Crop Nutrition Management : पीक पोषणासाठी विशेष खते

Crop Fetilizer Management : शाश्वत शेती उत्पादन आणि खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पीक पोषणाच्या नवीन पर्यायांचा तसेच विशेष खतांचा वापर आवश्यक आहे.
Crop Nutrition Management
Crop Nutrition ManagementAgrowon
Published on
Updated on

डॉ. एम. एस. पोवार

Crop Nutrition : शाश्वत शेती उत्पादन आणि खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पीक पोषणाच्या नवीन पर्यायांचा तसेच विशेष खतांचा वापर आवश्यक आहे. आपल्याकडे आता नॅनो युरिया, नॅनो डीएपी, सल्फरलेपित युरिया, पॉली फोर तसेच पीडीएम खताची उपलब्धता झाली आहे.

आपल्या देशातील ५० टक्के जमिनीत नत्राची कमतरता आहे. नत्र हे मुख्य अन्नद्रव्य असून पिकातील हरित लवकाचा भाग असून प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये महत्त्वाचे कार्य करते. पिकांची वाढ झपाट्याने होत असल्याने युरियाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु युरियाची कार्यक्षमता फक्त ३० ते ४० टक्के असते. ६० ते ७० टक्के युरिया वाया जातो. युरिया हा जमीन, पाणी आणि हवामान प्रदूषित करतो. अतिरिक्त वाया जाणारा युरिया जर जमिनीमध्ये राहिला तर इतर अन्नद्रव्ये, जमिनीचा सामू आणि सूक्ष्म जिवांवर अनिष्ट परिणाम होतो. त्याचा जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होतो. युरिया पाण्यामध्ये वाहून गेला तर पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढवून पाणी प्रदूषित होते. काही युरिया हवेमध्ये अमोनिया आणि नायट्रस ऑक्साईडच्या स्वरूपात उडून जातो, त्यामुळे वातावरण प्रदूषित होते. युरिया खताच्या अतिवापरामुळे पिकांची फक्त शाखीय वाढ होते. पिकांमध्ये लुसलुशीतपणा वाढतो. त्यामुळे पीक रोग आणि किडीला बळी पडते. नाजूकपणा वाढल्यामुळे पीक लोळते.

डीएपी किंवा संयुक्त खतासाठी आवश्यक कच्चा माल आपल्या देशामध्ये नसल्यामुळे आपल्याला एक तर फॉस्फरिक ॲसिड किंवा तयार संयुक्त खते आयात करावी लागतात. डीएपी अथवा संयुक्त खतातील स्फुरदाची कार्यक्षमता अतिशय कमी आहे. त्यामुळे अतिरिक्त स्फुरदाचा वापर नैसर्गिक स्त्रोतांना घातक असतो.

या सर्व बाबींचा विचार करता खतांची कार्यक्षमता वाढवणे आणि शाश्वत शेती उत्पादनासाठी पीक पोषणाच्या नवीन पर्यायांचा किंवा विशेष खतांचा वापर होणे आवश्यक आहे. यामुळे आता नॅनो युरिया, नॅनो डीएपी, सल्फर-लेपित युरिया, पॉली फोर, आणि पीडीएम खत उपलब्ध झाले आहे.

Crop Nutrition Management
Crop Nutrition : पीक पोषणासाठी का हवा अन्नद्रव्यांचा संतुलित वापर?

नॅनो युरिया

नत्राच्या कणाचा आकार २० ते ५० नॅनोमीटर इतका असतो. नॅनो युरियामध्ये नत्राचे प्रमाण हे वजनाच्या १६ टक्के असते. त्यामुळे पीकवाढीच्या मुख्य अवस्थेमध्ये नॅनो युरियाची फवारणीकरून पिकाची नत्राची ५० टक्के गरज भागवता येते.

नॅनो युरिया २ ते ४ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी केली असता नॅनो युरियातील नत्राचे शोषण पानावरील पर्णरंध्राद्वारे पेशीमध्ये होते. शोषण केलेला नत्र पेशीतील रिक्तिकामध्ये साठवला जातो. पिकाच्या गरजेनुसार पिकाला अमोनिकल आणि नायट्रेट रुपामध्ये पुरवला जातो.

नॅनो कणांचा आकार,त्यांचे पृष्ठभागीय क्षेत्रफळ, पर्णरंध्राद्वारे शोषण, पेशींच्या रिक्तिकामध्ये साठवण आणि गरजेनुसार पुरवठा यामुळे नॅनो युरियाची कार्यक्षमता ८६ टक्यांपर्यंत जाते.

नॅनो युरिया जमिनीमधून न देता फवारणीद्वारे देत असल्यामुळे युरियाचा जमीन आणि पाण्याशी संबंध येत नाही. कार्यक्षमता चांगली असल्यामुळे हवेमध्ये वाया जात नाही.

नॅनो डीएपी

नॅनो डीएपी (द्रवरूप) हे एक नवीन खत आहे. यामध्ये नायट्रोजन (८.० टक्के N w/v) आणि फॉस्फरस (१६.० टक्के P२O५ w/v) आहे. नॅनो डीएपीच्या कणाचा आकार १०० नॅनोमीटरपेक्षा कमी आहे. यामुळे ते बिया, मुळांच्या पृष्ठभागाच्या आत किंवा पानांच्या रंध्रातून आणि वनस्पतींच्या इतर छिद्रातून सहज प्रवेश करू शकते.

