाय स्थानिक तरुण देखील करू शकला असता, पण तो हे करत नाही. कारण हे काम कौशल्याचे आणि प्रतिष्ठा असलेले काम नाही असे स्थानिक तरुणांच्या मानसिकतेत बसलेले आहे. मात्र हा व्यवसाय बाहेरच्या राज्यातील तरुणांनी, मजुरांनी स्वीकारला. एकंदर कामधंदा, व्यवसाय, प्रतिष्ठा आणि मिळणारा मोबदला यानुसार स्थलांतराचा एक पॅटर्न पुढे येतो.

स्थानिक तरुण, मजूर प्रतिष्ठा, आर्थिक मोबदला आणि कामाचा दर्जा यानुसार कामधंदा, व्यवसाय स्वीकारतात किंवा उपजीविकेसाठी शहरात किंवा राज्यातील सधन परिसरात शेतमजुरीसाठी स्थलांतर करतात. तर इतर राज्यांतील तरुण, बेरोजगार, मजूर हे मागास, कोरडवाहू-दुष्काळी परिसरात कामधंदा, व्यवसाय यांची संधी शोधून स्थलांतरित होत आहेत. हे तरुण अंग मेहनत, श्रम करत शेतीतील कामे, कमी प्रतिष्ठा असलेले व्यवसाय उपजीविकेचे साधन म्हणून स्वीकारताना दिसून येतात.

(लेखक शेती, पाणी आणि मजुरांच्या प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com