Rahul Gandhi Jharkhand : विकासाच्या नावावर आदिवासींची जमीन बळकावली जात आहे. आदिवासींकडून भाजप जल, जंगल, जमीन काढून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो प्रयत्न थांबवण्यासाठी मी तुमच्यापाठीशी उभा आहे. असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी (ता.०९) झारखंड विधानसभेच्या निवडणूक प्रचारानिमित्त आयोजित सभेत केला. झारखंडची निवडणूक ‘इंडिया’ आघाडी विरुद्ध भाजप-आरएसएस विचारांविरोधातील लढाई सुरू असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.
झारखंड राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी दुसरऱ्यांदा झारखंडमध्ये तळ ठोकला आहे. झारखंडमध्ये दोन टप्प्यांत १३ आणि २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २३ तारखेला निकाल जाहीर होणार आहे.
राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी आणि अंबानी यांना देशाची राज्यघटना संपवायची आहे. आम्ही राज्यघटना वाचविण्यासाठी लढाई लढत आहोत. यावेळी राहुल गांधी यांनी सभेदरम्यान जनतेला राज्यघटनेची प्रत दाखविली. आम्ही तुम्हाला आदिवासी म्हणतो आणि भाजप तुम्हाला वनवासी म्हणते. घटनेत वनवासी हा शब्दच नाही. आदिवासी हे देशाचे पहिले मालक आहेत. जल, जंगल आणि जमिनीवर आदिवासींचा पहिला अधिकार असायला हवा. पण भाजपला आदिवासींनी वनवासी होऊन राहावे, असे वाटते. अशी टीका गांधी यांनी केली.
आदिवासींची मुले डॉक्टर इंजिनिअर होऊ नयेत, असे भाजप नेत्यांना वाटते. एससी, एसटी, अल्पसंख्याक, ओबीसींची संख्या ९० टक्के आहे. मात्र घटनात्मक संस्थांत या समाज घटकांचा सहभाग खूपच कमी आहे. माध्यमांत देखील आदिवासी आणि ओबीसींचा सहभाग कमीच दिसून येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ जणांचे तब्बल १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले असल्याचे गांधी यांनी सांगितलं.
आमच्या मते, जर श्रीमंतांच्या खिशात पैसे जात असतील तर शेतकऱ्यांच्या खिशातही पैसा जाईल. सत्तेत आल्यास आम्ही जातीनिहाय जनगणना करू, असेही राहुल गांधी म्हणाले. झारखंडमधील एससी, एसटी आणि ओबीसींची आरक्षण मर्यादा वाढवू आणि अग्निवीर योजना बासनात गुंडाळून ठेऊ, असेही सांगितले.
पाच हमी योजनांची घोषणा
राहुल गांधी यांनी झारखंडच्या विधानसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीचे सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले. ‘‘आमचे सरकार पाच गॅरंटी देण्याचे आश्वासन देते. महिलांच्या खात्यात दरमहा अडीच हजार रुपये देणार. शिवाय कुटुंब विमा योजनेनुसार पंधरा लाख रुपयांचे कवच, सात किलोपर्यंत मोफत धान्य, गॅस सिलिंडर ४५० रुपयांत देऊ ,’’ असे राहुल गांधी यांनी सांगितले. तसेच प्रत्येक विभागात पदवी आणि सर्व जिल्ह्यांत व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रमाची महाविद्यालये सुरू करण्याचे आश्वासनही राहुल गांधी यांनी दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.