
समीर गायकवाड
Rural Story : पंच्याहत्तरी पार केलेला मारूतीबप्पा घुले भेलकांडतच गोठ्यात पोहोचला आणि श्रीमंत्याच्या वशिंडीवर डोकं टेकवून उसासे सोडू लागला. श्रीमंत्यानं आपलं डोकं हलवलं, निमुळती टोकदार शिंगं अज्जात आपल्या धन्याच्या छातीपाशी नेऊन घुसळली, शेपटीचे फटकारे सुरु केले. त्याला बावरलेलं पाहून बप्पा कासावीस झाला. बप्पानं धोतराच्या सोग्याने श्रीमंत्याच्या अश्रूंना आवर घातला. त्याच्या पाठीवर थापटलं, गळ्यातल्या पन्हाळीला आल्हाद कुरवाळलं.
श्रीमंत्याला जोजवून झाल्यावर तो कोपऱ्यात बसून असलेल्या यमुनेजवळ गेला. गाभण असलेल्या यमुनेचं हे अखेरचं वेत होतं. आता मध्येच विघ्न आलं होतं. संतोषनं तिला सकाळीच स्वच्छ धुऊन, नवी वेसण घालून, शिंगं घासून तयार ठेवली होती. तिला पाहून बप्पाच्या डोळ्यात मळभ दाटलं. त्यानं आपलं मस्तक अलगद तिच्या पोटावर टेकवलं.
काही तरी बिनसल्याच्या जाणिवेने यमुना व्याकुळली. मान वळवून तिने आपल्या खरबरीत जिभेने बप्पाचे सुरकुतले हात चाटायला सुरुवात केली. मग मात्र बप्पाच्या काळजाचा बांध फुटला आणि तो नेणत्या लेकरागत रडू लागला.
कुंबीमागून चोरून हे दृश्य पाहणाऱ्या संतोषचेही डोळे एव्हाना भरून आले. डोळे पुसतच तो निघाला. त्यानं सायकल काढल्याचा आवाज येताच बप्पा गोठ्यातून धावतच बाहेर आला. त्याला हाका मारू लागला. ओरडून ओरडून त्याचा श्वास कंठाशी आला. त्याच्या हाळ्यांनी संतोषच्या काळजात जणू गिरमिट फिरत होतं.
अक्षरशः प्राण पायात आणून तो सायकल चालवत होता, मात्र पायातली ताकदच गळून गेली होती. जसजसं शेत मागे पडत गेलं तसा त्याच्या कानी येणारा बप्पाचा आवाज क्षीण होत गेला. कसंबसं घरी पोहोचताच पवनाआज्जीच्या कुशीत शिरून तो ढसाढसा रडला. पवनाबाई धीराची होती. तिनं नातवाला समजावलं.
बप्पाचं वडिलोपार्जित शेत होतं. भावकीतल्या वाटण्यात आटत जाऊन ते अवघं दीड एकर उरलेलं. त्यांची दोन्ही मुलं शहरांत विस्थापित होऊन छोट्या मोठ्या कामावर गुजराण करून स्थिरावली होती. मुलींची लग्नं झाली होती. थोरल्या पोराचा मुलगा संतोष हा बप्पांचा ज्येष्ठ नातू. त्याचा बापापेक्षा आज्ज्यावर जास्ती जीव होता.
मातीची ओढ अधिक असल्यानं तो गावीच राहिलेला. मागच्या तीन वर्षात घुल्यांच्या कुटुंबाला तंगीनं ग्रासलं होतं. रान कसत नसल्यानं श्रीमंत्या आणि कारभाऱ्या या जोडीवर ते जगत होते. लोकांचे सांगावे आले, की त्यांच्या रानात जाऊन घाम गाळत होते. या चारदाती खिल्लार बैलांत अजस्र ताकद होती.
ढेकळाच्या रानात औत ओढताना त्यांच्या तोंडातून फेसाच्या तारा गळत पण कधी शेपूट पिळावं लागलं नव्हतं की कधी त्यांच्या रेशमी कातड्यावर चाबकाची वादी कडाडली नव्हती. चार महिन्याची खोंडं असताना त्यांना घोडेगावच्या बाजारातून आणलेलं, तेव्हापासून घुल्यांच्या दावणीची ते शान होते.
