South Coast Botanic Gardens : प्लॅस्टिक प्रदूषणाबाबत जागृती करणारी साउथ कोस्ट बोटॅनिक गार्डन

अमेरिकेत विस्तीर्ण क्षेत्रावर विविध प्रकारच्या बागा विकसित करण्यात आल्या आहेत. या बागांमध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती, पशूपक्षी, फुलपाखरे पाहावयास मिळतात. यापैकीच एक आहे कॅलिफोर्नियामधील लॉसएंजलिस जवळील साऊथ कोस्ट बोटॅनिक गार्डन.
South Coast Botanic Gardens
South Coast Botanic GardensAgrowon

डॉ. व्यंकटराव घोरपडे

South Coast Botanic Gardens update : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील लॉसएंजलिस जवळ सुमारे ८७ एकर क्षेत्रामध्ये साउथ कोस्ट बोटॅनिक गार्डन पसरलेले आहे. या विस्तारित बागेमध्ये विविध प्रकारची झाडे, फुलझाडे, निवडुंगाचे प्रकार, विविध गुलाबांचे ताटवे दिसतात.

अत्यंत योजनाबद्धरीतीने जमिनीच्या चढ-उतारावर तयार केलेली बाग पाहताना माझे लक्ष एका सुंदर कलाकृतीकडे गेले. तो समुद्र जीव ‘जेली फिश’ होता. थोडी गर्दी होती, परंतु ज्या वेळी जवळून पाहिले तेव्हा ही कलाकृती टाकाऊ प्लॅस्टिकपासून बनविलेली होती.

साउथ कोस्ट बोटॅनिक गार्डनमध्ये एक एप्रिल रोजी अशा प्रकारच्या विविध कलाकृतींचे उद्‍घाटन झाले. प्लॅस्टिक प्रदूषणाचे दुष्परिणाम लोकांसमोर येण्यासाठी टाकाऊ प्लॅस्टिकपासून या कलाकृती तयार करण्यात आल्या आहेत.

वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतींचे प्रदर्शन

प्लॅस्टिक प्रदूषणाचा परिणाम पिण्याच्या पाण्यापासून पर्यावरण, पाळीव प्राणी त्याचबरोबर जलचर यांच्यावर होत असतो. सागरी जीव, मासे, कासव हे प्लॅस्टिकचे तुकडे अन्न म्हणून खातात आणि मृत्युमुखी पडतात.

या बागेतील सर्व कलाकृती पाहिल्या तर त्यामध्ये जाड प्लॅस्टिकचे तुकडे, मासे पकडण्याच्या जाळ्या, संगणकाचे काही भाग गोळा करून तयार करण्यात आल्या आहेत.

त्यातून प्लॅस्टिक कचऱ्याबाबत प्रबोधन करण्याचा एक प्रयत्न आहे. अनेक पर्यटक या ठिकाणी सेल्फी काढून आपापल्या ग्रुपमध्ये शेअर करताना दिसत होते. त्यातूनच एक प्रकारची जनजागृती होताना दिसत होती.

South Coast Botanic Gardens
South Cost Botanic Garden : समुद्रातील प्लास्टिक कचऱ्यापासून साकारलेली समुद्री जीवांची शिल्पे

विविध रंगाचे, जाडीचे वेगवेगळे प्लॅस्टिकचे तुकडे वापरून या कलाकृती बागेत उभ्या केल्या होत्या. हे सर्व समुद्र जीव, पक्ष्यांची कलाकृती बागेत का उभी केली असावी, याबाबत माहिती घेतली असता असे कळाले, की Washed Ashore - Art to Save the Sea या सेवाभावी संस्थेने ३०० मैल समुद्रकिनारपट्टीवरून सुमारे १७,२३७ किलो प्लॅस्टिक गोळा केले.

त्यापासून या सुंदर कलाकृती तयार केल्या आहेत. लोकांचे प्लॅस्टिक कचऱ्याबाबत प्रबोधन होण्यासाठी संस्थेने या कलाकृती तयार केल्या आहेत. या ठिकाणी वापरून फेकलेले लायटर, प्लॅस्टिक बाटल्यांची टोपणे, लहान मुलांची तुटलेली खेळणी वापरून तयार केलेला ऑक्टोपस पाहायला मिळतो.

विविध प्रकारच्या बाटल्यांची झाकणे, खेळणी, प्लॅस्टिक चप्पल, समुद्रात जहाजांच्या मार्गदर्शनासाठी वापरावयाच्या खुणांपासून तयार केलेली सील, संगणकाचे सुट्टे भाग, खुर्च्या, मासेमारीच्या जाळ्यांचा वापर करून तयार केलेली जेली फिशची कलाकृती लोकांचे लक्ष वेधून घेते.

