Wheat Storage : दीर्घ काळ गहू साठवणीसाठी उपाययोजना

Article by Dr. Vijendra S Baviskar : साठवणुकीच्या योग्य सोयीअभावी सुमारे ६ टक्के इतके धान्य खराब होते. वेळेवर काढणी, योग्य यंत्रांचा वापर, सुरक्षित साठवणूक आणि साठवणीतील किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना यातून हे नुकसान कमी करणे शक्य आहे.
Insects in grain
Insects in grainAgrowon
Published on
Updated on

डॉ. विजेंद्र एस. बाविस्कर

Grain Storage Solution : भारत हा जागतिक पातळीवर चीननंतर दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे. पीक लागवडीपासून काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणात काळजी घेऊन घेतलेल्या गहू धान्यांच्या साठवणीबाबत आपल्याकडे तितक्या प्रमाणात लक्ष दिले जात नाही.

कापणीनंतर साठवणुकीपर्यंतच्या काळात सुमारे १० टक्के, साठवणुकीच्या योग्य सोयीअभावी सुमारे ६ टक्के इतके धान्य खराब होते. वेळेवर काढणी, योग्य यंत्रांचा वापर, सुरक्षित साठवणूक आणि साठवणीतील किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना यातून हे नुकसान कमी करणे शक्य आहे.

कापणीपासून गहू साठवणुकीची प्रक्रिया सुरू होते. कारण कापणीसाठी वापरलेली उपकरणे, पर्यावरणीय परिस्थिती (आर्द्रता आणि तापमान) हे घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. खापरा बीटल, सुरवंट आणि उंदीर हे प्रामुख्याने धान्याच्या गुणवत्तेवर परिणाम करतात.

हे किडे बियाणे आणि माती या व्यतिरिक्त काढणी, मळणीसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्राद्वारे साठवणीमध्ये पोहोचू शकतात. किडे आणि सूक्ष्मजीव आणि बुरशींच्या वाढीसाठी दाण्यामधील ओलाव्याचे अधिक प्रमाण, उच्च तापमान हे महत्त्वाचे ठरतात.

ओलावा : धान्य साठवणीचा मोठा शत्रू म्हणजे हवेतील बाष्प. हवेत आर्द्रता (बाष्पाचे प्रमाण) जितके अधिक, तितके धान्य खराब होण्याचा व सडण्याचा धोका अधिक असतो. ओलावा किंवा बाष्प असल्यामुळे धान्यावर किडे, जिवाणू व कवकांची वाढ सहजपणे होऊ लागते. धान्यातील कर्ब पदार्थांचे व प्रथिनांचे विघटन होते.

किड्यांचे मलमूत्र व अन्य उत्सर्जक पदार्थ, अंडी यामुळे धान्यांची प्रतवारी खराब होते. हे टाळण्यासाठी धान्याच्या कणगी किंवा गोदामांच्या भोवती कमीत कमी २ ते ३ मीटर त्रिज्येचा परिसर नेहमीच कोरडा राहील, अशी दक्षता घ्यावी. विशेषतः पावसाळ्यात अधिक सावधगिरी बाळगावी लागते.

पोती आणि कंटेनर : जुन्या गोण्यांचा वापर गहू साठवण्यासाठी वापर करण्यापूर्वी त्यात किडे किंवा त्यांची अंडी नसल्याची खात्री करावी. साठवणीसाठी वापरल्या जाणाऱ्या डबा किंवा कंटेनरला छिद्र असू नयेत. त्यातून नवीन कीटक शिरकाव करू शकतात.

उंदीर : हा आकाराचा लहान सस्तन प्राणी असला तरी तो जितके खातो, त्याच्या कितीतरी अधिक धान्य खराब करतो. तो उभे पीक आणि साठवणीचे धान्य दोन्हींचे नुकसान करतो. उंदरांचे मलमूत्र आणि केस धान्यांमध्ये मिसळल्यास धान्य खराब होते.

कीटक : गहू पिकावर प्रादुर्भाव करणाऱ्या किडींप्रमाणे काढणीच्या काळात धान्यावर अंडी घालणारेही अनेक कीटक आहेत. ही अंडी साठवणीमध्ये आल्यानंतर काही काळातच त्यातून पतंग किंवा सुरवंट बाहेर पडतात. अशा साठवणीतील कीटकांच्या सुमारे ५० प्रजाती असून, त्यापैकी अर्धा डझन प्रजाती आर्थिकदृष्ट्या मोठे नुकसान करणाऱ्या आहेत.

Insects in grain
Agriculture Irrigation : शरद उपसा सिंचन योजनेद्वारे शिवारापर्यंत पोहोचले पाणी

सुरक्षितपणे गहू साठविण्याचे काही मार्ग

देशाच्या सर्व भागांतील वातावरण आणि पर्यावरणाचा विचार करून धान्य संकलन आणि हाताळणीसाठी योग्य तंत्रज्ञान आणि साठवण संरचना विकसित करण्यात आल्या आहेत. काढणीनंतर धान्याचा वापर करण्यासाठी, धान्य साठवणुकीसाठी पारंपरिक आणि आधुनिक साठवण पद्धती वापरल्या जातात.