नायट्रोजन आणि फॉस्फरसचे नॅनो क्लस्टर बायो-पॉलिमर आणि इतर एक्सिपियंट्ससह कार्य करतात. चांगल्या प्रसाराची क्षमता आणि वनस्पती प्रणालीमध्ये एकत्रीकरण केल्याने बियाणे अधिक जोमदारपणे उगवते. अधिक क्लोरोफिल, प्रकाशसंश्लेषण कार्यक्षमता, चांगली गुणवत्ता आणि पीक उत्पादनात वाढ होते.

सल्फरलेपित युरिया

जमिनीतील सल्फरची कमतरता दूर करण्यासाठी सरकारने सल्फरलेपित युरियाला मान्यता दिली आहे.

सल्फरलेपित युरिया इतर प्रकारांपेक्षा अधिक किफायतशीर आणि कार्यक्षम आहे. याची नायट्रोजन शोषण कार्यक्षमता ७८ टक्के आहे.

नायट्रोजन ३७ टक्के, सल्फर १७ टक्के असतो. यामध्ये ह्युमिक अॅसिड मिसळले आहे. यामुळे युरियाचा वापर कमी होईल.

पॉली फोर

पॉली फोर हे नैसर्गिकरीत्या घडलेले, कमी क्लोराईड असलेले, अनेक पोषकद्रव्ये असलेले खत आहे. पिकाच्या वाढीसाठी आवश्यक पोषकद्रव्यांपैकी पोटॅशियम १४ टक्के, सल्फर १९ टक्के, मॅग्नेशिअम ६ टक्के आणि कॅल्शिअम १७ टक्के पुरवते.

पूर्णपणे विद्राव्य खत आहे. पिकाच्या मागणीनुसार नियमितपणे पोषकद्रव्ये पुरवते. उत्पादन व गुणवत्तेमध्ये सुधारणा होते.

एमओपीच्या तुलनेत पॉलीफोर हे गव्हासाठी सातत्यपूर्ण उपलब्धता असणारे सल्फेट आणि सल्फर खत आहे. पॉली फोर मुळे तृणधान्य पिकांचे शेंडे वाकण्यात घट होते.

पीडीएम खत

हे एफसीओ मान्यताप्राप्त खत आहे. यामध्ये १४.५ टक्के पालाश आहे.

साखर कारखान्यातील मोलॅसिसपासून

तयार होणाऱ्या  राखेपासून हे खत तयार केले जाते.

एमओपी खताला एक उत्तम पालाशयुक्त खताचा पर्याय पीडीएम खत होऊ शकते.

कन्सोर्शिया जिवाणू खत

रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम, पीएसबी आणि केएसबी या जिवाणू खतांचा एकत्रित वापर करून तयार केलेली खत आहे.

पिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम पिकांना उपलब्ध होते. यामध्ये विविध प्रकारचे जिवाणू आणि सूक्ष्मजीवांचा समावेश असतो, जे पिकांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. यांचा वापर बियाणे, बेणे, रोप प्रक्रिया आणि आळवणीसाठी केला जातो.

मल्टीन्यूट्रियंट फोर्टिफाइड खते

मल्टीन्यूट्रियंट फोर्टिफाइड खते म्हणजे विविध पोषक तत्त्वांचे मिश्रण असलेली खते. यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि इतर आवश्यक पोषक तत्त्वांचा समावेश असतो. विविध पोषक तत्त्वांच्या मिश्रणामुळे पिकांना संपूर्ण पोषण मिळते. पिकांची गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता वाढते.

झिंकेटेड एनपीके कॉम्प्लेक्स (१०:२६:२६)

झिंकेटेड एनपीके कॉम्प्लेक्स (१२:३२:१६)

झिंकेटेड डीएपी (१८:४६:०)

झिंकेटेड युरिया अमोनिअम फॉस्फेट (२८:२८:०)

झिंकेटेड एनपीके कॉम्प्लेक्स (१४:३५:१४)

झिंकेटेड अमोनिअम फॉस्फेट सल्फेट

झिंकेटेड एसएसपी (ग्रॅन्युलर)

बोरोनेटेड एनपीके कॉम्प्लेक्स (१०:२६:२६)

बोरोनेटेड एनपीके कॉम्प्लेक्स (१२:३२:१६)

बोरोनेटेड डीएपी (१८:४६:०)

एनपीके ९:२४:२४ झिंक बोरॉन व लोह

बोरोनेटेड एनपीके कॉम्प्लेक्स (१४:३५:१४)

बोरोनेटेड अमोनिअम फॉस्फेट सल्फेट

बोरोनेटेड एसएसपी (ग्रॅन्युलर)

बोरोनेटेड सल्फर ग्रॅन्युलरसह एसएसपी फोर्टीफाईड.

बोरोनेटेड कॅल्शिअम नायट्रेट

बोरोनेटेड युरिया अमोनिअम फॉस्फेट (२८:२८:०)

- डॉ. एम. एस. पोवार, ७०२८०१४५४६

(वरिष्ठ विपणन व्यवस्थापक, इफ्को, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com