Agriculture Water Management : पाण्याचा काटेकोर वापर ही काळाची गरज

Water Conservation : प्रत्येक शेतकरी आणि कारखानदाराने पाण्याच्या उत्पादकतेकडे अधिकाधिक लक्ष द्यावे. खरेतर त्यात त्यांची आर्थिक समृद्धीही अवलंबून आहे. शेतीतील तंत्रज्ञान आणि पाण्याचे तंत्रज्ञान हे देखील पाण्याच्या अधिकाधिक उत्पादकतेकडे नेण्याकडेच असावे.
Agriculture Water Management
Agriculture Water ManagementAgrowon

सतीश खाडे

Agriculture Water Conservation and Technology : दरडोई जलपदचिन्ह त्या देशातल्या लोकांच्या जीवनशैलीवर ठरतेच, तसेच इतर महत्त्वाच्या घटकांचा त्यावर प्रभाव पडतो. या सर्वांचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन नियोजन करावे.

वस्तू आणि सेवांची सरासरी मागणी

ही मागणी जीवनशैलीवर अवलंबून असते. अत्यावश्यक बाबींबरोबरच मनाचे खेळ आणि मन रिझविण्यासाठी मात्र अधिक वस्तूंची निर्मिती होत असते. त्यातूनच अनेक सेवांची ही गरज निर्माण केली जाते. यातूनच वैयक्तिक, समूह आणि राष्ट्राचा जलपदचिन्ह निर्देशांक वाढत जातो. समाधानी आणि सर्वांत आनंदी असणाऱ्या भूतान देशाचा दरडोई आणि राष्ट्रीय जलपद चिन्ह निर्देशांक खूपच कमी आहे. भारताचे जलपद चिन्ह जगात सर्वात जास्त असले, तरी लोकसंख्येमुळे दरडोई जलपदचिन्ह कमी आहे.

हवामान

उष्ण व समशीतोष्ण प्रदेशात पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होते. विशेषतः शेतातल्या पाण्याचे. त्यामुळे शेतीला अधिक पाणी लागते. भारत, इस्राईल, आफ्रिका, आखाती देश यामध्ये युरोपच्या तुलनेत शेतीला अधिक पाणी लागते.

याच कारणामुळे या देशांच्या पारंपरिक शेतीत कमी पाण्यावर येऊ शकणाऱ्या विविध धान्यांचा समावेश होता. पण आता हवामानाला न जुमानता शेती होत आहे, त्यातून पाणी मागणी वाढली आहे.

शेती पद्धती आणि सिंचन

आपल्याकडे अद्यापही सत्तर टक्के शेतीला पाट पद्धतीने पाणी दिले जाते. सूक्ष्म सिंचन पद्धतीचा स्वीकार तीस ते बत्तीस टक्के लोकांनी केला आहे. तोही केवळ साधनांपुरताच. खऱ्या अर्थी गरजे इतकेच पाणी पिकांना देण्याची पद्धती अजूनही अंगीकारली गेलेली नाही.

त्यामुळे आपली शेतीतील पाण्याची उत्पादकता ही प्रगत देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे आपले शेतीमालाचे जलपदचिन्ह हे जास्त आहे.

Agriculture Water Management
Agriculture Water Management : उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर महत्त्वाचा

मांसाहार आणि पाणी गरज

२०५० पर्यंत पृथ्वीची लोकसंख्या सुमारे एक हजार कोटी होईल. या लोकसंख्येचा पर्यावरणीय भार आणि पाणी वापर कमी करण्यासाठी मांसाहारात लक्षणीय घट होणे आवश्यक आहे. कारण मांसाहारासाठी पशुपालनात प्रचंड वाढ झाली आहे आणि त्याचे खाद्य शेतीतूनच उत्पादित केले जाते.

आज जगातील एकूण जमिनीच्या ८० टक्के भागावर चारा शेती होते आणि त्यात त्यातून मानवी अन्नातील फक्त १८ टक्के कॅलरी आणि ३७ टक्के प्रथिने मांसाहारातून मिळतात. मांसाहारात बीफचे प्रमाण फक्त २४ टक्के आहे, पण त्यासाठी जगभरातील मिळून तीन कोटी चौरस किलोमीटर जमीन आज वापरली जात आहे.