भारतात ६० ते ७० टक्के गहू कोठी, कुथला, बुखारी, धुसी, खानकी, लाकडी चेस्ट, बोरे, पुसा बीन, पंतनगर बीन, लुधियाना बीन, हापूर बीन आणि भूमिगत साठवणगृहात साठवला जातो. उर्वरित ३०-४० टक्के गहू भारतीय अन्न महामंडळ, केंद्रीय वखार महामंडळ किंवा राज्य वखार महामंडळाच्या मालकीच्या गोदामांमध्ये साठवला जातो.

त्यात ‘एफसीआय’ द्वारे विकसित केलेल्या स्वदेशी पद्धतीत सायलो आणि ‘कव्हर अँड प्लिंथ’ (CAP) यांचाही समावेश होतो. साठवणीच्या योग्य पद्धतीचा अवलंब करण्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे. त्यासाठी खालील बाबीचे पालन प्राधान्याने करावे. म्हणजे संभाव्य नुकसान टाळणे शक्य होते.

गहू चांगला वाळवून साठवावा

साठवण्यापूर्वी गहू नीट वाळवा. साठवणुकीसाठी गव्हाची आर्द्रता ८ ते १० टक्के असावी. त्यापेक्षा जास्त आर्द्रता धान्यांमध्ये असणार नाही, याची काळजी घ्यावी. कारण ८ ते १० टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असल्यास बियांमध्ये श्‍वसन प्रक्रिया वाढते.

परिणामी किडी व बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो. साधारणपणे पावसाळ्यात गव्हामध्ये सुरसी, खापरा, जाळे हे कीटक आढळतात. कारण पावसाळ्यातील जास्त आर्द्रतेमुळे गहू मऊ होऊन किड्यांना सहजपणे खाणे शक्य होते.

जुनी पोती कशी वापरायची?

गहू किंवा धान्य साठवणीसाठी शक्यतो नवीन गोणी वापराव्यात. जुनी पोती किंवा गोण्यांचा वापर करण्याची वेळ आल्यास, अशा गोण्या १ टक्का मॅलेथिऑनच्या द्रावणात १० मिनिटे बुडवून चांगल्या कोरड्या केल्यानंतरच वापराव्यात.

कोठी ३ ते ४ दिवस सूर्यप्रकाशात ठेवावी

गहू साठवणीच्या ठिकाणी ओलावा राहू नये, यासाठी लोखंडी कोठी/टाकी ३ ते ४ दिवस कडक उन्हात ठेवावी. या कडक उन्हामुळे कोठीतील किडी व त्यांच्या अवस्था नष्ट होतात. शक्यतो गहू घरापासून वेगळा साठवावा. शक्य नसल्यास धान्य घराच्या एका कोपऱ्यात थोड्या उंचावर साठवून ठेवावे.

टाकीत कडुलिंबाची पाने वापरणे

कमी प्रमाणात गहू साठवणीसाठी कडुलिंबाची पाने तळाशी एक किलो पसरून ठेवावी. त्यावर गहू भरून नंतर वरही कडुलिंबाची पाने पसरावीत. जास्त प्रमाणात गहू साठवण्यासाठी रासायनिक पद्धतींचा अवलंब करावा. त्यातही आधीच धान्याला किडीचा प्रादुर्भाव दिसत असेल, तर १० क्विंटल बियाण्यासाठी ॲल्युमिनिअम फॉस्फाइड ३ गोळ्या वापरल्या जाऊ शकतात.

Insects in grain
UPSC Success Story : शेतकरी कुटुंबातील विनयची ‘युपीएससी’मध्ये भरारी

साठवणुकीसाठी मूलभूत उपाययोजना

गहू सामान्य तापमानात पूर्णपणे वाळल्यानंतरच साठवावा. उच्च तापमानाचा बियाण्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो.

साठविलेल्या गव्हाचे सुरवंट, खापरा भुंगे, भुंगे इ. पासून संरक्षण करणे आवश्यक आहे. कारण ते गव्हाचे मोठे नुकसान करतात.

पीक कापणीसाठी संसर्गमुक्त साधने आणि उपकरणे वापरावीत.

साठवण खोलीमध्ये मॅलेथिऑन (४० मिलि), डी.डी.व्ही.पी. (४० मिलि), किंवा डेल्टामेथ्रीन (४० ग्रॅम) यांच्या साह्याने उपचार करावेत. २० मि.लि. मॅलॅथिऑन (५० टक्के प्रवाही) प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बंद कोठारात ३० ग्रॅम प्रति क्विंटल या प्रमाणात सेल्फोस भुकटीचा वापर करावा.

साठवण्याआधी, गहू तपासून कीटकांची उपस्थिती शोधावी. गव्हाला आधीच कीटकांचा प्रादुर्भाव झाला असेल, तर त्याला ॲल्युमिनिअम फॉस्फाइड (प्रति १० क्विंटल बियाण्यासाठी ३ गोळ्या) वापरून धुरीकरण करावे.

