Jowar Cultivation : हुरड्यासाठी ज्वारी लागवडीचे तंत्र

Hurda Jawari : हुरड्यासाठी ज्वारीची लागवड १५ ऑक्टोबरपर्यंत पेरणी पूर्ण करावी. आर्थिक फायद्यासाठी टप्प्या टप्प्याने लागवड करावी. दोन ओळीतील अंतर ४५ सेंमी आणि दोन रोपात १५ सेंमी अंतर ठेवावे. पेरणीकरिता हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे.
Sorghum sowing
Sorghum sowingAgrowon

डॉ.आदिनाथ ताकटे

Sorghum Cultivation : हिरव्या दाण्याचा हुरडा अतिशय स्वादिष्ट लागतो, कारण त्यावेळेला या दाण्यामध्ये मुक्त अमिनो आम्ल, साखर, विद्राव्य प्रथिने, जीवनसत्वे यांचे प्रमाण अधिक असून पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी असते. खास हुरडयासाठी गोडसर रसाळ आणि भरपूर दाणे असणाऱ्या जाती राज्यातील कृषि विद्यापीठांनी विकसित केल्या आहेत.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ ,राहुरी यांनी विकसित केलेल्या जाती ः
१) फुले मधुर (आर एस एस जी व्ही -४६)

- उत्कृष्ट प्रतीचा व चवदार हुरडा.
- खोड मध्यम,गोड ,रसरशीत.
- वाण उंच व पालेदार जात.
- हुरडा अवस्था येण्यास ९३ ते ९८ दिवस लागतात.
-हुरडा अवस्थेत दाणे सहज सुटण्याचे प्रमाण हे ९५ टक्के पेक्षा जास्त.
- खोडमाशी किडीस ,खडखड्या रोगास प्रतिकारक
- अवर्षणास प्रतिकारक
- हुरड्याचे उत्पादन ३०-३५ क्विं./हे.
- कडब्याचे उत्पादन ६५ ते ७० क्विं./ हेक्टरी

फुले उत्तरा
- स्थानिक जातीतून निवड पद्धतीने विकसित
- हुरड्याची अवस्था येण्यास ९०-१०० दिवस
- भोंडातून दाणे सहज बाहेर पडतात
-सरासरी ७०-९० ग्रॅम इतका हुरडा मिळतो.
- हुरडा चवीस सरस अत्यंत गोड.
-ताटे गोड असल्याने जनावरे कडबा चवीने खातात.
-कणीस गोलाकार,मध्यम घट्ट
- मध्यम उंचीचा,पाने पालेदार
- खोड मध्यम ,गोड रसरशीत
-खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
- हुरडा उत्पादन ः २०-२५ क्विंटल प्रती हेक्टरी
- कडब्याचे उत्पादन ः  ५५ते ६० क्विंटल प्रती हेक्टरी


Sorghum sowing
Rabi Jowar Sowing : रब्बी ज्वारी लागवडीचे पंचसूत्री तंत्रज्ञान

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ ,परभणी
एसजीएस ८-४

- हुरडा रुचकर आणि गोड
- हुरडयाची प्रत उत्तम
- कणसातून दाणे सहजरीत्या वेगळे होतात
-इतर हुरड्याच्या जातीपेक्षा याचा दाना टपोरा
- हुरडा उत्पादन १५-१६ क्विंटल प्रती हेक्टरी
- कडब्याचे उत्पादन ७०-७५ क्विंटल प्रती हेक्टरी.

परभणी वसंत (पीव्हीआरएसजी १०१)
- खाण्यास चवदार,गोड,मऊ
- कणसातून दाणे सहजरीत्या वेगळे होतात
-हुरड्याची अवस्था येण्यास ९५ दिवस
- खोडमाशी ,खोड कीड व खडखड्या रोगास सहनशील
- दाण्याची आणि कडब्याची प्रत उत्तम
-हुरडा उत्पादन ३४ क्विंटल प्रती हेक्टरी
-कडब्याचे उत्पादन १३३-१३५ क्विंटल प्रती हेक्टरी
-मराठवाडा विभागासाठी शिफारस

पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ ,अकोला

ट्रॉम्बे अकोला सुरुची (टी ए के पी एस -५)

- मळणीस अतिशय सुलभ
-हुरडयाची प्रत उत्तम,चवदार
-हुरडा तयार होण्याचा कालावधी ९१ दिवस
-हुरडयाचे उत्पादन ४३ क्विंटल
-हिरवा चारा उत्पादन ११० क्विंटल
- महाराष्ट्रासाठी प्रसारित

Sorghum sowing
Summer Jowar Cultivation : शेतकऱ्यांचा उन्हाळी ज्वारी लागवडीकडे कल

स्थानिक जाती: सुरती,गूळभेंडी ,कुची कुची,काळी दगडी ,वाणी,मालदांडी

लागवडीचे तंत्र ः

१) मध्यम ते भारी, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडावी.
२) पेरणीपूर्वी जमिनीची नांगरट केल्यास जमिनीत पाणी मुरण्यास मदत होते. जमिनीची बांध बंदिस्ती करावी. सारा यंत्राने वाफे पाडून त्यामध्ये बळिराम नांगराने बांधणी करावी. त्यामुळे परतीच्या पावसाचे पाणी पूर्णपणे वाफ्यात साचून जमिनीत मुरण्यास मदत होते.


३) १५ ऑक्टोबरपर्यंत पेरणी पूर्ण करावी. खोड माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि भरपूर उत्पादन मिळण्यासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी करावी. आर्थिक फायद्यासाठी टप्प्या टप्प्याने लागवड करावी.