हे प्रमाण जगातल्या शेत जमिनीच्या जवळ जवळ ६० टक्के आहे. इतके क्षेत्र बीफ उत्पादनात वापरूनही मानवी अन्नात बीफमधून किती कॅलरीज मिळतात, तर फक्त दोन टक्के!

भारतीय शेती क्षेत्राचा ही मोठा हिस्सा पशुखाद्यासाठी वापरला जातो. असे असूनही भारतातील पशुखाद्याची मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत आहे. त्यामुळे येत्या काळात भारताची शेतजमीन आज आहे, यापेक्षाही कितीतरी जास्त प्रमाणात पशुखाद्यासाठी वळवली जाणार आहे.

याचा सारांश म्हणजे समृद्धी वाढत जाईल तसा मांसाहार करणारी लोकसंख्या वाढत जाईल, त्यातून पशुखाद्य आणि जनावरांसाठी लागणारे पाणी याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढेल, यातून पाण्याची तूट मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळे शाकाहाराचा प्रसार होणे अत्यावश्यक झाले आहे.

व्यापारातून होणारा आभासी जलप्रवाह

आयात निर्यातीतून ही आभासी पाण्याची बेरीज वजाबाकी होते. अमेरिकेतील बाजारपेठेच्या मागणीचा बहुतांश पुरवठा चीनमधून होत असल्याने चीनच्या पाण्याचा आभासी प्रवाह अमेरिकेत जात आहे. आपल्या देशातूनही निर्यात होणाऱ्या विविध उत्पादने हे आभासी पाणी प्रवाह तिकडे जातो.

जॉर्डनसारख्या पाण्याचे दुर्भिक्ष असलेला देश भरमसाठ पाणी लागणारी कृषी उत्पादने आयात करून आपल्या देशाला तीव्र पाणीटंचाईतून वाचवतो. याचाच अर्थ तो देश दुसऱ्या देशाचे पाणी धान्य व भाजीपाला, मांस रूपाने आपल्या देशात आणत आहे.

योग्य सरकारी धोरणाची आवश्यकता

पाण्याच्या अयोग्य वापराबाबत खूप गंभीरतेने दखल घेऊन कृती कार्यक्रम आखायला हवा. जल व्यवस्थापनाच्या मूलभूत तत्त्वात याचा समावेश करायला हवा. भारतासारख्या मोठ्या देशात तर जलपद चिन्हाच्या आधारावर विविध उत्पादनांसाठी क्षेत्र विभागून देता येईल.

जास्त पाणी लागणारी उत्पादने, औद्योगिक उत्पादन केंद्र, यांना योग्य राज्यात योग्य भागात उभारणी करण्यासाठी नियोजन व प्रोत्साहन आणि नियम कायदे करायला हवेत.

Agriculture Water Management
Water Management : सृष्टी गिळू पाहणारा माणसाचा पाणी वापर!

उत्पादनांची आयात निर्यात

पाणी व्यवस्थापनाच्या सर्व चर्चेत आपण कायमच फक्त आणि फक्त मानव केंद्रितच विचार करतो. निसर्गातील पाणीसाठा आणि विविध बायोमास यांच्यावर खरंतर सर्वसृष्टीची ही मालकी आहे.

इतर सर्व जीवसृष्टीला फक्त पिण्यासाठीच पाणी लागते आणि माणसाला पिण्याला फक्त तीन लिटर पण रोजच्या वापरासाठी ५५ ते १३५ लिटर आणि अप्रत्यक्ष वापरासाठी तर अडीच हजार ते साडेदहा हजार लिटर पाणी लागते. पाणीच काय पण पृथ्वीवरच्या एकूण बायोमासच्या ६० टक्के बायोमास फक्त माणूसच वापरतो.

