
डॉ. वैभव गुर्वे
भारतीय लोक मसालेदार आहाराचे भोक्ते आहेत. मसाल्यामध्येही तिखटपणा आणि स्वादासाठी प्रामुख्याने मिरच्यांचा वापर केला जातो. मिरच्यांना हिरव्या आणि वाळवून लाल झाल्यानंतर त्याची भुकटी अशा दोन्ही स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते.
मिरचीमध्ये ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर आहे. भारतीय पद्धतीच्या विविध भाज्या, आमची (करी), सांबर आणि चटण्यांमध्ये मिरच्यांचा वापर केला जातो. विविध मसाले, सॉस आणि लोणच्यातही वापर होतो. मिरचीमधील कर्करोगविरोधी घटक, त्वरित वेदना निवारक, रक्तवाहिन्या विस्तारण्याचे औषधी गुणधर्म आहेत.\
हवामान
मिरची पीक उष्ण व दमट हवामानात चांगले वाढून उत्पादनही चांगले मिळते. या पिकाची लागवड पावसाळा, हिवाला आणि उन्हाळा अशा तिन्ही ऋतूंमध्ये करता येते. मात्र पावसाळ्यात जास्त पाऊस आणि ढगाळ वातावरणात फुलांची गळ जास्त होते. मिरचीला ४० इंचांपेक्षा कमी पाऊस असणे चांगले असते. बियांची उगवण १८ ते २७ अंश सेल्सिअस तापमानामध्ये चांगली होते. तर मिरचीच्या झाडांची आणि फळांची वाढ २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमानामध्ये चांगली होते. तापमानातील तफावतीमुळे फुले आणि फळे यांची गळ मोठ्या प्रमाणावर होते.
जमीन
लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, मध्यम भारी जमिनीची निवड करावी. हलक्या जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रिय खते वापरल्यास मिरचीचे बऱ्यापैकी उत्पादन मिळू शकते. मात्र पाण्याचा निचरा योग्य न होणाऱ्या जमिनीमध्ये मिरचीचे पीक अजिबात घेऊ नये. पावसाळ्यात आणि बागायती मिरचीसाठी मध्यम काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. तर उन्हाळ्यात मध्यम ते भारी जमिनीवर मिरची लागवड करावी. चुनखडी असलेल्या जमिनीतही मिरची पिकाचे उत्पादन मिळू शकते.
पूर्वमशागत
एप्रिल, मे महिन्यांमध्ये जमीन नांगरून विखरून तयार करावी. शेवटच्या कुळवणीवेळी हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून लागवडीसाठी जमीन तयार करावी.
सुधारित जाती
लागवडीसाठी फुले ज्योती, पुसा ज्वाला, पंत सी-१, अर्का लोहित, कोकण किर्ती, अर्का मेघना या जातींची निवड करावी. खासगी कंपन्यांचेही अनेक बियाणे बाजारात उपलब्ध आहेत.
बियाण्यांचे प्रमाण
सुधारित वाणांसाठी बियाणे दर २०० ग्रॅम प्रतिएकर आणि संकरित जातींसाठी ८० ते १०० ग्रॅम प्रतिएकर बियाणे वापरावे.
रोपवाटिका
मिरचीची रोपे गादीवाफ्यावर तयार करावीत. गादीवाफ्यांचा आकार ३ मी. लांब × १ मी. रुंद × १५ सें. मी. उंच असावा. प्रति चौरस मीटर वाफ्यात ५ किलो शेणखत, ३५ ग्रॅम युरिया, १०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व २५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश मिसळावे. पेरणी करताना दोन ओळींतील अंतर १० सें. मी. ठेवावे.
रुजवण चांगला होण्यासाठी वाफे भाताच्या पेंढ्याने आच्छादावे. उगवण होईपर्यंत वाफ्यांना नियमित पाणी द्यावे. उगवण झाल्यानंतर दोन दिवसांनी पाणी द्यावे. रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी प्रत्येक वाफ्यास ५० ग्रॅम युरिया द्यावा. पेरणीनंतर ४ ते ६ आठवड्यांनी रोपे पुनर्लागवडीसाठी योग्य होतात. एक हेक्टर लागवडीसाठी ८ ते १० आर क्षेत्रावरील रोपे पुरेशी होतात.
