Sameer Gaikwad : बायको नावडती असली, तरी...
समीर गायकवाड
खरेतर सरला, सरूबाई वाचाळ नव्हती. लोकांना मात्र एक नंबरची चवचाल वाटे. त्याचं कारण तिच्या तोंडाचं चुलवण सदा पेटलेलं राही. याची अगणित उदाहरणं होती. कुणी नवी साडी घालून तिच्या समोर आलं, की दातवण लावून काळीकुट्ट झालेली आपली बत्तीशी वेंगाडत ती म्हणे, ‘‘एका पिसाने कुणी मोर होत नाही गं रुख्मे !’’ तिच्या खऊट बोलण्यानं समोरचीच बाई गोरीमोरी होऊन जाई.
यावरही एखादी धिटुकली नेटाने समोर उभी राहिली तर ती पुढचं पान टाके, ‘‘रुख्मे, अगं रुख्मे, ऐकलंसं का, मोर सुंदर असला तरी त्येचं पाय काळंच असत्येत !’’ असल्या बोलण्यामुळे तिच्यापुढं उभं राहण्याची कुणाची टाप नसे.
मग त्या हिरमुसल्या बाईचं कौतुक करण्याचं कामही तिला जमत नसे, ‘‘काळी काळी उंदर तिचा सैपाक सुंदर !’’
असलं काही तरी भयानक कौतुक ती करे ! वैगुण्य दाखविण्यासाठी ती कोणत्याही थराला जाई. तिच्या कुजक्या टोमण्यांनी समोरची स्त्री जेरीस आल्यावर मात्र खोटंच हसत ती सावरून घेई, ‘‘दिसं कुरूप कलेवर, पर आत्मा असतो सुंदर !’’
मग समोरच्या बाईच्या ओठावर बेगडी हसू येई. दरम्यान, तिच्या लक्षात येई की सरूबाईसंगं झेंगट घेऊन चालणार नाही, तिच्या जवळ जाऊनही उपयोग नाही तिला तोडूनही चालणार नाही.
सरूबाईचं मूळ नाव सरला. औदू सुपात्याचे हे दुसरं खटलं. औदूची दौलत रग्गड होती. मिसरूड फुटायच्या बेतात असताना त्याचं लग्न झालेलं. बायको काशीबाई म्हणजे जाम खट, दावणीत बांधलेली घुमणघुस्की मारकी म्हैस ! औदूला ती आवडत नव्हती.
पण ती पडली मामाची पोर आणि औदूच्या बापाचा हावरा डोळा त्यांच्या पैशावर असल्यानं त्यानं ती पोरगी करून घेतली.
सासरी येताच काशीनं औदूला अक्षरशः बोटाच्या इशाऱ्यावर झुलवलं. ती म्हणेल ती पूर्वदिशा झाली. तिच्या वागण्यानं औदू पुरता जेरीस आला होता. एखादी फट मिळत्येय का याच्या शोधात असायचा. घरात सगळी सुखं होती, पण बायकोचं सुख नव्हतं. त्याचा जिवलग मित्र श्रीपतीनं ती नेमकी हेरली, त्याला हवी असलेली तृप्ती त्यानं मिळवून दिली.
श्रीपतीचं बायजाबाईच्या कलाकेंद्रावर आधीपासूनचं येणंजाणं होतं. तिथला नशीला ‘फाया’ त्यानं औदूच्या हातावर असा काही चोळला की गडी वास काढत बरोबर कलाकेंद्रावर पोहोचला. तिथल्या संगतीचा त्याला इतका लळा लागला, की जरा कुठं निवांतपणा गावताच त्याची पावलं तिकडंच वळू लागली. याचा परिणाम व्हायचा तोच झाला.
बारोमास तिथं पडून असणारी बायजाच्या बहिणीची मुलगी सरला त्याच्या नजरेत भरली. बैठकीच्या बारीत ती बसून असायची, नाचगाणं करत नसायची.
तरणाबांड देखणा औदू तिच्यावर पुरता फिदा झाला. त्या सुखानं त्याच्या सुकल्या बुंध्याला पालवी फुटली ! घरी काशी आणि बाहेर सरला असं त्याचं ‘जंतरमंतर’ बिनबोभाट सुरू होतं. नियतीला मात्र हे मान्य नव्हतं.
