Crop Damage : पावसाने साडेआठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Crop Damage by Unseasonal Rain : दोन दिवसांत झालेला पाऊस, गारपीट व वादळामुळे १०७ गावांमधील सुमारे ८ हजार ५७१ हेक्टरवरील खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. या संकटाने १५ हजार ३०७ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
Crops damaged by rains
Crops damaged by rains Agrowon
Published on
Updated on

Nagar News : जिल्ह्यात शनिवारी (ता. २५) आणि रविवारी (ता. २६) या दोन दिवसांत झालेला पाऊस, गारपीट व वादळामुळे १०७ गावांमधील सुमारे ८ हजार ५७१ हेक्टरवरील खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. या संकटाने १५ हजार ३०७ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. १० जनावरे मृत्युमुखी पडली असून, २५ घरांची पडझड झाली आहे. दरम्यान, सोमवारी (ता. २७) रात्रीही अनेक भागांत विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात एक आठवड्यापासून ढगाळ वातावरण होते. शनिवारी सायंकाळनंतर जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली. पारनेर आणि अकोले तालुक्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. नगर शहरासह अनेक तालुक्यांत शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली.

Crops damaged by rains
Unseasonal Rain : ९९ हजार हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा तडाखा, नाशिक, बुलढाण्यात सर्वाधित नुकसान

यामुळे प्रामुख्याने कांदा, कापूस, मका, भात यासह द्राक्षे, पेरू, डाळिंब या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे ८ हजार ५७१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यात १५ हजार ३०७ शेतकरी बाधित झाले आहेत. तर १०.९० हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले. त्यात १२ शेतकरी बाधित झाले.

जिल्ह्यात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या तालुक्यामध्ये पारनेरला सर्वाधिक फटका बसला आहे. या तालुक्यात २४ गावांमधील ७ हजार ४५९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सुमारे १२ हजार १०० शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. प्रामुख्याने कांदा, केळी, मका, पेरू, डाळिंब, पपई, सीताफळ, टोमॅटो या पिकांचे नुकसान झाले आहे.

Crops damaged by rains
Post Monsoon Crop Damage : विदर्भात मॉन्सूनोत्तर पावसाचा पिकांना फटका

या तालुक्याखालोखाल अकोले तालुक्यात ६० गावांत होत्याचे नव्हते केले आहे. ९२७ हेक्टर क्षेत्रातील द्राक्षे, कापूस, भात, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे. २ हजार ९१० शेतकरी बाधित आहेत. संगमनेर तालुक्यात १३ गावांमधील १३३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान, २१५ शेतकरी बाधित, तर राहाता तालुक्यातील ४ गावांमधील ५२ हेक्टर क्षेत्रातील कापूस, मका, केळी या पिकांचे नुकसान झाले आहे.

त्याचा फटका ८२ शेतकऱ्यांना बसला आहे. कोपरगाव तालुक्यातील ६ गावांमधील १०.९० हेक्टर क्षेत्रातील १२ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र हे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. हा प्राथमिक अहवाल असून, पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा नेमका आकडा पुढे येईल.

दहा जनावरे मृत्युमुखी, २५ घरांचे नुकसान

पावसाने पशुधनाचीही मोठी हानी झाली आहे. दहा जनावरांचा मृत्यू झाला आहे. श्रीरामपूरमध्ये एका बैलाचा मृत्यू झाला. झाड विजेच्या तारांवर कोसळले. या तारा बैलाच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला. राहुरीत दोन मेंढ्या, तीन कोकरे, तर संगमनेरमध्ये चार मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्यात २५ घरांची पडझड झाली आहे. त्यात अकोले १, पारनेर ४, राहुरी ७, संगमनेर १०, तर श्रीरामपूरमधील २ घरांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com