Crop Nutrition : पीक पोषणासाठी का हवा अन्नद्रव्यांचा संतुलित वापर?

Chemical fertilizer : रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी खते देण्याची योग्य पद्धत, वेळ, योग्य मात्रा इत्यादी बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.
Crop Nutrition
Crop NutritionAgrowon
Published on
Updated on

डॉ. एस. एन. पोतकिले, डॉ. एकता बागडे, डॉ. मेघा डाहाळे

Fertilizer Update : रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी खते देण्याची योग्य पद्धत, वेळ, योग्य मात्रा इत्यादी बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. या बाबींचे काटेकोर पालन करून अन्नद्रव्याचा पुरवठा शाश्‍वत उत्पादनासाठी गरजेचा आहे.

अन्नद्रव्यांची कार्यक्षमता

१) नत्र

- या अन्नद्रव्याची जमिनीत मोठ्या प्रमाणावर कमतरता आढळून येते. जमिनीमध्ये उपलब्ध नत्राचे प्रमाण हेक्टरी २८० किलोपेक्षा कमी असल्यास कमतरतेची लक्षणे दिसून येतात. नत्राचे वनस्पतीमध्ये साधारण १ टक्क्यापेक्षा कमी प्रमाण असल्यास नत्राची कमतरता आहे असे समजावे. नत्राची कार्यक्षमता कमी असून ते ३० ते ५० टक्के एवढी आहे.

- जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्माचे नत्राच्या रूपांतर प्रक्रियेवर नियंत्रण असते. सर्वसाधारणपणे नत्राची उपलब्धता ही ५.५ ते ६ सामूपर्यंत जास्त असून, त्यापेक्षा कमी झाल्यास नत्राची उपलब्धता कमी होते.

- नत्राची कार्यशीलता पुरेसा ओलावा व हवा, जमिनीचा पोत आणि संरचना या परिस्थितीवर अवलंबून असते. जमिनीच्या पृष्ठभागाखाली, पिकांच्या नाजूक अवस्थांमध्ये गरजेनुसार वापर, गंधकाचे किंवा निंबोळीचे आवरण युक्त युरियाचा वापर केल्यास नत्राच्या कार्यक्षमतेत वाढ होते.

Crop Nutrition
Chemical Fertilizer Rates : खत अनुदान जाहीर करण्यात केंद्र सरकारकडून दिरंगाई

२) स्फुरद

- वनस्पतीमध्ये सर्वसाधारण ०.१ टक्क्यापेक्षा कमी स्फुरद असल्यास कमतरतेची लक्षणे दिसून येतात. स्फुरदाचे वनस्पतीमध्ये ०.१ ते ०.४ टक्का प्रमाण सर्वसाधारणपणे पुरेसे समजावे. जमिनीमध्ये उपलब्ध स्फुरदाचे प्रमाण हेक्टरी १५ किलोपेक्षा कमी असल्यास कमतरता जाणवते.

स्फुरदाची कार्यक्षमता जवळपास २० ते ३० टक्के एवढी असून खूप कमी आहे. सर्वसाधारणपणे स्फुरद ६ ते ७.५ सामू असताना उपलब्ध असतो. परंतु सामू ६ पेक्षा कमी किंवा ८ पेक्षा जास्त असतो, त्या वेळी त्याची उपलब्धता कमी होत जाते.

- स्फुरदाची कार्यक्षमता जमिनीतील खनिजे, पिकाचे प्रकार, खताचा प्रकार, खतमात्रा आणि देण्याची पद्धत व जिवाणूंचे प्रमाण इत्यादीवर अवलंबून असते.

- स्फुरदाचे स्थिरीकरण होऊन विद्राव्य स्वरूपातील स्फुरद अद्राव्य स्वरूपात रूपांतरित होते. लाल व तांबड्या मातीमध्ये लोह व ॲल्युमिनियमद्वारे, तर काळ्या जमिनीत चुनखडीद्वारे स्फुरदाचे स्थिरीकरण होत असून, त्याची उपलब्धता कमी होते.

- सेंद्रिय खतांचा वापर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू यांचा वापर कार्यक्षमता वाढविण्यासाठी गरजेचा असतो. स्फुरदयुक्त खते बांगडी पद्धतीने किंवा बियाण्यांसोबत पेरून दिल्यास त्याचे स्थिरीकरण कमी होऊन कार्यक्षम वापर होतो.

३) पालाश

- वनस्पतींमध्ये पालाशचे प्रमाण १ ते ५ टक्के एवढे असते. पालाशची कमतरता जुन्या पानांवर आढळून येते. जमिनीमध्ये उपलब्ध पालाश प्रमाण हेक्टरी १५० किलोपेक्षा कमी असल्यास कमतरता जाणवते. पालाशची कार्यक्षमता ५० ते ६० टक्के एवढी असते.

- पालाशचे स्थिरीकरण जमिनीचा सामू, ओलाव्याचे प्रमाण, खनिजाचा प्रकार इत्यादीवर अवलंबून असते. पिकांवाटे शोषण झाल्यानंतर विद्राव्य स्वरूपातील पालाशचे प्रमाण कमी होते आणि ते लगेच विनिमययुक्त पालाशद्वारे भरले जाते.

