इतिहासात बुडवलेला वर्तमान

परवा गावात शिवजयंतीचा कार्यक्रम होता सगळीकडे जल्लोष, उत्साह. सगळीकडे म्हणजे गावातल्या तरुण पोरांत.
history
historyagrowon

- बालाजी सुतार.

परवा गावात शिवजयंतीचा (Shiva Jayanti) कार्यक्रम होता सगळीकडे जल्लोष, उत्साह. सगळीकडे म्हणजे गावातल्या तरुण पोरांत.एकदम माहौल होता. ‘क्षत्रियकुलावतंस’ असं लिहिलेले टीशर्टस घातलेले स्वार आणि उंच भगवे झेंडे लावून रोंरावत फिरणा-या मोटारसायकली.

ऐन मिरवणुकीत युद्धकौशल्याचं भन्नाट सादरीकरण करणारं एक तरुण मुलांचं पथक सोलापूर की कोल्हापूरहून भरघोस पैसे मोजून आणलेलं. त्या पथकात दहाबारा वर्षांच्या मुलांपासून विशी पंचविशीतल्या तरुणांपर्यंत योद्धे होते. ते विजेच्या गतीने दांडपट्टा, तलवारबाजी वगैरेंचं भन्नाट प्रदर्शन करत होते. त्यांच्यासोबत अवाढव्य ढोल वाजवणारे काहीजण.

छाती हादरवून टाकणारा वाद्यांचा कल्लोळ आणि बेभान मावळे. श्वास रोखून पाहणारे आम्ही गावकरी. पैसा मोजून आणलेल्या शौर्याची उसनी अनुभूती केवळ पैशांच्या जोरावर अनुभवत होतो आणि चुकून एखादी तलवार जराशी जवळून फिरली तर आमची क्षत्रियकुलावतंस मुंडी पटकन मागे घेत होतो. मला गंमत वाटली आणि जरासं वाईटही वाटलं.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. त्यांच्या समग्र कार्यकर्तृत्वाला आम्ही केवळ ‘शिवजयंती’ या एकाच दिवसाच्या उत्सवी कोलाहलात बांधून टाकलेलं महाराजांना कितपत आवडलं असतं, कुणास ठाऊक. ज्या वयात महाराजांनी काही किल्ले काबीज करुन तीन-तीन बादशाह्यांच्या समोर आव्हान उभं केलं होतं आणि एका भक्कम राज्याचा पाया घातला होता, त्याच वयात आम्ही तोंडात गुटख्याचा तोबरा भरून टीचभर छातीत मुदलातच नसलेला जोर एकवटत फटफट्या घुमवत गावातल्या गल्लीबोळांत हिंडत राहतो.

हा विचार करत असतानाच माझ्या लक्षात आलं की या पोरांना दोष देण्यात काही अर्थ नाही. कारण या वयात आम्ही म्हणजे आमच्या पिढीतळे तरुण अजिबातच काही वेगळं करत नव्हतो. मला पंधरा वीस वर्षांपूर्वी मी या मुलांच्या एवढ्याच वयाचा होतो तेव्हाचे दिवस आठवले. तेव्हा शिवजयंतीचा तितकासा बोलबाला नव्हता.

history
Crop Damage : सुधारित पैसेवारी पन्नास पैशांखाली

अशाच दणक्यात आम्ही तेव्हा गणेशोत्सव साजरा करायचो. गावात आठवडी बाजार आहे, त्यात बाहेरगावाहून आलेल्या दुकानदारांकडून जवळजवळ सक्तीने दहा वीस दहा वीस रुपये वर्गणी गोळा करायचो. गावातले काही प्रतिष्ठित, कुणी राजकारणी वटटात शंभर-दोनश्याच्या पावत्या फाडायचे आणि सबंध दहा दिवस आम्ही गणपतीच्या तैनातीत राहायचो. सकाळ संध्याकाळ आरत्या करा, ढोल वाजवा, लेझीमचं पथक तयार करा वगैरे.

आमच्या टीचभर गावात चांगले आठ- दहा गणपती ‘बसलेले’ असत. मग विसर्जनाच्या दिवशी मिरवणुकीत परस्परांचे गणपती अडवण्यापासून मंडळामंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होण्यापर्यंत अनेक उपद्व्याप घडले जात. खुद्द गणपतीलाही गावातल्या पार्टीबाजीचा बळी केलं जाई. त्या विसर्जनाच्या मिरवणुकीतल्या कटकटींचं कवित्व पुढेही आठ-पंधरा दिवस चालूच असे. गणपतीला त्याकाळी बुद्धीची देवता मानलं जायचं.

हे ऐन उमेदीचे दिवस असल्या उपद्व्यापात व्यर्थ घालवू नयेत ही बुद्धी त्या बुद्धीदात्याने आम्हाला कधीच दिली नव्हती. या नेमक्या काळात तरुणांना झुंडीचं प्रशिक्षण मिळतं. झुंडीने राहण्याचं, दादागिरीचं, नशाखोरीचंही. महाराष्ट्रात दारू पिणा-या लोकांपैकी निदान अर्ध्या तरी लोकांना ते व्यसन गणेश मंडळाचा किंवा फलाण्या जयंती उत्सव समिताचा कार्यकर्ता म्हणून काम करताना लागलेलं असेल.