बीजप्रक्रिया
मिरचीमध्ये मातीतून येणाऱ्या विविध रोगांपासून पिकाच्या संरक्षणासाठी बीजप्रक्रिया आवश्यक आहे. पेरणीपूर्वी थायरम ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. रासायनिक प्रक्रियेनंतर ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति किलो किंवा स्यूडोमोनास फ्लूरोसेन्स* १० ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी. मूळकूज (विल्ट), पांढरीमाशी, फूलकीड या सारख्या रसशोषक किडीपासून संरक्षणासाठी, पुनर्लागवडीपूर्वी मुळे ट्रायकोडर्मा हरजानियम २० ग्रॅम अधिक इमिडाक्लोप्रिड* अर्धा मि.लि प्रति लिटर पाणी या द्रावणामध्ये १५ मिनिटे बुडवावीत.
लागवड तंत्र
खरीप पिकासाठी मे ते जून, रब्बी पिकांसाठी सप्टेंबर ते ऑक्टोबर हे पेरणीचे महिने असतात. ते उन्हाळी पिके म्हणून घेतले असल्यास जानेवारी - फेब्रुवारी महिने निवडले जातात. लागवडीचे अंतर सुधारित जातीसाठी ६० × ४५ सेंमी तर संकरित वाणांसाठी ७५ × ६० सेंमी एवढ्या अंतरावर लागवड करावी.
खत व्यवस्थापन
रासायनिक खतामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट ३७५ किलो / हेक्टर लागवडीआधी द्यावे. १९:१९:१९ हे विद्राव्य खत ४२ किलो / हेक्टर, १३:००:४५ विद्राव्य खत
१६५ किलो / हेक्टर, १२:६१:०० विद्राव्य खत २० किलो / हेक्टर, युरिया १७८ किलो / हेक्टर हे चार टप्प्यांमध्ये वरीलप्रमाणे द्यावे. (खते ५ ते ७ दिवसांच्या अंतराने विभागून द्यावीत.)
सेंद्रिय खताचा भरपूर वापर केल्याने उत्पादनात आणि गुणवत्तेत वाढ होते. या पिकाला रासायनिक खतांचे व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे.
पाणी व्यवस्थापन
मिरची बागायती पिकाला जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी पाणी देऊ नये. रोपांच्या पुनर्लागवडीनंतर १० दिवसात शेतात रोपांचा जम बसतो. या काळात १ दिवसाआड पाणी द्यावे. त्यानंतर ५ दिवसांच्या किंवा एक आठवड्याच्या अंतराने पाणी द्यावे. शेतात पाणी साचू देऊ नये, अन्यथा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
तण नियंत्रण व आंतरमशागत
पेंडीमिथॅलिन १ लिटर प्रति एकर प्रति एकर हे तणनाशक म्हणून वापरावे. लागवडीनंतर ३० दिवसांनी एकदा हाताने खुरपणी करावी. त्यानंतर तणांच्या तीव्रतेनुसार खुरपण्या करून शेत तणाविरहित ठेवावे. खरीप मिरची रोपांना लागवडीनंतर २ ते ३ आठवड्यांनी मातीची भर द्यावी. बागायती पिकांच्या बाबतीत रोपांच्या लागवडीनंतर २ महिन्यांनी हलकी खोदणी करून सरी फोडून झाडांच्या ओळीच्या दोन्ही बाजूंनी मातीची भर द्यावी.
संजीवकाचा वापर
मिरची पिकातील फुलांची गळ कमी करण्यासाठी पीक फुलांवर असताना एनएए संजीवकाच्या १० ते २० पीपीएम तीव्रतेची किंवा अल्फा नॅप्थिल ॲसेटिक ॲसिड* १०० मि.लि. प्रति ४५० लिटर पाणी या प्रमाणे मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करता येईल. (*ॲग्रेस्को शिफारस)
काढणी
मिरचीची काढणी मिरचीच्या हेतूनुसार केली जाते. हिरव्या मिरचीची तोडणी लागवडीपासून ६० ते ७० दिवसांनी सुरु होते. पुढे तीन-चार महिने तोडे सुरु राहतात. पूर्ण वाढलेल्या हिरव्या फळांची तोडणी देठासह दर १० ते १५ दिवसांच्या नियमित अंतराने करावी. मिरच्या जास्त काळ झाडावर ठेवल्याने रंग फिकट होऊन सुरकुत्या पडू शकतात. सर्वसाधारणपणे आठ ते दहा तोडे मिळतात. पावडर मिरची आणि सुक्या लाल मिरचीचे उत्पादन घेताना मिरची गडद लाल रंगाची झाल्यावर झाडावरून उतरावी.
उत्पादन
हिरवी मिरची : १५० ते २०० क्विंटल /हेक्टर
लाल वाळलेली मिरची : १५ ते २० क्विंटल /हेक्टर
- डॉ. वैभव रमेश गुर्वे, ९६६५२०९७९९
(विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.