- पालाश जमिनीत दिल्यानंतर त्यातील बराचशी मात्रा जमिनीतील खनिजाद्वारे स्थिर केली जाते. हे स्थिरीकरण नुकसानकारक नसून, जमिनीतील स्थिर पालाशच्या साठ्यामध्ये भर घालते. सर्वसाधारणपणे जमिनीचा सामू ६ पेक्षा कमी असल्यास पालाशची उपलब्धता कमी होते.

४) गंधक

गंधकाचे प्रमाण वनस्पतीमध्ये ०.१ ते ०.४ टक्का असल्यास पुरेसे असते. गंधकाची कमतरता प्रथम नवीन पानांवर दिसून येते. नत्र: गंधकाचे गुणोत्तर वनस्पतींमध्ये १६:१ पेक्षा जास्त असल्यास कमतरता जाणवते. उपलब्ध गंधक जमिनीमध्ये १० मिलिग्रॅम प्रतिकिलोपेक्षा कमी असल्यास पिकामध्ये कमतरता आढळून येते.

५) जस्त

पक्व पानांत जस्ताचे पुरेसे प्रमाण ३० ते १५० मिलिग्रॅम प्रति किलो एवढे असते. हे प्रमाण साधारणतः १५ मिलिग्रॅम प्रति किलोपेक्षा कमी झाल्यास जस्ताची कमतरता जाणवते.

६) लोह

लोहाचे १०० ते ५०० मिलिग्रॅम प्रति किलो एवढे प्रमाण वनस्पतीमध्ये उत्पादनासाठी पुरेसे असते. साधारण ५० मिलिग्रॅम प्रति किलोपेक्षा कमी लोहाचे प्रमाण वनस्पतीमध्ये असल्यास कमतरता जाणवते.

जमिनीचा सामू ६ पेक्षा कमी असल्यास गंधक, कॅल्शिअम व मॅग्नेशिअम यांची उपलब्धता कमी होते. लोह, मँगेनीज, तांबे व जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता सामू कमी असताना जास्त असते. परंतु सामू ७ च्या वर गेल्यास त्याची उपलब्धता कमी होते.

जमिनीचा सामू ५ पेक्षा कमी व ७ पेक्षा जास्त असताना बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते. जमिनीचा सामू ६ ते ८ च्या दरम्यान असतो, त्या वेळी ही परिस्थिती पिकांच्या वाढीस अनुकूल व पिकांना मानवणारी समजली जाते.

पीक पोषणासाठी संतुलित खते

- स्फुरद व पालाश न वापरता फक्त नत्रयुक्त खतांचा वापर करणे टाळावे.

- जमिनीत कमतरता असल्यास, मुख्य अन्नद्रव्यांसोबत गंधक, जस्त, लोह, बोरॉन यांचा वापर करणे आवश्यक आहे.

- एखाद्या अन्नद्रव्याची कमतरता इतर अन्नद्रव्यांची कार्यक्षमता कमी करू शकते.

- अन्नद्रव्यांचा जास्त प्रमाणात वापर हे असंतुलन वाढविते आणि अन्नद्रव्यांचे जास्तीचे शोषण होते.

- पाण्याची कार्यक्षमता संतुलित खत वापर वाढविते.

- संतुलित खत वापरामुळे उत्पादनात वाढ मिळते.

- उत्पादनाचा दर्जा व गुणवत्ता सुधारते.

- जमिनीची सुपीकता टिकून राहते.

Crop Nutrition
Micronutrient Deficiency : सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरतेवर विशेष उपाययोजना

खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना

- खतांचा वेळेवर व संतुलित वापर.

- जमिनीत जिवाणू खते, सेंद्रिय खते, हिरवळीची खते आणि पेंडीचा वापर करावा.

- माती परीक्षणानुसार खतांचा वापर.

- नत्रयुक्त खताची मात्रा पीक शिफारशीनुसार विभागून द्यावी.

- पिकांच्या मुळांजवळ स्फुरदयुक्त खताचा वापर करावा. स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू खताचा वापर करावा.

- दोन चाड्याच्या पाभरीने खत व बियाणे पेरणी करावी.

- सूक्ष्म अन्नद्रव्यांचा जमिनीतून अथवा फवारणीद्वारे वापर केल्यास खतांची कार्यक्षमता वाढते.

- ठिबक सिंचनातून खते मुळांजवळ दिली जात असल्याने निचऱ्याद्वारे अन्नद्रव्यांचा ऱ्हास कमी होतो. तसेच खतांची २५ टक्के बचत होऊन कार्यक्षम वापर होतो.

- सिंचनाची योग्य पद्धत व वेळ, तणांचा, किडी व रोगांचा बंदोबस्त यामुळे खतांचा योग्य वापर होतो.

- खतांच्या कार्यक्षम वापरासाठी जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे.

संपर्क - डॉ. एस. एन. पोतकिले, ९४२२२८४८३४, (कृषिविद्यावेत्ता, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com