संत्रावर्गीय फळझाडांची लागवड करण्यापूर्वी जमिनीची योग्य निवड करणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अयोग्य जमिनीची निवड केली, तर अपेक्षित उत्पादन मिळत नाही. संत्रावर्गीय फळझाडांची लागवड करताना जमिनीच्या प्रकाराबाबत माहिती घेणे आवश्यक आहे. संत्रावर्गीय फळझाडे २५ ते ३० वर्षांपर्यंत एकाच जागेवर राहत असल्याने त्यासाठी योग्य जमीन निवड करणे गरजेचे असते. योग्य जमिनीच्या निवडीमुळे झाडांचे आयुष्य, नियमित फलधारणा तसेच रोगांचा नगण्य प्रादुर्भाव इत्यादी बाबी साध्य होतात. केवळ अयोग्य जमिनीच्या निवडीमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. भारी जमिनीत लागवड केलेल्या संत्रा बागांची स्थिती पाने पिवळे पडणे आणि सरळ येणे
भारी जमिनीमध्ये ६० ते ९० सेंमी खोलीत चिकण मातीचे प्रमाण ६० ते ७२ टक्के असते. या जमिनीत पाण्याचा निचरा योग्यरीत्या होत नाही. या जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता जास्त असून, जमिनीत पाणी मुरण्याचा वेग कमी असतो. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीमध्ये साचून राहते. जमिनीत पाणी साचल्यामुळे जमिनीतील हवा आणि पाणी यांचे संतुलन बिघडते. जमिनीमध्ये हवेची जागा पाण्याने घेतल्याने त्याचा परिणाम झाडाच्या मुळांवर होतो व मुळांची श्वसन क्रिया मंदावते. परिणामी, मुळांची अन्नद्रव्ये घेण्याची क्रिया थांबते व मुळे सडतात. भारी जमिनीत ओलावा जास्त असल्यास जमीन फुगते. तर ओलावा कमी झाल्यास, मातीचे कण आकुंचन पावतात. आणि जमीन कडक व घट्ट होते. त्यामुळे तंतुमुळे कमजोर होऊन तुटतात. अशा जमिनीत पावसाळा संपताच ऑक्टोबर महिन्यात प्रथमदर्शनी झाडाच्या शेंड्याकडील पाने पिवळी पडणे, पानगळ होणे, पानाचा आकार लहान होणे, प्रामुख्याने शेंड्याकडून फांद्या वाळणे, सल येणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. मृग बहराची फळधारणा न होणे
नागपूर संत्रा झाडाला विदर्भाच्या हवामानात मृग बहर येण्याकरिता उन्हाळ्यात पाण्याचा ताण द्यावा लागतो. भारी जमिनीत हा पाण्याचा ताण झाडाला बसत नाही. कारण या जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे ताणाच्या कालावधीत भारी जमिनीत ६० ते ९० सेंमी खोलीत ओलावा उपलब्ध असतो. या ओलाव्याचा पुरवठा झाडाच्या मुळांना ताणाच्या कालावधीत उपलब्ध होतो. त्यामुळे झाडाला योग्य ताण बसत नाही. चिंब धरत नाही त्याचा परिणाम मृग बहर न येण्यावर होतो. आंबिया बहर फळांची गळ होणे
भारी जमिनीत आंबिया बहर फळगळ प्रथम एप्रिलमध्ये होते. ही फळगळ जमिनीतील तापमानात वाढ झाल्यामुळे होते. तसेच फळे पक्व होण्यापूर्वी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुद्धा अतोनात फळांची गळ होते. ही फळगळ पावसाचे पाणी बागेत साचल्यामुळे होते. झाडावर फळे पोषणाकरिता अन्नद्रव्यांचा नियमित पुरवठा होणे आवश्यक असतो. मुळांजवळ पाणी साचल्यामुळे अन्नपुरवठा खंडित होतो. परिणामी फळांची अतोनात गळ होते. फळे पोसण्याच्या काळात अन्नपुरवठा अनियमित झाल्यामुळे फळांची प्रत खालावते. जाड सालीची, ओबडधोबड आकाराची फळे मिळतात. फळांमध्ये आम्लतेचे प्रमाण जास्त असते. तसेच फळे स्वादिष्ट व रुचकर नसतात. फळांचा रंग आकर्षक व नारिंगी दिसून येत नाही. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव
भारी जमिनीत झाडाच्या मुळांशी सतत ओलावा राहत असल्यामुळे बुरशीजन्य रोगांच्या जंतूंना पोषक हवामान मिळते. त्यामुळे संत्रा झाडाच्या मुळांवर ‘फायटोप्थोरा’ या बुरशीजन्य रोगाची लागण होते. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मुळे सडतात. मुळांची साल अलगद निघते व सालीला दुर्गंध येतो. रोगग्रस्त झाडाची पाने पिवळी पडून फांद्या वाढतात. झाडांचा ऱ्हास होतो. भारी जमिनीत डिंक्या रोगाचा प्रादुर्भावदेखील मोठ्या प्रमाणात आढळतो. संत्रा पीक ६.५ ते ७.५ सामू असलेल्या जमिनीमध्ये चांगले पोचले जाते. संत्रा पिकाकरिता ८.५ पेक्षा जास्त सामू असलेल्या जमिनी योग्य नाहीत. एकूण क्षारांचे प्रमाण ०.५ डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असलेल्या जमिनी संत्रा लागवडीसाठी योग्य नसतात. क्षारांचे प्रमाण जेवढे कमी तेवढे चांगले असते. जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण योग्य असणे आवश्यक असते. योग्य प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असल्यास आवश्यक मूलद्रव्ये मुळांना उपलब्ध होतात. जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण ०.६ ते १.० टक्का असणे आवश्यक आहे. पाण्याची पातळी काही जमिनींमध्ये पावसाळ्यात जमिनीतील पाण्याची पातळी १ मीटर खोलीवर येऊन पोहोचते. अशा संत्रा बागेत झाडाची मुळे सततच्या ओलाव्यामुळे सडतात. परिणामी झाडांचा ऱ्हास होतो. चुनखडीचे प्रमाण
संत्रा लागवडीत चुनखडी हा एक महत्त्वाचा घटक आहे. संत्रा बागेत गाठीच्या स्वरूपात आणि भूगर्भातील चुनखडीचा थर अशा दोन अवस्थेत चुनखडी आढळते. संत्रा बागेतील जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. नाजूक मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात चुनखडीचा थर असल्यास जमिनीतील पाणी झिरपण्याची क्षमता, हवेशी संयोग होणारी क्रिया आणि जमिनीतील ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइडच्या देवाणघेवाणीवर परिणाम होतो. जमिनीत जास्त प्रमाणात चुनखडी असल्यास ती स्फुरद आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी करते. लागवडीसाठी जमिनीची निवड संत्रा लागवडीसाठी जमिनीची निवड करताना पुढील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. जमिनीची खोली
संत्रा झाडाची अन्नद्रव्ये शोषण करणारी मुळे ही जमिनीच्या पहिल्या १ मीटर अंतरापर्यंत असतात. यांपैकी ५० ते ६० टक्के मुळे पहिल्या ३० सेंटिमीटरमध्ये तर २५ ते ३० टक्के त्याखालील ६० सेंटिमीटरमध्ये असतात. उथळ जमिनीत झाडांची मुळे खोल जात नाहीत. त्यामुळे मुळांची वाढ योग्य होत नाही. परिणामी झाडे अल्पायुषी ठरतात किंवा जोराच्या वादळाने कोलमडतात. जमिनीच्या १ मीटर खाली कच्चा मुरूम असणे आवश्यक आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो. तसेच मुळे चांगली रुजतात व पकड सुद्धा चांगली येते. संत्रा बागेतील जमिनीतून पाण्याचा निचरा न झाल्यामुळे जमिनीत हवा खेळती राहत नाही. तसेच जमिनीमध्ये असलेले सेंद्रिय पदार्थ पिकास उपलब्ध होत नाहीत. जमिनीमध्ये असलेल्या सूक्ष्म जिवाणूंची क्रिया मंदावते. जमिनीमध्ये असलेले क्षार वर येतात. जमिनीचा पोत बिघडतो व जमीन निकस होते. झाडांची तंतुमय मुळे सडतात, पाने पिवळी पडून गळतात, झाडावर सल येते, झाडांची मूलद्रव्ये घेण्याची क्रिया मंदावते. संत्रा झाड सुदृढ राहण्याकरिता जमिनीतील हवेमध्ये किमान १० टक्के प्राणवायूची गरज असते. जमिनीतून पाण्याचा निचरा न झाल्यामुळे झाडाच्या मुळांना प्राणवायू उपलब्ध होत नाही. त्यामुळे झाडाचे प्रकृतीमान खालावते. संत्रा झाडाला बहर येण्याकरिता पाण्याचा योग्य ताण बसत नाही. त्याचा परिणाम बहर न येण्यावर होतो. जमिनीचा पोत : मध्यम काळ्या पोताची. निचरा : पाण्याचा उत्तम निचरा होणारी. जमिनीची खोली : १ ते १.५ मीटर खोली व १ ते १.५ मीटरच्या खाली कच्चा मुरूम असणारी. जमिनीचा सामू : ६.५ ते ७.५ चुनखडीचे प्रमाण : १० टक्के पेक्षा कमी. पाण्याची पातळी : पावसाळ्यात पाण्याची पातळी २ मीटरपेक्षा खाली असावी. जमिनीची क्षारता : ०.५ डेसी सायमन प्रति मीटरपर्यंत. - डॉ. सुरेंद्र पाटील, ९८८१७ ३५३५३ (फळशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)