पण एकेदिवशी आगळीक झाली. ऐतवारच्या चाऱ्यासोबत विषारी आकट्याचं गवत आलं. ते गवत खाताच कारभाऱ्याला विषबाधा झाली. पोट पखालीसारखं फुगलं. कारभाऱ्या तापानं फुलला. डोळे पांढरे झाले. गुरांच्या डॉक्टरांना आणलं. त्यांनी शर्थीचे उपाय केले; पण कारभाऱ्या वाचला नाही. घुल्यांवर आभाळ कोसळलं.
जिवाभावाचा माणूस जावं तसा त्यांच्या घरानं शोक केला. कारभाऱ्या गेल्यापासून श्रीमंत्याचे डोळे रात्रंदिवस पाझरू लागले. इकडं गावात नांगरणीची कामं जोरात आली होती. बप्पाने आगाऊ रक्कम घेतली होती. लोकांनी तगादा लावताच बप्पा कातावून गेला. कारभाऱ्याचं दुःख करावं की लोकांच्या प्रश्नांना तोंड द्यावं, याचं कोडं त्याला सुटेनासं झालं. शेतावर, घरावर कर्ज होतं. सोसायटीचं देणं होतं. पवनेच्या अंगावर गुंजभर सोनं नव्हतं. आता काय करायचं हा सवाल नागफण्यासारखा त्याच्या डोक्यात ठाण मांडून होता.
अखेर संतोषनं तोडगा काढला. यमुना आणि तिचं आठ महिन्याचं खोंड विकलं तर निदान एखादा सहादाती बैल तरी घेता येईल. लवकर बैल आणला नाही तर श्रीमंत्याच्या जीवावर यायचं. त्यानं काढलेला धोसरा त्याच्या जिवावर बेतला तर सगळा खेळ खल्लास होणार होता. बप्पा याला राजी नव्हता; पण त्याच्या समोर दुसरा पर्यायही नव्हता.
यमुनेच्या आधीच्या चार पिढ्या घुल्यांच्या दावणीत चरल्या होत्या. तिच्यावर बप्पाचा अफाट जीव होता. आता ती पोटुशी झाल्यावर तिला विकायला काढायचं, हेच त्याला सहन होत नव्हतं. घरादारावर नांगर फिरलेला बघायचं बळ त्याच्या अंगी नव्हतं.
संतोषलाही या निर्णयाचं दुःख होतं. त्या रात्री सवन्यातून चादंण्या घरभर नाचत होत्या तरी शून्यात नजर लावलेला बप्पा निपचित पडून होता. काही केल्या यमुना त्याच्या डोक्यातून जात नव्हती. तो रात्रभर कूस बदलत पडून होता. पहाटेच्या सुमारास त्याला झोप लागली. दुसऱ्या दिवशी बऱ्याच उशिरा त्याला जाग आली.
तो जागा होण्याआधीच टेम्पो घेऊन संतोष शेताकडे गेलेला. जड मनानं त्यानं यमुनेला टेंपोत चढवलं. तिच्या पाठीवरून हात फिरवताना तो अक्षरशः ढसाढसा रडला. तिच्या पाया पडला. टेंपो सांगोल्याच्या बाजाराच्या दिशेने गेला.
गुरांच्या बाजाराहून संतोषला परतायला बराच उशीर झाला होता. त्यामुळे त्याला बघताच व्याकुळलेल्या पवनाबाईचा जीव भांड्यात पडला. नवीन बैल श्रीमंत्याच्या शेजारी बांधूनच तो घरी आला होता.
स्वयंपाक होताच दोघांची ताटं वाढून झाली. घास मोडत संतोष सांगू लागला, “बैल वाईच थोराड हाये पर अजूक चारेक वर्षे त्याचं खांदं उतरणार न्हाईत..’’ बोलताना त्याची नजर बप्पाकडे होती. हातातला घास ओठापाशी नेऊन बप्पा म्हणाला, ‘‘यमुना राजीखुशीनं टेम्पोत चढली का रं? कशी असंल ती? कुठं असंल? माज्या बिगर चारा खाईल का? माजी माय गं ती... मला एक डाव माफ कर गं बाय ... ’’ बप्पा पुन्हा रडू लागला. त्यासरशी पवनाबाई त्याच्याजवळ गेली.
