Soybean Crop: सोयाबीनला शेंगाच नाहीत; राज्य सरकार नुकसान भरपाई देणार का ?

उशिरानं शेंगा लागणार असतील तर त्याचा उत्पादकतेवर परिणाम होईल, अशीही शेतकऱ्यांना भीती आहे. त्यामुळं सध्या त्यावर उपाय काय करता येईल, असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.
Soybean Crop
Soybean CropAgrowon
Published on
Updated on

शेतकऱ्यांनी पेरलं आणि उगवलं नाही तर शेतकऱ्यांची चिंता वाढते. उगवलं आणि माल लागलाच नाही तर मात्र शेतकऱ्यांची आर्थिक कोंडीच होते. सध्या अशीच परिस्थिती राज्यातील सोयाबीन उत्पादकांची झाली आहे. अकोला जिल्ह्यातील शिवापुर येथील शेतकरी गजानन भारसाकळे यांच्या सोयाबीनला शेंगा लागल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी राज्य सरकारकडे नुकसान भरपाई मागितली आहे. त्यांचं आठ एकर सोयाबीन आहे. त्यांनी सोयाबीनचं फुले संगम केडीएस ७२६ वाण पेरलं. पिकाचं व्यवस्थापन केलं. पिकाची चांगली वाढ झाली पण सोयाबीनला फुलं आणि शेंगा लागल्या नाहीत, अशी त्यांची तक्रार आहे. भारसाकळे यांच्यासारखीच राज्यातील इतर शेतकऱ्यांची तक्रार आहे.

सोयाबीनच्या  फुले संगम केडीएस ७२६ किंवा किमया या वाणांमध्ये कोणताही दोष नाही. सतत पाऊस राहिल्यामुळे सोयाबीनला शेंगा लागत नाहीत, असं कसबे डिग्रज, जि. सांगली येथील कृषी संशोधन केंद्रातील ज्येष्ठ सोयाबीन पैदासकार डॉ मिलिंद देशमुख यांनी सांगितलं आहे. राज्यात यंदा पावसांचं  प्रमाण चांगलं राहिलं आहे. पण काही भागात सततचा पाऊस डोकेदुखी ठरला आहे. याबद्दल डॉ. देशमुख म्हणाले, "अनेक भागात सतत पाऊस राहिला आहे. त्यामुळं सोयाबीनमध्ये फुलं आणि शेंगा खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल. त्यामुळं बारीक फुलं आणि शेंगा खाणाऱ्या अळीनं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. दुसरं म्हणजे वातावरणातील टोकाच्या बदलाचाही परिणाम सोयाबीन पिकावर होऊ लागला आहे." असंही देशमुख यांनी सांगितले.

वास्तवात एक झालं की एक समस्या सोयाबीन उत्पादकांच्या पाठकुळीवर येऊ बसू लागली आहे. सोयाबीन खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात ५१ लाख हेक्टरवर सोयाबीनचं क्षेत्र पोहचलं आहे. मागच्या दोन हंगामापासून हमीभावाच्या खाली सोयाबीन विकावं लागलं. त्याचं प्रमुख कारण म्हणजे केंद्र सरकारला सुचलेली खाद्यतेल आयातीची अवदसा. मागच्या आठवड्यात पावसानं दणका दिल्यानं मराठवाडा विदर्भातील सोयाबीन उत्पादकांचं मोठं नुकसान झालं. त्यात भर म्हणजे सोयाबीन पेरलं, मशागतीचा खर्च केला, सोयाबीन उगवून आलं पण सोयाबीनला शेंगा लागल्या नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांचा जीव मुठीत आला आहे.

Soybean Crop
Soybean : अकोल्यात शेंगाच विनाच सोयाबीन, शेतकरी हवालदील; तालुक्यात बोरगाव मंजू परिसरासह बाळापूरात सारखेच चित्र

६० दिवसांच्या दरम्यान असलेल्या सोयाबीन पिकाला शेंगा लागलेल्या नाहीत, त्यामुळं शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन कसबे डिग्रज, सांगली  कृषी संशोधन केंद्र येथील वनस्पती रोगशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. सचिन महाजन केलं आहे. डॉ. महाजन यांनी सांगितलं की, "अनेक शेतकऱ्यांनी आमच्याकडे याबद्दल चौकशी केली आहे. फुले संगम आणि किमया या दोन वाणांबद्दल शेतकऱ्यांचा शेंगा न लागल्याचा अनुभव आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यावी की, बहुतांश शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक सध्या ६० दिवसांचं आहे. या दोन्ही वाणांना ७२ दिवसांनी शेंगा लागतात. सध्या फुले येण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी ७२ दिवसांपर्यंत थांबावं. घाई करू नये. पिकाचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करावं." असंही डॉ. महाजन म्हणाले.   