क्वचित सहवास घडूनही लग्नाच्या तिसऱ्या वर्षी काशी गरोदर राहिली, बायको नावडती असली, तरी तिच्या पोटात वंशाचा दिवा वाढत होता. त्याच्यापायी औदूच्या मनात चलबिचल सुरू झाली आणि सरलेकडचं येणंजाणं कमी झालं.
सरलाचा स्वभाव फाटक्या तोंडाचा होता, तिनंही काय ते ओळखून त्याचा नाद सोडून दिला. काशीचं बाळंतपण सुखरूप पार पडलं, तिला जुळी मुलं झाली. सुपात्यांचं घर आनंदात न्हाऊन निघालं. बायकोची तणतण सोसत औदू दोन्ही पोरं मांडीवर खेळवू लागला.
काही महिन्यांनी त्याला सरलाचा विसर पडला, इतका तो पोरांच्या सुखात तो दंग झाला. दोनेक वर्षानं काशी पुन्हा गरोदर राहिली. काशीच्या वागण्यात काहीही बदल झालेला नसला, तरी अंगणात खेळणाऱ्या बाळगोपाळांच्या संगतीला आता बहीण येण्याच्या आशेनंच त्याला सुख वाटलं.
सुखानं मात्र त्याला वाकुल्या दाखवल्या. नाळ गळ्यात गुरफटल्यानं पोर देठ खुडल्यागतच निपचित बाहेर आली. पोरीच्या विरहानं काशीला बाळंतवेड लागलं, त्या धक्क्यातून ती सावरू शकली नाही. अवघ्या काही दिवसांत तिचा खेळ आटोपला. औदूच्या आयुष्याचा सगळा पट उलटा झाला. पेरणी पुरी व्हायच्या आधीच माती वाहून गेली !
यानंतर काही महिन्यांतच औदूच्या अधाशी बापानं बक्कळ हुंडावाली पार्टी शोधायला सुरुवात केली तसं त्याचं पित्त खवळलं, वारूळ फुटून मुंग्यांचा लोंढा बाहेर पडावा तसं त्याच्या मनातला सगळा क्रोध बाहेर पडला. रागाच्या भरात तो जन्मदात्या बापाला खूप काही बोलून गेला.
पुन्हा पहिल्या दमानं शेतीत लक्ष घातलं. मन काबूत ठेवलं तरी धमन्यात सळसळणारं गरम रक्त त्याला सरलेची आठवण करून देत होतं. टाळण्याचा खूप प्रयत्न करूनही शेवटी पुन्हा एकदा तो सरलेच्या पुढ्यात हजर झाला. औदूने अक्षरशः नाक रगडल्यानंतरच सरला राजी झाली.
श्रीपतीच्या शेतात त्यानं तिला संसार थाटून दिला. तिच्याकडं नेमानं जाऊ लागला. सरलेची भानगड त्यानं गावापासून लपवली नाही, गावानं चार दिवस नवल केलं नंतर विसरून गेलं. पण औदूच्या बापानं हाय खाल्ली, भावांनीही त्याच्यापासून फारकत घेतली.
औदूमुळे आपल्या कुंकवाचा धनी अंथरुणाला खिळल्याचं ओझं पेलणाऱ्या सखूबाईनं तळतळून औदूला बेदखल करत जमिनीची खातेफोड करून दिली. औदूचे परतीचे रस्तेही आता बंद झाले. दोन्ही पोरांसह त्यानं घर सोडलं, वाट्याला आलेल्या शेतात घर केलं.
सरलेलाही तिथं आणलं. औदू आधी घाबरला, पण सरलेनं त्याला भक्कम साथ दिली. पोरं मोठी झाली, शाळेत जाऊ लागली तसं औदूने गावात शेळवण्यांच्या वाड्यात नवं घर केलं.
दरम्यान, बरीच वर्षे अंथरुणाला खिळून असलेले त्याचे वडील आणि त्यांच्या पाठोपाठ आई निवर्तली. औदूच्या भावंडांनी त्याला घराचे दरवाजे पुन्हा खुले केले, पण सरलाच्या दबावापायी त्यानं राहत्या घरास सोडलं नाही. सरूची अपार इच्छा असूनही औदू तिला मूलबाळ देऊ शकला नाही. ती मात्र त्या सुखासाठी तडफडत राहिली.
