
Solapur Farmers : सोलापूर जिल्ह्यातून सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम सुरू झाले आहे. यामध्ये मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथील शेतकऱ्यांना कसलीही कल्पना न देत ४ शेतकऱ्यांच्या सुमारे ३ एकर गव्हाच्या पिकांमधून रस्त्याचे काम सुरू केले आहे. शुक्रवारी(ता.१४) सकाळी अचानक कंपनीच्या ठेकेदारने केलेल्या कृत्याने बाधित शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कामासाठी हायवा मशीन जाण्यासाठी दहा फुटाच्या रस्त्याची तातडीने आवश्यकता असल्याने शेतकऱ्याच्या उभ्या पिकांचा विचार न करता, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने गहू पीक जमीनदोस्त करून कामाला सुरवात केली आहे.
सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वेसाठी अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील शरणबसप्पा मल्लिनाथ भुती (गट नं. ४९१) यांची ५० गुंठे, सूर्यकांत दरेप्पा हिरतोट (गट नं. ४९७) यांची १९ गुंठे, शिवचलप्पा श्रीमंत हिरतोट (गट नं. ४९८) यांची १९ गुंठे तर सुरेश बसवण्णा हिरतोट (गट नं. ४९९) यांची १७ गुंठे या ४ शेतकऱ्यांच्या मालकीच्या व कब्जेवाहीवाटीच्या एकूण १०५ गुंठे जमिनीवरील पिकांचे नुकसान करण्यात आले.
या शेतकऱ्यांची जमीन बागायत असतानाही कोरडवाहू गृहीत धरण्यात आली आहे. यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असे संबंधित शेतकरी व बाधित शेतकऱ्यांच्या वकिलांचे म्हणणे आहे. गव्हाचे हिरवेगार पीक जमीनदोस्त करताना शेतकऱ्यांनी कन्नड भाषेत जोरदार आरडाओरड केली परंतु ठेकेदारांकडून कसलाही विचार करण्यात आला नाही.
बाधित शेतकऱ्यांना ३ आठवडे ते १ महिना मुदत दिली असती तरीदेखील शेतकऱ्यांचे पीक पदरात पडले असते. मात्र, या महामार्गाचा मोबदला अद्याप मिळाला नसतानाही मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तासह बळाचा वापर करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पिकांचे नुकसान करण्यात आले. अशी माहिती बाधित शेतकऱ्यांनी दिली.
३५ तासांचा रस्ता १८ तासांत पार होणार
सुरत-चेन्नई एक्स्प्रेसवेच्या निर्मितीमुळे १ हजार ६०० किमीचा प्रवास १ हजार २७० किमी अंतरावर होणार आहे. सध्या या प्रवाससाठी जवळपास ३५ तास लागतात, परंतु हा एक्सप्रेस वे सुरू झाल्यानंतर हाच ३५ तासांचा प्रवास फक्त १८ तासात होणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसल्याने या महामार्गाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.