Bidri Sugar Factory : 'बिद्री' साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा 'रात्रीस खेल चाले', तपासणीनंतर अध्यक्षांचा खुलासा

Bidri Sugar : सुमारे १३० कोटी रुपयांचा हा प्रकल्प सुरवातीपासूनच सत्ताधारी व विरोधी गटाच्या आरोप-प्रत्यारोपांनी चर्चेत आहे.
Bidri Sugar Factory
Bidri Sugar Factoryagrowon
Published on
Updated on

State Excise Department action Bidri Sugar : दत्तात्रय वारके (कोल्हापूर) : कागल तालुक्यातील बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अचानक तपासणी करण्यात आली. विशेष पथकाने शुक्रवारी काल(ता.२२) रात्री दहाच्या सुमारास कारखाना कार्यस्थळावर डिस्टलरी प्रकल्पाच्या कामाची तसेच मान्यतेच्या कागदपत्रांची तपासणी केली. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ही चौकशी सुरु होती. यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात खळबळ उडाली असून दिवसभर या तपासणीबाबत उलटसुलट चर्चा सुरु होती.

बिद्री साखर कारखान्याच्या प्रतिदिन साठ हजार केएलपीडी क्षमतेच्या डिस्टलरी प्रकल्पाची उभारणी सुरु आहे. सुमारे १३० कोटी रुपयांचा हा प्रकल्प सुरवातीपासूनच सत्ताधारी व विरोधी गटाच्या आरोप-प्रत्यारोपांनी चर्चेत आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या कारखान्याच्या निवडणूकीतही या प्रकल्पाचे इरादापत्र व अन्य परवानग्या यांमुळे हा मुद्दा प्रचारात गाजला होता. कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील व राधानगरी-भुदरगडचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांच्यात या प्रकल्पावरुन अनेकवेळा आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडल्या आहेत. मात्र निवडणुकीत सत्ताधारी के. पी. पाटील यांच्या आघाडीलाच सभासदांनी स्विकारले होते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती हे विजयी झाल्यानंतर भुदरगड तालुक्याच्या आभार दौऱ्यावर आले होते. यावेळी बिद्रीचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी खासदार शाहू महाराज व आमदार सतेज पाटील यांचे जोरदार स्वागत केले होते. यांमुळे के. पी. पाटील हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या. परंतू याबाबत त्यांनी अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.

या चर्चा सुरु असतानाच शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी डिस्टलरी प्रकल्पावर धाड टाकून तपासणी केली. यावेळी प्रकल्पाला मिळालेल्या विविध परवानग्या आणि प्रत्यक्ष झालेल्या कामाची अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. या तपासणीबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली होती.

Bidri Sugar Factory
Kolhapur Bidri Factory : कोल्हापूरच्या बिद्री साखर कारखान्याला सलग दोन वर्षे देशपातळीवरील पुरस्कार

यावेळी कारखान्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पथकाला आवश्यक ती माहिती दिली. या पथकाने रात्रभर प्रकल्पाच्या अनुषंगाने तपासणी केली. शनिवारी सकाळी आठच्या सुमारास ही तपासणी पूर्ण झाली. या तपासणीत नेमके काय केले याची माहिती तपासणी पथकाकडून संपर्काअभावी मिळू शकली नाही.

कारवाईला के. पीं. च्या राजकीय प्रवेशाची किनार.... ?

बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून फिरत आहेत. याबाबत श्री. पाटील यांनी अधिकृतपणे काहीही स्पष्ट केलेले नाही. परंतू राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अचानक झालेल्या तपासणीमुळे या कारवाईला राजकीय किनार असल्याची चर्चा आज दिवसभर कार्यक्षेत्रात रंगली होती.

डिस्टलरी प्रकल्प ठरतोय कळीचा मुद्दा....

या कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्प उभारणीला विविध कारणांनी विलंब झाला आहे. त्यातच शासनाच्या विविध मंजुरी घेण्यासाठी अनेक महिने गेले. त्यामुळे प्रकल्प सुरु होण्यासाठी विलंब झाला. यामागे राजकारण केले जात असल्याचा आरोप सत्ताधारी मंडळींनी केला. तर विरोधी मंडळींनी मंजुरी नसताना प्रकल्प उभारणीची घाई का केली असा प्रत्यारोप केला. त्यामुळे हा प्रकल्पच आता कळीचा मुद्दा ठरत आहे.

"कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन त्याची उत्पादन चाचणी सुरु आहे. पण काल उत्पादन शुल्कच्या पथकाने प्रकल्पाला अचानक भेट देऊन तपासणी केली. याचा अहवाल ते आपल्या वरिष्ठांना देतील. हा अहवाल आपल्याला मिळाल्यानंतर त्याबाबत योग्य तो खुलासा करण्यास कारखाना प्रशासन सक्षम आहे. "

के. पी. पाटील, अध्यक्ष बिद्री साखर कारखाना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com