Nashik News : ‘‘राज्यात पावसाचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून शनिवार (ता. २)पर्यंत अंतिम अहवाल राज्य शासनाकडे सादर करावा. या अहवालाच्या आधारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष पॅकेज देण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव मांडणार आहे,’’ अशी ग्वाही मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी नाशिकमध्ये दिली.
रविवारी (ता. २६) झालेल्या गारपिटीसह पावसामुळे राज्यात ८५ हजार हेक्टरचे नुकसान झाले. त्यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ३४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. मंत्री पाटील यांनी मंगळवारी (ता. २८) निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांना भेटी देत पाहणी केली.
यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकसानीचा आढावा घेतला. खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘‘नुकसानीची तीव्रता पाहता एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, या साठी शेतकऱ्यांना सोबत घेऊन पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मदतीचे निकष बदलण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
निकष बदलण्याबाबतचा विषय हा केंद्राच्या पातळीवर घेतला जातो. यासाठी समिती स्थापन करून केंद्राशी चर्चा केली जाईल. राज्यात निकषांबाहेर काही करायचे असेल तर मुख्यमंत्र्यांना याबाबतचे अधिकार असतात. त्यानुसार मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करण्यात येईल.’’
मंत्री पाटील म्हणाले...
राज्यात १६ जिल्ह्यांत ८५ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान
राज्यात सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात
सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्यांचे आदेश
मदतीचे प्रलंबित प्रस्ताव लवकरच निकाली काढणारमदत व पुनर्वसन मंत्री थेट बांधावर ; नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदतीचे आश्वासन
जिल्ह्यातील नुकसान असे...
सुमारे ३४ हजार हेक्टरवरील पिकांना फटका
१२२ पैकी ६६ महसूल मंडलांत तडाखा
सुमारे १२ हजार हेक्टरवरील द्राक्ष बागा आडव्या
१० हजार हेक्टरवरील कांदा पिकांचे नुकसान
९२७ गावांतील ७० हजार शेतकरी बाधित
२०६ घरांचे अंशतः, ३१ घरांचे पूर्णपणे नुकसान
५० लहान, १५ मोठी जनावरे मृत
‘दुष्काळग्रस्तांसाठी २६०० कोटींची मागणी’
‘‘राज्यात यंदा दुष्काळ असल्याने जनतेला मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडे दोन हजार ६०० कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारने केली आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही केंद्र सरकारने मदत करावी,’’ अशी मागणी आम्ही करणार असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.