४) दोन ओळीतील अंतर ४५ सेंमी आणि दोन रोपात १५ सेंमी अंतर ठेवावे. पेरणीकरिता हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे.
५) प्रति किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधक चोळावे.त्यानंतर २५ ग्रॅम प्रत्येकी अॅझोटोबॅक्टर आणि २५ ग्रॅम पीएसबी या जिवाणू खतांची बीजप्रक्रिया करावी.

६) मध्यम जमिनीत पेरणी करताना प्रति हेक्टरी ४० किलो नत्र आणि २० किलो स्फुरद म्हणजेच ८७ किलो युरिया आणि १२५ किलो एसएसपी दोन चाड्याच्या पाभरीने द्यावे. भारी जमिनीत पेरणी करताना प्रति हेक्टरी ६० किलो नत्र आणि ३० किलो स्फुरद म्हणजेच १३० किलो युरिया आणि १८७ किलो एसएसपी द्यावे.

बागायती ज्वारीसाठी, मध्यम व खोल जमिनीसाठी जमिनीकरिता प्रति हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश म्हणजेच १७४ किलो युरिया, २५० किलो एसएसपी आणि ६७ किलो एमओपी याप्रमाणे खते द्यावीत.
७) बागायती ज्वारीच्या पेरणीच्या वेळी संपूर्ण स्फुरद,पालाश व अर्धे नत्र द्यावे. उर्वरित नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी पहिली खुरपणी झाल्यावर साधारणपणे द्यावे.


८) भारी जमिनीत प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावे. त्याकरिता २१७ किलो युरिया, ३०८ किलो एसएसपी आणि ८४ किलो एमओपी द्यावे.
९) पेरणी करतेवेळी संपूर्ण स्फुरद,पालाश व अर्धे नत्र द्यावे.उर्वरित नत्र साधारणपणे पेरणीनंतर एक महिन्यांनी पहिली खुरपणी झाल्यावर द्यावे.
१०) कोरडवाहू रब्बी ज्वारीस पेरणीच्या वेळी ५०:२५:२५ नत्र:स्फुरद:पालाश प्रति हेक्टरी दोन चाड्याच्या पाभरीने द्यावे.

११) ज्वारीची उगवण झाल्यावर १० ते १२ दिवसांनी विरळणी करावी.पिकाच्या सुरवातीच्या ३५ ते ४० दिवसात पीक ताणविरहित ठेवावे. पेरणीनंतर आवश्यकतेनुसार १ ते २ वेळा खुरपणी करावी आणि तीन वेळा कोळपणी करावी. पहिली कोळपणी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी फटीच्या कोळप्याने करावी.


दुसरी कोळपणी पेरणीनंतर पाच आठवड्यांनी पासेच्या कोळप्याने करावी.त्यामुळे रोपांना मातीचा आधार मिळतो. तिसरी कोळपणी आठ आठवड्यांनी दातेरी कोळप्याने करावी.त्यामुळे जमिनीच्या भेगा बुजवण्यास मदत होऊन जमिनीतील ओल्याव्याचे बाष्पीभवन न होता जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

१२) कोरडवाहू ज्वारीस संरक्षित पाण्याची सोय असल्यास पीक गर्भावस्थेत असताना पेरणीनंतर २८ ते ३०दिवसांनी किंवा पीक पोटरीत असताना ५० ते ५५ दिवसांनी द्यावे. दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी द्यावे. बागायती ज्वारीस मध्यम जमिनीत तिसरे पाणी फुलोऱ्यात असताना पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी द्यावे.


१३) अंगठा आणि बोटाच्या मध्ये ज्वारीचा दाणा दाबून पाहिल्यास दुधासारखा द्रव किंचित बाहेर येतो. दाणे मऊसर लागतात. झाड फुलोऱ्यात आल्यानंतर १५ ते २५ दिवसांत ही अवस्था येते. या टप्प्यावर दाण्यामध्ये स्टार्च वेगाने साचत असते. या अवस्थेत एकूण धान्य वजनाच्या ५० टक्के एवढे असते. पुढे हुरड्याच्या अवस्थेत दाण्यामध्ये ते प्रमाण ६५ ते ६८ टक्के एवढे असते. हुरडा अवस्थेमधील कणसे आणल्यानंतर कणसे खुडून ती हाताने चोळावीत.. हाताने चोळल्यानंतर त्यामधील दाणे सहज वेगळे होऊ शकतात. हुरडा ४ अंश सेल्सिअस तापमानात साठवल्यास ३० दिवसांपर्यंत चांगला राहू शकतो.

जमिनीच्या प्रकारानुसार रासायनिक खतांचा वापर :
------------------------------------रासायनिक खतांचे हेक्टरी प्रमाण (किलो)
जमिनीची प्रकार
(खोली सें.मी.) -----------------कोरडवाहू--------------बागायती
-------------नत्र(युरिया)---स्फुरद(एसएसपी)---पालाश(एमओपी)---नत्र(युरिया)---स्फुरद(एसएसपी)---पालाश(एमओपी)
मध्यम(४५-६० सेंमी)---४०(८७)---२०(१२५) - ----८०*(१७४)---४०(२५०)---४०(६७)
भारी(६० पेक्षा जास्त )---६०(१३०)---३०(१८८)- -----१००*(२१७)---५०(३१३)---५०(८४)
टीप ः
*नत्र दोन हफ्त्यात (पेरणीवेळी अर्धे व पेरणीनंतर एक महिन्याने अर्धे),संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळेस द्यावे.
कोरडवाहू जमिनीस संपूर्ण नत्र,स्फुरद व पालाश ( ५०:२५:२५ किलो /हेक्टरी) दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे.


संपर्क ः डॉ.आदिनाथ ताकटे,९४०४०३२३८९
(एकात्मिक शेती पद्धती,महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी,जि.नगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com