हे विधान अतिशयोक्तीचं ठरलं तर चांगलंच होईल, पण ही अतिशयोक्ती नाहीय अजिबात. कॉलेज संपवून गावात आल्यानंतरची काही पाचसात वर्षे असल्या उचापती करण्यात घालवताना एकेदिवशी अचानक लक्षात आलं की वयाची पंचीविशी पार केली आहे आणि आपलं कशातच काही खरं नाहीय. ना आपल्याला आर्थिक आघाडीवर सक्षमपणे उभं करू शकेल अशी नोकरी मिळतेय, ना लग्नाच्या बाजारात काही किंमत आहे.

history
Crop Insurance : फळपीक विमा जनजागृती चित्ररथ सिंधुदुर्गमध्ये

कसंतरी रडत रखडत बीए किंवा बीएड सारख्या पदव्या मिळवण्यालाचं ‘शिक्षण’ घेतलं असं म्हणण्याची प्रथा आपण यापुढेही पाळत राहिलो तर उद्याच्या जागतिक बाजारीकरणाच्या पैसाकेंद्री जगात आपली निव्वळ वावटळ होणार आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज अजिबात लागत नाही.

आपलं अतिशय मौल्यवान तारुण्य केवळ आधीच्या पिढ्यातल्या विराट कर्तृत्ववान महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साज-या करून निव्वळ फुकापासरी व्यर्थ दवडत राहताना आपण अकर्मण्यतेचे साक्षात पुतळे बनून राहिलो आहोत, हे लक्षात येतं तेव्हा वेळ आणि वय या दोन्ही गोष्टी सरून गेलेल्या असतात.

सोशल मीडियावर एक विनोद नेहमी फिरत असतो. ज्या वयात उत्तर भारतीय मुले स्वत:ला यूपीएससीच्या अभ्यासात झोकून देतात, इतर मारवाडी किंवा दक्षिण भारतीय मुलं अकौंटन्सीच्या किंवा चार्टर्ड अकौंटन्सीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी बेभान होऊन अभ्यास करत असतात त्या वयात आमची महाराष्ट्रीयन मुलं गणेशोत्सव, शिवजयंती,

नवरात्रात दांडिया मंडळ, रायगडाच्या किंवा शिर्डीच्या पायी पदयात्रा, फलाण्याबिस्ताण्या पुढा-याचे हाट बळकट करण्यासाठी काढल्या जाणा-या रॅल्या आणि आपापल्या जातीतल्या पराक्रमी किंवा संत पुरुषाच्या जयंती-मयंतीमध्ये स्वत:ला झोकून देतात. हे असं इतकं सरसकटीकरण सर्रास सगळ्याच मुलांच्या बाबतीत असेलच असं नाही, पण यातला मोठा भाग अतिशय खरा आहे आणि अतिशय कडवटही.

आपल्या इतिहासात रमायला आवडतं, आपल्याला इतिहासाशी नातं सांगायला आवडतं. या त्या शूर पुरुषाच्या वंशात, जातीत जन्म झाल्यामुळे आपणही त्या शूर पुरुषाइतकेच थोर आहोत असं मानून घ्यायला आपल्याला आवडतं. असा शूर पुरुष इतिहासात नसेल तर तो पुराणात आहे का हे तपासून, शोधून, उकरून काढून, त्याच्याशी नातं जोडून घेण्यात आपल्याला धन्यता वाटत राहते. काहीच नाही जमलं तर एखादा ढोंगी साधू किंवा बोगसबाबाही आपण चालवून घेतो.

त्याचा उदो उदो करत राहतो. हेही काही जमलं नाहीच तर गावोगावांपासून राज्य आणि राष्ट्र पातळीपर्यंतच्या भुरट्या पुढा-यांचा झालेला आत्यंतिक सुळसुळाटही आपल्या कामी येतो. ‘भंपकसायेब, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है..’ या घोषणा देताना सदरहू भंपकसायबाला आपल्यासारख्या मूर्खांनी नको इतकी साथ देऊनच तितक्या थोर भंपकपदावर बसवलं आहे

आणि आपल्या या कृतीने भंपकरावांचे करिअर सेटल झालेले असले तरी खुद्द आपले स्वत:चे जिणे बेवारस झाले आहे, याचा उमज पडावा एवढीही अक्कल आपल्यात नसते. कुणा बँकेचं पाच पंधरा हजाराचं कर्ज आपल्या कुणबी बापाच्या गळ्यातला फास होऊन बसलं आहे आणि त्याच बँकेला कुणी विजय मल्ल्या, नीरव मोदी किंवा तो कुठलासा कोठारी हे चोर व्यापारी हजारो कोटींना गंडवत आहेत, ही काय प्रकारची जादू आहे, याचा शोध घ्यावा, हे असं होऊ नये यासाठी काही झगडा उभा करावा असं आम्हाला वाटत नाही.

आम्हाला गडकिल्ल्यांची सफाई महत्वाची वाटते आणि गावातल्या घाणीने तुडुंब भरलेल्या नाल्या साफ कराव्यात असं आम्हाला वाटत नाही. आम्हाला बाप परका आणि पुढारी जवळचा वाटतो. आपण सख्ख्या बापाला नीट जेवा-खायला घालत नाही आणि पिढ्यांची माती करून मेलेल्या पुढा-याची भव्य तसबीर घरात दर्शनी भिंतीवर लावून तिला नेमाने हार घालत राहतो. आपण वर्तमानाला क्षुद्र, फालतू, बिनमहत्वाचा समजतो आणि इतिहास केवढा दिव्य होता हेच सांगत बसतो. आपण महान मूर्खांची जमात आहोत, हेही आपल्याला मरेस्तोवर नीटपणे उमगत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com