
डॉ. विक्रम कड डॉ. गणेश शेळके डॉ. सुदामा काकडे
Export Quality Farm Produce : कृषी उत्पादनांची प्रतवारी करताना अधिकृत (मानकीकृत) मानकांचा विचार करणे आवश्यक आहे. मानकीकृत मानके म्हणजे काय? तर ही मानके स्थान निरपेक्ष (सर्व ठिकाणी सारखी) आणि काळनिरपेक्ष ( सर्व वेळी सारखी) असली पाहिजेत. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे खरेदीदार (आयातदार) आणि विक्रेते (निर्यातदार) या दोघांनाही मान्य असली पाहिजेत.
मानकीकृत मानके प्रादेशिक आणि राष्ट्रीय अशा दोन प्रकारची असतात. प्रादेशिक मानके फक्त एका विशिष्ट क्षेत्रासाठी - राज्यांसाठी असतात, तर राष्ट्रीय मानके संपूर्ण देशासाठी असतात. प्रत्येक देशाने बाजाराच्या मागणीनुसार वेगवेगळे निकष तयार केले आहेत. उदा. ‘ॲगमार्क’ हे राष्ट्रीय मानक आहे.
वर्गीकरणाचे निकष
दूषित किंवा खराब झालेले उत्पादन निरोगी उत्पादनांपासून वेगळे केले पाहिजे.
रोग आणि कीटकाचे अंश नसलेली फळे आणि भाज्या निवडाव्यात.
मागणीनुसार योग्य त्या पक्वतेची फळे वेगळी काढावीत. पिकलेली फळे चवदार असतात.
चमकदार, तेजस्वी रंगाची फळे निवडावीत. बियांचा रंग देखील त्याच्या विकासाची पातळी दर्शवतो.
फळे / भाज्या लहान, मध्यम, मोठ्या अशा प्रकारात वर्गीकृत केली जातात. एकसंध आकाराच्या उत्पादनांना बाजारात चांगली मागणी असते. वेड्या वाकड्या आकाराची फळे, भाज्या वेगळ्या काढाव्यात.
गुळगुळीत व सुबक पोत असलेली फळे / भाज्या अधिक दर्जेदार मानली जातात. गाठी पडलेली उत्पादने निकृष्ट समजली जातात.
बाजारात विक्रीसाठी ताज्या फळे व भाज्यांना प्राधान्य दिले जाते. जुनी, शिळी किंवा सडलेली उत्पादने ग्राहक नाकारतात.
काही वेळा वजनानुसारही वर्गीकरण केले जाते. (उदा. कांदे, बटाटे). वजन एकसारखे असल्यास वितरण सुलभ होते.
त्याच प्रमाणे काही प्रतवारीची मानके ही एकापेक्षा जास्त देशांमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य केली आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात साधारणपणे एक्स्ट्रॉ क्लास’, ‘क्लास १’ आणि ‘क्लास २’ असे तीन वर्ग मानले जातात.
एक्स्ट्रॉ क्लास : ही श्रेणी सर्वोत्तम गुणवत्तेची असते. अति उत्कृष्ट, एकसंध रंग, स्वरूप व कोणताही दोष नसलेली फळे/भाज्या येतात. या फळांचा आकार, रंग आणि प्रकार उत्कृष्ट असतो. चव आणि पोत यामध्ये कोणताही दोष नसतो.
क्लास १ : ही श्रेणी एक्स्ट्रॉ क्लास प्रमाणेच असते, परंतु सौम्य सौंदर्यदोष असलेली पण दर्जेदार व वापरायोग्य उत्पादने असतात. फळांमध्ये लहान आकार, रंग आणि पृष्ठभागावरील (त्वचेवरील) सौम्य दोष असू शकतात. पण असे दोष उत्पादनाच्या एकूण गुणवत्तेवर परिणाम करत नसावेत.
क्लास २ : ही श्रेणी थोडे अधिक दोष, रंग / आकारातील विविधता असलेली, पण अजूनही वापरात येऊ शकणारी उत्पादने येतात. ही उत्पादने दर्जाच्या दृष्टीने खाण्यायोग्य असतात.
प्रतवारीमध्ये काय करावे?
फळे आणि भाज्यांचे रंग, आकार, वजन, परिपक्वता, गंध, चव इ. निकषांवर आधारित वर्गीकरण करावे. गुळगुळीत, डागरहित, ठिसूळ नसलेली आणि ताजी उत्पादने निवडावीत.
फळे आणि भाज्यांचे पिकलेपण, ताजेपणा आणि गुणवत्तेनुसार प्रतवारी करा. बाजारपेठेच्या मागणीनुसार उच्च आणि मध्यम दर्जाची फळे विक्रीसाठी निवडावीत.
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय बाजारपेठेच्या मागणीनुसार प्रतवारी आणि वर्गीकरणाची मानके पाळावीत. उदा. FSSAI, APEDA, ISO इ.
फळे आणि भाज्यांची हाताळणी हलक्या हाताने करा. अधिक दाब देऊ नका किंवा कडकपणाने हाताळू नका.
वर्गीकरणासाठी आधुनिक मशीन किंवा कन्व्हेअर बेल्टचा वापर करावा. यामुळे वेळ आणि श्रम वाचतात.
योग्य प्रकारे पॅकिंग करून त्यांची पुढील हाताळणीही योग्य प्रकारे करावी.
प्रतवारी केलेल्या फळे आणि भाज्यांना शीतगृहात साठवा. योग्य तापमान आणि आर्द्रता नियंत्रित करा.
वर्गीकरण आणि प्रतवारी करताना कामाच्या ठिकाणी स्वच्छता आणि स्वच्छ वातावरण ठेवा. हात आणि हाताळणीची साधने स्वच्छ असावीत.
प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा उपयोग करावा.
प्रतवारी करताना काय टाळावे?
कुजकी, खराब, डाग असलेली खराब उत्पादने इतर उत्पादनांमध्ये मिसळून नयेत. पॅकिंगमध्ये खाली खराब किंवा कमी दर्जाची फळे भरून पाठवली जातात. मात्र त्यामुळे संपर्ण शेतीमालाच्या दरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
हाताळणीदरम्यान फळांवर अतिरिक्त दाब पडणार नाही, याची काळजी घ्यावी.
अयोग्य प्रतवारी करू नका.
फळांच्या प्रकारानुसार उष्ण कटिबंधीय फळे आणि शीत कटिबंधीय फळे एकत्र करू नका.
साठवणीसाठी योग्य तापमान ठेवणे गरजेचे आहे. अतिउष्ण किंवा थंड तापमानामुळे फळे खराब होतात.
स्वच्छता नियमांकडे दुर्लक्ष करू नका : प्रतवारी करताना फळे आणि भाज्यांवर माती, धूळ किंवा रासायनिक अवशेष राहू देऊ नका. अस्वच्छ वातावरणात प्रतवारी करणे टाळा.
घाईगडबडीत प्रतवारी किंवा पॅकिंग करणे टाळा.
ओलसर शेतीमाल साठवणीमध्ये लवकर कुजतो. अशा शेतीमालामुळे अन्य सुका व चांगला शेतीमालही खराब होऊ शकतो.
योग्य चिन्हांकन न करणे : वर्गीकृत मालावर योग्य लेबल, चिन्ह किंवा श्रेणी दर्शविणारी पॅकिंग असावी. ती नसल्यास विक्री करताना बाजारात गोंधळ उडू शकतो.
- डॉ. विक्रम कड, ०७५८८०२४६९७
कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.