Jowar Farming : ज्वारी पीक झाले कोळगिरीचा आधार

Kolagiri System : सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील कोळगिरी हे कायम दुष्काळी गाव आहे. ज्वारी याच मुख्य पिकावर येथील गावकऱ्यांची भिस्त असून, हेच पीक त्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य भाग झाले आहे.
Jowar Farming
Jowar FarmingAgrowon
Published on
Updated on

Rural Economy : सांगली जिल्ह्यातील जत तालुका आपली दुष्काळी ओळख पुसण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो आहे. आटोकाट प्रयत्न करून पाण्याची उपलब्धता करून जिद्दीने लढत इथला शेतकरी शेती फुलवतो आहे. तालुक्यातील जत - उमदी राज्यमार्गावर अडीच ते तीन हजारांपर्यंत लोकसंख्या असलेलं कोळगिरी गाव वसलं आहे. वरुणराजाच्या कृपेवर इथल्या खरीप व रब्बी हंगामाची भिस्त असते.

भौगोलिक क्षेत्र १६७९ हेक्टर असून, पैकी खरीप ४१६ हेक्टर तर रब्बीचे क्षेत्र ११८८ हेक्टरपर्यंत आहे. ज्वारी या मुख्य पिकासह तूर, मूग, उडीद, मका, कांदा आदी पिकेही शेतकरी घेतात. पिण्यासह शेतीसाठीही शाश्‍वत पाण्याची सुविधा नाही. शेतकऱ्यांनी विहिरी, कूपनलिका घेतल्या. परंतु बागायती क्षेत्र आणि फळबागा लागवड कमीच आहे. अनेक कुटुंबे मोलमजुरी करतात. तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमधील कुटुंबे दरवर्षी सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यांत ऊस तोडणीसाठी जातात.

ज्वारी पिकावर संपूर्ण भिस्त

ज्वारी हे कोळगिरी गावचे खात्रीचा उदरनिर्वाहाचे मुख्य पीक आहे. अलीकडील चार वर्षांतील रब्बी ज्वारीचे क्षेत्र पुढीलप्रमाणो आहे.

वर्ष क्षेत्र (हेक्टर)

२०२१-२२ ९८६

२०२२-२३ ९१०

२०२३-२४ ९४०

२०२४-२५ १००५

Jowar Farming
Rabi Jowar Farming : रब्बी ज्वारीमध्ये एक कोळपणी महत्त्वाची

गावातील भीमण्णा कांबळे, शरद जाहीर, वसंत कांबळे हे अनुभवी शेतकरी त्याबाबत अनुभव विषद करताना म्हणतात, की आमच्या वाट्याला दुष्काळ कायमच आला आहे. शेती फुलविण्याची इच्छा असूनही मर्यादा येतात. रब्बी हंगामातील ज्वारी हेच आमचं प्रमुख पीक. दुष्काळ असो वा अतिपाऊस, वाड-वडिलांच्या काळापासून या पिकाची परंपरा आम्ही गावकऱ्यांनी कायम ठेवली आहे. या भागात परतीचा पाऊस पडतो. त्याच्या भरवशावर हे पीक येतं.

लागवडीतील बाबी

सुचित्रा, वसुधा, मालदांडी आदी वाण शेतकरी घेतात. एक एकरापासून ते दहा एकरांपर्यंत ज्वारी घेणारे शेतकरी गावात आहेत. अर्थात, पावसाच्या प्रमाणानुसार क्षेत्र अवलंबून असतं. उपलब्धतेनुसार किंवा वर्षातून एकदा तीन ट्रेलर शेणखताचा वापर होतो. बहुतांश शेतकरी यंत्राद्वारे व सप्टेंबरच्या मध्यापासून पेरणी करतात. उत्पादन वाढीसाठी काही शेतकऱ्यांनी व्यवस्थापनात सुधारणा केल्या आहेत. दोन ओळींतील अंतर १२ इंचांवरून १६ इंच, तर दोन रोपांतील अंतर अडीच इंचावरून तीन ते चार इंचठेवले आहे. अंतर वाढविल्याने हवा खेळती राहण्यास मदत झाली आहे. ज्वारीच्या धाटाची जाडी वाढते.कणसाचा आकार मोठा होण्यास मदत होते. दोन वेळा कोळपणी केल्याने पिकाची वाढ चांगली होते.