मी स्वतः पशुवैद्यक असल्याने जनावरांच्या आरोग्यावर प्लॅस्टिक प्रदूषणाचे दुष्परिणाम अनुभवलेले आहेत. भटक्या जनावरांच्या पोटातून आम्ही शस्त्रक्रियाकरून ७० किलोपर्यंत प्लॅस्टिक पिशव्या काढल्या आहेत.

आपल्याकडील लोक प्लॅस्टिक पिशव्यांत शिळे अन्न, फळे आदी वस्तू भरून कचराकुंडीत फेकून देतात. त्या सर्व गोष्टी भटक्या जनावरांच्या आहारात येतात. गेल्या काही वर्षांत ओला, सुका कचरा, प्लॅस्टिक भंगार वेगळे करण्यासाठी तसेच पुनर्वापरासाठी जनजागृती होत आहे.

परंतु सर्वांनीच जागरूक होण्याची वेळ आली आहे. आपल्याकडेही एकदाच वापरावयाच्या प्लॅस्टिकवर बंदी आलेली आहे. पण त्याचा वापर आपण थांबवला आहे का, याचा प्रत्येकाने विचार करणे जरुरीचे आहे.

South Coast Botanic Gardens
Smart Project : ‘स्मार्ट’अंतर्गत १९ शेतकरी कंपन्यांचा प्रकल्प अहवाल मंजूर

प्लॅस्टिक प्रदूषणाची समस्या

प्लॅस्टिक प्रदूषण जगासमोर सर्वांत मोठी समस्या आहे. या प्रदूषणामुळे अनेक प्राणी, जीव नष्ट होत आहेत. प्लॅस्टिक पाण्यात, जमिनीत नैसर्गिकरीत्या विघटित होत नाही. त्याच्यावर उष्णतेचा परिणाम होत नाही. त्याचबरोबर वातावरणात शेकडो वर्षे टिकून राहते.

माती आणि पाणी प्रदूषित करते. एक मिलिमीटर जाडीचे प्लॅस्टिक पूर्णपणे निसर्गात विघटित होण्यासाठी साधारण ५०० वर्षे लागू शकतात, असे या विषयातील तज्ज्ञांचे मत आहे.

जगभरात सगळीकडे प्लॅस्टिकचा प्रचंड वापर वाढला आहे. अमेरिकेत प्लॅस्टिकचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो. दरवर्षी ३८ दशलक्ष टन प्लॅस्टिक वापरले जाते. त्यातून फार मोठा धोका निर्माण होत आहे.

प्लॅस्टिक वापर कमी करणे, पर्याय स्वीकारणे, पुनर्वापराबाबत आग्रही धोरण, संबंधित कडक कायदे आणि अंमलबजावणीवर येथील सरकारने भर दिला आहे. समुद्र, नदीमध्ये कोणत्याही प्रकारचे प्लॅस्टिक टाकू नये यासाठी अनेक देशांत कायदे झाले आहेत.

बागेची वैशिष्ट्ये

१) साउथ कोस्ट बोटॅनिक गार्डनमध्ये कॅलिफोर्नियातील मूळ वनस्पती, स्थानिक झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड पाहायला मिळते. त्यामुळे त्यांची चांगली वाढ झालेली दिसते. ही बाग मधमाश्‍या, विविध फुलपाखरे, पक्षी यांचे निवासस्थान आहे. फुलपाखरे, पशुपक्ष्यांच्या निवासामुळे या बागेला एक चांगले नैसर्गिक स्वरूप आले आहे.

२) या ठिकाणी ‘डेझर्ट गार्डन’ निर्माण करून वाळवंटी प्रदेशातील निवडुंग, कोरफड, युफोर्बियासारख्या वनस्पती आफ्रिका, मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेतून आणून लागवड केलेली आहे.

३) हरितगृहामध्ये उष्ण कटिबंधीय वनस्पतीची लागवड करण्यात आली आहे.

४) काही भागांत जपानी पद्धतीच्या बागा, तसेच पाणीपुरवठ्यासाठी तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. बोन्सायचे विविध प्रकार, जपानी दगडांचे शिल्प प्रदर्शित करून बागेमध्ये उठावदारपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे.

५) बागेत छोटे-मोठे कार्यक्रम, लग्न समारंभासाठी सर्व सोयींनीयुक्त अशा जागा निर्माण करून उत्पन्नाचे चांगले साधन तयार केलेले आहे.

(लेखक सेवानिवृत्त सहायक पशुसंवर्धन आयुक्त आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com