“ती आपली मायच हाय... आपल्या लेकरासाठी तिनं स्वतःला बाजारात हुभं केलं. जीव इकला पर आपल्या लेकराचं संकट निवारलं की नाय? आपली मायच हाय ना ती ! द्येवाची मर्जी जिकडं झाली तिकडं ती ग्येली.. आपण काळजाला बाभळ का टोचून घ्यायची? येत्या वर्षी संतोष नवी कालवड आणंल मग आपली यमुना तिच्या पोटी जल्माला यील..
आपण तिची सेवा करू...असं नेणत्या लेकरावाणी रडू नये... भरल्या ताटावर आसवं गाळू नये.. तिकडं यमुनेला वाईट वाटंल नव्हं !...’’ पवनाबाईने कशीबशी समजूत घातल्यावर त्या दोघांनी चार घास पोटात ढकलले.
ती रात्र बप्पाला फार वाईट गेली. यमुना आणि कारभाऱ्या त्याच्या डोळ्यापुढं तरळत होते. दिवसभरच्या श्रमांनी थकलेला संतोष पडल्या जागी झोपी गेला. दुसऱ्या दिवशीची सकाळ कलंडली तरी बप्पा संतोषसोबत शेतात जायला राजी नव्हता. अखेर संतोषनं बऱ्याच मिनतवाऱ्या केल्या. संतोषनं त्याला सायकलवर बसवून शेताकडं कूच केलं.
वाटेनं दोघंही मूक होते. दोघांच्या डोक्यात यमुनेचा आणि कारभाऱ्याचाच विचार होता. सूर्य डोक्यावर येण्याआधी ते वस्तीपाशी पोहोचले. बांधावरल्या चिंचेपाशी संतोषनं सायकल लावली आणि ढेकळातून वाट काढत ते वस्तीकडे निघाले.
बप्पाचा गंध गोठ्यापर्यंत जाताच आतून नेहमीच्या परिचयाचा हंबरडा ऐकू आला. तो ऐकताच बप्पाने सवयीने हाळी दिली, ‘‘यमुने, ऐ यमुने, माझी माय यमुने !’’ पुन्हा हंबरड्याचा आवाज आला. मग मात्र सगळी ताकद एकवटत म्हातारा बप्पा गोठ्याच्या दिशेने पळत सुटला.
गोठ्यात जाऊन बघतो तर काय, यमुना आणि तिचं खोंड दावणीला बांधलेलं! बप्पा अवाक होऊन पाहत होता; कारण गोठ्यात यमुनेच्या शेजारी बप्पाचा मित्र संपतराव उभा होता. बप्पाला कोडं उलगडत नव्हतं. त्यानं आधी यमुनेला मिठी मारली. खोंडाच्या पाठीवरून हात फिरवला. नव्या बैलाच्या वाशिंडीला कुरवाळलं. संपतचं भान येताच त्याला घट्ट मिठी मारली.
संपतनंच सगळा उलगडा केला. यमुनेच्या पहिल्या वेतातून झालेलं खोंड संपतने बप्पाकडून अगदी स्वस्तात विकत घेतलं होतं. त्याच खोंडाच्या जोरावर अनेक बैलगाडा शर्यती जिंकल्या होत्या. बैलप्रदर्शनात पैसे कमवले होते. संतोष बाजारात येऊन गेल्यानंतर काही वेळातच नव्या खोंडाच्या शोधात संपतही तिथं आला होता.
सादमुद आपल्या बैलासारखं दिसणारं खोंड आणि सोबतची गाय पाहताच त्यानं ओळखलं, की ही गाय मारुतीबप्पाचीच आहे. गुरं विकायला कोण आलं होतं याची माहिती काढताच त्याचा अंदाज खरा निघाला. जास्त रक्कम देऊन त्यानं खोंडासह यमुनेला विकत घेतलं. मैत्रीचं ऋण चुकवण्यासाठी तांबडफुटीआधी बप्पाच्या गोठ्यात आणलं.
ही हकीकत ऐकताच बप्पाला गहिवरून आलं. एकाच वेळी त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि चेहऱ्यावर स्मित होतं. त्याला हसताना पाहून यमुनेच्या डोळ्यातनं आनंदाश्रू वाहत होते. श्रीमंत्या शिंगं हलवत होता. शानदार डुरकी मारत नवा बैलही त्यांच्या आनंदात सामील झाला. माथ्यावर आलेला सूर्य आपले अश्रू लपवण्यासाठी मेघाआड लपला आणि मस्त शिरवं पडलं...
(लेखक प्रसिद्ध साहित्यिक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.