Rabi Season : परभणी जिल्ह्यात रब्बी पिकांच्या पेरण्या लांबणीवर

Rabi Sowing Update : पावसाच्या खंडामुळे कोरडवाहू क्षेत्रातील हलक्या-मध्यम जमिनीतील अपुरा ओलावा. सोयाबीन काढणीस झालेला विलंब आदी कारणांमुळे परभणी जिल्ह्यातील रब्बी पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.
Rabi Crop
Rabi CropAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : पावसाच्या खंडामुळे कोरडवाहू क्षेत्रातील हलक्या-मध्यम जमिनीतील अपुरा ओलावा. सोयाबीन काढणीस झालेला विलंब आदी कारणांमुळे परभणी जिल्ह्यातील रब्बी पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. सोमवारपर्यंत (ता. २१) जिल्ह्यात २ लाख ६९ हजार ५०१ पैकी २ हजार ५० हेक्टरवर (०.७६ टक्के) पेरणी झाली. मॉन्सूनोत्तर पावसामुळे ओलावा उपलब्ध झाल्यामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग येईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र २ लाख ७० हजार २०१ हेक्टर तर यंदाच्या (२०२४) रब्बी हंगामातील प्रस्तावित पेरणी क्षेत्र २ लाख ६९ हजार २०५ हेक्टर आहे. जिल्ह्यात सप्टेंबरच्या प्रारंभी अतिवृष्टी झाल्यानंतर दोन आठवड्यांहून अधिक दिवस पावसाचा खंड पडला. पावसाने उघडीप दिल्यानंतर सोयाबीनची काढणी सुरू झाली. परंतु पावसाचा दीर्घ खंड आणि तापमानात झालेली वाढ यामुळे हलक्या, मध्यम प्रकाराच्या जमिनीतील ओलावा कमी झाला.

Rabi Crop
Rabi Season 2024 : मंठा तालुक्यात रब्बीच्या पेरण्या लांबल्या

अनेक भागांत मजूर मिळत नसल्यामुळे सोयाबीन काढणीस उशीर झाला. परिणामी रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या. परंतु जमीन तयार झालेल्या शेतकऱ्यांनी दरम्यान उपलब्ध ओलाव्यावर मूग, उडदाची काढणीनंतर तसेच लवकर सोयाबीन काढणी झालेल्या शेतकऱ्यांनी प्रथम ज्वारीची पेरणी उरकून घेतली असली तरी पेरणी क्षेत्र सरासरीच्या तुलनेत खूप कमी आहे. हरभऱ्यांचे पेरणी क्षेत्र हजार हेक्टरच्या आतच आहे.

सोमवारपर्यंत (ता. २१) कृषी विभागाकडील उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यात रब्बी ज्वारीची १ हजार २५० हेक्टर (१.११ टक्के) व हरभऱ्याची ८०० हेक्टर (०.७१ टक्के) पेरणी झाली आहे. मागील दोन तीन दिवसांत जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पाऊस झाला. अनेक भागांत जोरदार पाऊस झाल्यामुळे जमिनीतील ओलाव्यात वाढ झाली आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रखडलेली पेरणी पूर्ण करता येईल. सिंचनासाठी पाणी उपलब्ध असले तरी कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा मिळत नसल्यामुळे जमिनी ओलावण्यासह पिकांना पाणी देण्यासाठी अडचणी येत आहेत.

Rabi Crop
Rabi Sowing : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रब्बीचा पेरा ३१ हजार हेक्टरवर

रब्बी ज्वारी पेरणी कालावधी कोरडवाहू क्षेत्रात १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर तर बागायती क्षेत्रात ३१ ऑक्टोबर आहे. हरभरा पेरणीचा कालावधी कोरडवाहू क्षेत्रात ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा तर बागायती क्षेत्रात ऑक्टोबरचा शेवटचा ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा आहे. गहू पेरणीचा कालावधी पुरेशी थंडी सुरू होताच २० नोव्हेबरपर्यंत तर उशिरा पेरणी १५ डिसेंबरपर्यंत आहे. करडई पेरणीसाठी बागायती क्षेत्रात ३० ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर, सूर्यफूल पेरणीसाठी ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा, जवस पेरणीसाठी १५ ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी योग्य आहे, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा प्रकल्पाचे समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी दिली.

पावसाचा खंड, उन्हामुळे ओलावा कमी होऊन जमीन कडक झाली होती. त्यामुळे पेरणीसाठी दोन एकर जमीन तुषार संचाद्वारे ओलावली. गेल्या दोन पावसांमुळे ओलाव्यात वाढ झाल्याने आता पेरणी करता येईल.
बाजीराव शेवाळे, शेतकरी, गणपूर, ता. जिंतूर, जि. परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com