आम्ही धरणे बांधली, प्रवाह थांबवले, त्यामुळे प्रवाह, नद्या कोरड्या पडल्या. तसेच जवळ जवळ सर्वच प्रवाह आम्ही प्रदूषित केले आहेत. यामुळे जलचरांची संख्या आणि त्यांच्या प्रजातींची ही संख्या वेगाने कमी होते आहे. त्यामुळे अन्नसाखळ्या तुटल्या आहेत आणि पुढे तुटतच राहतील. माशांचा दुष्काळ, इतर सागरी खाद्याचा दुष्काळ हळूहळू सगळ्या जगात जाणवू लागला आहे. या सर्व घटनांचा परिपाक म्हणून मानवी आरोग्य आणि मानवी जीवन धोक्यात आहे, हे नाकारून चालणार नाही.

आपण काय करायला हवे?

जलपद चिन्हावरून पाणी वापरायचा अतिरेक व त्याचे गंभीर परिणाम लक्षात घेता विविध पातळीवर काय काय करायला याबाबत सर्वांनी विचार करावा.

व्यक्तिगत पातळीवर कमीत कमी वस्तूंचा वापर करावा. तसेच अधिकाधिक टिकाऊ वस्तूंची खरेदी व त्यांचा वापर हे सर्वांत प्राथमिक कर्तव्य असले पाहिजे. याला सर्वांत अधिक प्राथमिकता हवी.

प्रत्येक शेतकऱ्याने आणि कारखानदाराने पाण्याच्या उत्पादकतेकडे अधिकाधिक लक्ष द्यावे. खरेतर त्यात त्यांची आर्थिक समृद्धीही अवलंबून आहे. तसेच शेतीतील तंत्रज्ञान आणि पाण्याचे तंत्रज्ञान हेही पाण्याच्या अधिकाधिक उत्पादकतेकडे नेण्याकडेच असावे.

सर्वांनी प्रत्यक्ष पाणी वापरातही काटेकोरपणे वागले पाहिजे. पाणी वापरावर नियंत्रित करणे गरजेचे आहे.

शाकाहारी खाद्य संस्कृतीवर अधिकाधिक भर द्यायला हवा. तसेच कमी पाण्यावर येणाऱ्या धान्य व इतर कृषी उत्पादनांवर भर द्यायला हवा. समाजातल्या प्रत्येक घटकाला यावर जागरूक करणे आवश्यक आहे.

शालेय अभ्यासक्रमात समावेश करायलाच हवा.

पॅकिंग केले जाणाऱ्या प्रत्येक कृषी व औद्योगिक उत्पादनावर त्यासाठी वापरले गेलेले पाणी म्हणजेच ‘जलपद चिन्ह’ आकडा छापला जावा. तसेच ऊर्जा पदचिन्ह व कार्बन पदचिन्हाचा खरेतर समावेश हवा. यातून पर्यावरण व पाणी जागरूक ग्राहक तयार होऊन उत्पादकांवर अप्रत्यक्षरीत्या पाणी वापरावर नियंत्रण येईल.

देशाची खाद्य संस्कृती

मांसाहारी अन्न उत्पादनात शेतीच्या कित्येक पट अधिक पाणी लागते. एका संशोधनात असेही निदर्शनास आले, की देशातील समृद्धी वाढत असल्यास तेथे मांसाहार वाढत जातो. संशोधनात चीनची आकडेवारी दिली आहे १९९३ मध्ये चीनमध्ये वर्षभरात दरडोई ३.८ किलो मांस खाल्ले जायचे, तर ते आज ५२.४ किलो इतके झाले आहे.

भारतातही परिस्थिती अशीच बदललेली दिसते. जितके जास्त मांसाहार तितकी जास्त जनावरे, तर जितकी जास्त जनावरे तितकी जास्त शेती त्यांच्या खाद्यासाठी लागते, त्यामुळे तितकी जास्त जंगल तोड, तसेच खाद्यासाठी भरमसाट लागणारे पाणी यातून जलपद चिन्हाचा आकडा वाढत राहतो. आपणही भरड धान्याकडून गव्हाकडे वळलो आणि पाणी मागणी वाढवून बसलो आहोत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com