Kharif Sowing : कापूस, सोयाबीन, तुरीच्या पेरण्या अंतिमतेकडे

राज्याच्या बहुतेक भागात जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्यामुळे काही भागातील खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

पुणे ः राज्याच्या बहुतेक भागात जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस (Good Rainfall) झाल्यामुळे काही भागातील खोळंबलेल्या पेरण्यांना वेग (Kharif Sowing) आला आहे. राज्यातील १५८ मंडळांमध्ये आताच १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला आहे. दुसऱ्या बाजूला कापूस (Cotton), ऊस (Sugarcane) आणि तूर ()Tur या मुख्य खरीप पिकांच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत.

Kharif Sowing
Kharif Sowing : राज्यात खरीप पेरण्या वेगात

मुख्य खरीप पीक असलेल्या सोयाबीनचा पेरा सात जुलैअखेर ३४.४७ लाख हेक्टरवर झाला आहे. तो एकूण सरासरी क्षेत्राच्या ८९ टक्के आहे. तसेच, दुसरे मुख्य खरीप पीक असलेला कापूस पेरा ३३.७५ लाख हेक्टरवर (८१ टक्के) झाला आहे. तुरीच्या पेरण्या आठ लाख हेक्टरच्या (६२ टक्के) आसपास आल्या आहेत. मका ५.२५ लाख हेक्टर (६३ टक्के) खरीप ज्वारी ७८ हजार हेक्टर (१६ टक्के), बाजरी दोन लाख हेक्टर (२९ टक्के), मूग १.८४ (३८ टक्के) तर उडदाचा पेरा १.९५ लाख हेक्टरवर (५५ टक्के) झाला आहे. खरिपात शेतकरी सरासरी एकूण १४१ लाख हेक्टरवर विविध पिकांच्या पेरण्या करतात. त्यापैकी आतापर्यंत ९२ लाख हेक्टरवरील पेरण्या आटोपल्या आहेत.

Kharif Sowing
Soybean Rate : सोयाबीन दर ५८०० रुपयांवर स्थिरावण्याची चिन्हे

जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून राज्याच्या बहुतेक भागात भीज पाऊस होत आहे. राज्यात जून ते सप्टेंबर असा खरिपात सरासरी १००४ मिलिमीटर पाऊस होतो. त्यापैकी २९३ मिलिमीटर पाऊस आतापर्यंत नोंदविला जातो. यंदा आतापर्यंत एकूण सरासरीच्या २८३ मिलिमीटर (९६ टक्के) इतका पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत ३०७ मिलिमीटर पाऊस झाला होता. जूनमध्ये सरासरीच्या १४७ मिलिमीटर (७१ टक्के) पाऊस झाला आहे. जुलैमध्ये राज्यात ११६ मिलिमीटरपर्यंत सरासरी पाऊस होतो. त्यापैकी ८ जुलैपर्यंत १३६ मिलिमीटर (१५९ टक्के) झाला आहे.

सध्या कोकण, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच तर विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात चांगला पाऊस होतो आहे. केवळ नंदूरबार भागातील तळोदा व अक्राणी भागात पेरण्या खोळंबल्या आहेत. तेथे आठवडाभरात २५ टक्केही पाऊस झालेला नाही. एक ते आठ जुलैच्या दरम्यान राज्यात इगतपुरी, नंदूरबार, नवापूर, सांगोला, कोरेगाव, खंडाळा, कडेगाव, चंदगड, राधानगरी, जळगाव जामोद, संग्रामपूर, मौदा, मुळचेरा, सिरोंचा, अहेरी व कारोची अशा १७ मंडळामध्ये कमी म्हणजे २५ ते ५० टक्के पाऊस झाला आहे. राज्यात ५० ते ७५ टक्के पाऊस ७० मंडळांमध्ये झालेला आहे. तेथे उर्वरित पेरण्यासाठी उत्तम स्थिती आहे. १०८ मंडळांमध्ये १०० टक्के पाऊस झाला आहे. १५८ मंडळांमध्ये मात्र १०० टक्क्यांपेक्षाही जास्त पाऊस झाला आहे.

दोन लाख हेक्टरवरच धानाचा पेरा

“राज्यात पावसाअभावी रखडलेल्या काही गावांमध्ये कपाशी, सोयाबीनचा पेरा आता सुरू झाला आहे. या पिकांचा जूनमध्ये पेरा केलेल्या आणि आता जास्त पाऊस असलेल्या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ चालू आहे. चांगल्या पावसामुळे धानाच्या पुनर्लागणीला वेग मिळेल. कारण, १५ लाख हेक्टरपैकी आतापर्यंत केवळ दोन लाख हेक्टरवर धानाचा पेरा झालेला आहे,” अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

राज्यात काय सुरू आहे

- राज्यात १५८ मंडलांत १०० टक्क्यांपेक्षाही जास्त पाऊस

- कपाशी, सोयाबीनच्या पेरण्या अंतिम टप्प्यात

- वाफसा स्थिती आलेल्या भागात उर्वरित पेरण्या वेगात

- भरपूर पावसाच्या गावांमध्ये भाताच्या पुनर्लागवडी चालू

- रोपवाटिकांमधील भाजीपाला रोपांच्या पुनर्लागवडी सुरू

- पावसाअभावी रखडलेल्या भागात कापूस, सोयाबीन, तूर पेरण्या वेगात

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com