उशिरानं शेंगा लागणार असतील तर त्याचा उत्पादकतेवर परिणाम होईल, अशीही शेतकऱ्यांना भीती आहे. त्यामुळं सध्या त्यावर उपाय काय करता येईल, असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. यावर कडधान्य सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरीचे निवृत्त प्रमुख शास्त्रज्ञ डॉ बाळकृष्ण जमदग्नी यांनी त्यांच्या अनुभवानुसार शेंगा न लागेलल्या सोयाबीन पिकावर फवारणी करण्याचं आवाहन केलं आहे. त्यासाठी १ लिटर पाण्यामध्ये २ मिलि मॅपिक्वॅट क्लोराईड, तसेच १ लिटर पाण्यामध्ये ७ ग्रॅम पोटेशियम स्कोनाइट तर १ लिटर पाण्यात २ ग्रॅम चिलेटेड झिंक आणि १ लिटर पाण्यासाठी २ मिलि प्रोफेनोफोस ४० टक्के अधिक सायपरमेथ्रीन ४ टक्के (पूर्व मिश्रित कीटकनाशक) आणि १ लिटर पाण्यामध्ये २ मिली थायोफानेट मिथाईल ७० टक्के डब्ल्यूपी या मिश्रणाची तातडीनं फवारणी करावी, असंही डॉ. जमदग्नी यांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे मात्र किसान सभेनं सोयाबीनला शेंगा न लागलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. कृषी विभाग आणि कृषी शास्त्रज्ञ सततच्या पावसामुळे या सोयाबीन वाणांची अतिवाढ झाल्याचं सांगत आहेत. परंतु या वाणांची शिफारस करताना त्यामध्ये काही काळंबेरं असण्याची शक्यताही किसान सभेनं व्यक्त केली आहे. तसेच याप्रकरणी राज्य सरकारने चौकशी करावी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केली आहे. नवले म्हणाले, "कृषी विभागाने हे बियाणं लागवडीसाठी शेतकऱ्यांना दिलं. कृषी विद्यापीठाने त्याची शिफारस केली. सततच्या पावसाच्या क्षेत्रात लागवडीसाठी वाण योग्य आहे की नाही याचा अभ्यास कृषी विद्यापीठाने केलेला असतो. मग या वाणांबद्दल असा अभ्यास झाला होता का? अभ्यास करूनही वाणांची शिफारस का करण्यात आली ? विद्यापीठाने शिफारस केली नसेल तर मग कृषी विभागाने या सोयाबीन वाणांची शिफारस का केली?" असा प्रश्न अजित नवले यांनी केला उपस्थित केला.

वास्तवात सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आधीच कोंडी केली आहे. त्यामुळं सोयाबीन उत्पादक जेरीस आले आहेत. खरीप हंगामाच्या सुरुवातीला बोगस बियाणं आणि कृत्रिम टंचाईनं शेतकऱ्यांचं लूट केली. शेतकऱ्यांना बियाण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागले. त्यावेळी कृषी विभागानं कारवाईच्या नावाखाली लुटुपुटूची लढाई करत वेळ मारून नेली. मॉन्सूननं चांगली साथ दिली पण काही भागात अतिवृष्टीनं पिकं होत्याचं नव्हतं केलं. त्यात किड-रोगानं दणका दिला. शेतकऱ्यांचं सोयाबीन एक महिन्यात तयार होईल. पण बाजारात लीन सीझनमध्येच हमीभवाच्या खाली दर आहेत. सोयाबीन अनुदानची शेतकरी वाट पाहत आहेत. तर सोयाबीन हमीभाव खरेदीचं काय होईल ते वेळेवरच कळेल. अशा चहू बाजूनं चक्रव्यूहात अडकलेला सोयाबीन उत्पादक मेटाकुटीला आला आहे. राज्य सरकारला आता तरी जाग येणार का?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com