औदूचा वंश आपल्या पोटात वाढला नाही, तर उतारवयात आपल्याला कोण बघणार याची धास्ती होती. औदूने सरूला धोका दिला नाही, पण आपल्या पोरांना बापजाद्यांच्या पिढीजात घराचा लळा लावून दिला, भावकीशी नाळ जोडून दिली. वळचणीचं पाणी आढ्याला न जाता वळचणीलाच गेलं. ती पोरंही त्यात सुखी झाली.
काळ वेगानं पुढं निघून गेला. औदूची पोरं मोठी झाली, त्यांची लग्नं झाली. पण त्यांच्या लग्नात सरूबाईला कुणी मानपान दिलं नाही. या अपमानानं सरूबाई धुमसत राहिली. सरूबाईला औदूचा जमीन जुमला, सुपात्यांचं नाव, घरदार मिळालं, पण जिवाला ज्याची ओढ असते ते सुख मिळालं नाही. तेच सुख इतर स्त्रियांना मिळताना ती होरपळून निघायची. याची परिणती म्हणून तिची जीभ चाबकासारखी चालू लागली.
काही वर्षांनी वार्धक्यात दम्याने बेजार झालेल्या औदूने आपला बाजार उरकला. लोकांना वाटलं आता जमीनजुमला, वाडा विकून सरूबाई तिच्या मूळच्या जगात परत जाईल. पण सरूबाईचं इप्सित वेगळं होतं. तिला नुसतं डसायचं होतं. वय वाढत गेलं तसं ती एकाच जागी बसून दातवण लावत येणाऱ्याजाणाऱ्यावर विखारी कटाक्ष टाकू लागली.
फुगलेल्या पुरीसारखं गोल गरगरीत अंग, नेसायला जरतारी साड्या असूनही कुठला तरी बोळा काढून अंगाला गुंडाळलेला.
केस विस्कटलेले, निम्म्या दातांनी राम म्हटलेला असूनही गालाच्या कोनाड्यात ठोसलेला तंबाखूचा बार, तांबारलेले डोळे, बोडक्या कपाळावरती टेकवलेला गुलाल, हातात अजब गजब रंगांच्या बांगड्या, कळकटून गेलेली गळ्यातली सोनसर, रुंद खोलगट गळ्याचं पोलकं, साडीच्या आडून बाहेर आलेले परकाराचे लोंबते बंद, त्यावर ओघळणाऱ्या पोटाच्या वळकट्या, हातापायाची वाढलेली नखे, हातात पानविड्याचा पितळी डबा अशा अवतारात सरूबाई बसलेली असे.
मध्ये ती चार दिवस बाहेरगावी गेली तेव्हा गावात अफवांना उधाण आलं. पण बायजाबाईच्या तरण्या नातवाला, गरोदर सुनेला घेऊन ती परत आली. लोक चकित झाले; पण तिनं त्यांना भिक घातली नाही. बायजाबाईची नातसून बाळंत झाल्यावर बाळाच्या बारशाला तिनं गावातल्या सगळ्या विधवा बायकांना बोलवलं ! एकाही सवाष्ण स्त्रीला बोलवलं नाही.
लोकांची वाट बघत बसलेली सरूबाई दिसली, की बायका त्यांचा रस्ता बदलत. गावाला टोमणे मारतच तिचा अंतःकाळ सरला. तिच्यामागे बायजाच्या नातवाने जमीन, घरदार सगळं विकून फुकटात पैसे कमावून गाव सोडलं. गल्लीच्या वळणावर शेळवण्याच्या ज्या वाड्यात सरूबाई बसून असायची तो वाडा जवळपास जमीनदोस्त झालाय.
अजूनही तिथून जाताना कधी कधी सरूबाई दिसते. तिच्या हातात तान्हं मुल दिसलं, की ती फार शांत सात्त्विक वाटते, ती एकटीच असली की स्वतःच्याच कोपात होरपळत असल्यासारखी भेसूर दिसते. भयाण असले तरी हे भास हवेहवेसे वाटतात कारण गावजीवनाचा हा ही एक रंग होता नि आहे!
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.