Jowar Farming
Jowar Crop : ज्वारीचे पीक वाढीच्या अवस्थेत

उत्पादन व विक्री व्‍यवस्था

पावसावर येणारे पीक असल्याने उत्पादन खर्च एकरी सुमारे १५ ते १६ हजारांपर्यंत, तर उत्पादन ७ ते ९ क्विंटलपर्यंत मिळते. घरी वर्षभर पुरेल एवढी ठेऊन उर्वरित ज्वारीची जत बाजार समितीत विक्री होते. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे हे दुय्यम बाजार आवार आहे. उडीद, ज्वारी, मूग विक्रीसाठी तालुक्यातील शेतकरी येथे येतात. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची ही हक्काची बाजारपेठ आहे. काही व्यापारी बांधावरही ज्वारी खरेदीला येतात. गावातील कुटुंबे ऊस तोडणीसाठी सांगली, कोल्हापूरसह अनेक भागात जात असल्याने त्यांची ने-आण करण्यासाठी येणाऱ्या वाहन चालक - मालकांकडूनही ज्वारीची खरेदी होते.

जत बाजार समितीत दोन वर्षापूर्वी ज्वारीला प्रति क्विंटल दर चार हजार, मागील वर्षी ६५०० तर यंदा २६०० रुपये दर आहे. यंदा पाऊस चांगला झाला असल्याने पेरा व त्याचबरोबर उत्पादनही वाढेल असा अंदाज व्यापारी शिवकुमार बेळुंकी व्यक्त करतात. यंदा दर जेमतेम असल्याने शेतकरी एकूण परिस्थिती पाहूनच विक्रीचे नियोजन करतील अशी शक्यता आहे.

कडबा विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न : धान्यासोबत ज्वारीचा कडबाही मुबलक म्हणजे एकरी १२०० ते १५०० पेंढ्यांपर्यंत मिळतो. गावातील २५ ते ३० टक्के शेतकऱ्यांकडे पशुधन आहे. त्यामुळे घरच्या जनावरांपुरता ठेवून उर्वरित कडब्याची अडीच हजार रुपये प्रति शेकडा दराने विक्री होते. त्यातून उत्पादन खर्च कमी होतो.

ज्वारी उत्पादकांचे अनुभव

ज्वारीसाठी जत ही हक्काची बाजारपेठ आहे. परंतु अपेक्षित दर मिळत नाही ही आमची व्यथा आहे. त्यामुळे येत्या काळात ज्वारीचे मूल्यवर्धन करून प्रक्रिया उद्योगात उतरण्याचा आमचा प्रयत्न आहे. गावातच असा उद्योग सुरू झाल्यास सर्वांचा फायदा होईल. कृषी विभागाने मार्गदर्शन करून त्याद्वारे पुढाकार घ्यावा.
बसवराज बिराजदार ९०२१५४५९५४
परंपरागत कृषी विकास योजनेच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी भीमरत्न शेतकरी पुरुष बचत गट स्थापन केला आहे. त्यात २२ शेतकरी आहेत. सेंद्रिय ज्वारी उत्पादनाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. सेंद्रिय प्रमाणीकरणासाठी गटाची निवड झाली आहे. त्यामुळे या वर्षापासून त्या पद्धतीने विक्रीसाठी ‘आत्मा’ विभागाने मदतीचा हात दिला आहे. त्यातून विक्रीची साखळी उभारली जाणार आहे
रमेश बाबर ९९२३०२५९६५
मागील वर्षी ज्वारीला चांगले दर मिळाले. यंदा परतीचा पाऊस चांगला झाल्याने पीक चांगले पोसले आहे. सध्या प्रतवारीनुसार प्रति क्विंटल २३०० ते २६०० रुपये आहेत. बाजारातील आवक, दरांचा अभ्यास करूनच विक्रीचे नियोजन आहे.
चंदू बिराजदार ९९७५५४१३८९
तालुक्यात परंपरागत कृषी विकास योजना तीन वर्षापासून राबवत आहोत. त्या अंतर्गत तालुक्यात १५ गट व त्या माध्यमातून ३२० शेतकरी जोडले आहे. गटाने उत्पादित केलेल्या ज्वारीची विक्री करण्यासाठी समविचारी फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली आहे. दोन वर्षापासून सेंद्रिय ज्वारीचे उत्पादन घेतले जात आहे. यंदाच्या हंगामापासून प्रमाणपत्रासह विक्री सुरु होईल.
रविकिरण पवार, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, जत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com