ओलाव्याचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी धान्याच्या गोण्या लाकडी फळ्या किंवा पॉलिथिन शीटवर ठेवाव्यात.

धान्य कोठी किंवा डब्यात साठवायचे असेल तर कोरड्या कडुलिंबाच्या पानांचा वापर करणे ही देखील एक प्रभावी पद्धत आहे. पण साठवणूक केल्यानंतर डब्याचे तोंड बंद करून हवाबंद करणे अत्यंत आवश्यक आहे.

धुरीकरणाच्या वेळी, फक्त उच्च दर्जाचे हवाबंद कव्हर, मल्टी-लेयर्ड कव्हर, मल्टी क्रॉस लॅमिनेटेड कव्हर वापरा. नवीन साठवणीच्या गव्हासोबत जुना गहू कधीही साठवू नका.

उंदीर नियंत्रित करण्यासाठी सापळ्यांसोबतच रासायनिक पद्धतींचा अवलंब करावा. एका गोष्टीवर अवलंबून राहू नये.

साठवणीनंतर दारे आणि खिडक्यांचे सांधे ओल्या मातीने व्यवस्थित बंद करा. वातानुकूलनासाठी योग्य ती रचना केलेली असावी.

एका गोदामात एकाच प्रकारचे धान्य साठवावे.

साठवणी दरम्यान खबरदारी

साठवणगृहातील धुरीकरणाचे काम शासकीय पातळीवर अधिकृत केलेल्या संस्था किंवा प्रशिक्षित व्यक्तीकडून करून घ्यावे. कारण साठवणीमध्ये वापरले जाणारे ॲल्युमिनिअम फॉस्फाइड (५६ टक्के) हे विषारी रसायन आहे.

धुरीकरणाचे ठिकाण निवासी क्षेत्रे, प्राणी आणि शयनकक्षांपासून दूर असावे. साठवणगृहाच्या सर्व खिडक्या आणि स्कायलाइट्स व्यवस्थित बंद करा आणि सील करा. मास्क आणि हातमोजे घालून गोळ्या ठेवून तुमचा श्‍वास रोखून त्वरित बाहेर पडावे. मागे दरवाजे घट्ट बंद करावेत.

धुरीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांना उघड्या हातांनी स्पर्श करू नये. धुरीकरणानंतर हात व तोंड साबणाने पूर्णपणे स्वच्छ करावेत.

साठवणुकीतील किडी

सोंडे किडे

वैशिष्ट्यपूर्ण सोंडेमुळे तिला ‘सोंडे भुंगेरे’ हे नाव पडले आहे. जास्त प्रादुर्भाव झाल्यास धान्यातील तापमान वाढते. या किडीची अळी व प्रौढ दोन्ही धान्यांचे नुकसान करतात. मादी कीटक धान्याच्या दाण्यावर शेतामध्येच एक एक अंडे घालते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी दाणे पोखरून उपजीविका करते. धान्याचे पीठ होते. प्रौढ भुंगेरे दाण्यावर गोलाकार छाप पाडून दाणे फस्त करतात.

दाणे पोखरणारी अळी किंवा टोपी भुंगेरे

या किडीची मादी भुंगेरे दाण्यावर अंडी घालतात. अळी दाण्यामध्ये शिरून दाणे फस्त करते. त्यामुळे फक्त टरफले राहतात. अळी प्रादुर्भावग्रस्त दाण्यामध्ये कोषावस्थेत जाते. प्रौढ भुंगेरे धान्याचे नुकसान करतात.

पतंग

या किडीची अळी फक्त साठवलेल्या धान्याचे नुकसान करते. ही अळी पांढऱ्या रंगाची असून, तिचे डोके पिवळे असते. अळी दाण्यावरील भेगांमधून दाण्यामध्ये प्रवेश करून आतील गाभा खाते. तिचे वास्तव्य नेहमी दाण्यातच राहते. ही कीड शेतामध्ये व साठवणीमध्येही दाण्याचे नुकसान करते. धान्य कोठ्या किंवा पोत्यामध्ये या किडीचा प्रादुर्भाव होतो.

खापरा भुंगेरे

या किडीची मादी दाण्यावर तसेच भिंतीवरील भेगांमध्ये अंडी घालते. अळी केसाळ असून ती दाणे पोखरते. परिणामी, दाण्याची टरफले शिल्लक राहतात. अळीच्या अंगावरील केस, शरीरावरील आवरण व विष्ठेमुळे धान्यास दर्प येतो.

बाजारमूल्य कमी होते. खापरा भुंगेऱ्यामुळे होणारे नुकसान गोण्या किंवा पोत्यातील धान्याच्या वरील थरामध्ये आढळते. हिवाळ्यात अन्न नसल्यास किंवा प्रतिकूल हवामानात या किडीच्या अळ्या सुप्तावस्थेत जातात. ही सुप्तावस्था चार वर्षापर्यंत टिकू शकते.

सिगारेट भुंगेरे

या किडीच्या अळीच्या अंगावर केस असतात. ही अळी धान्य व प्रक्रियायुक्त पदार्थामध्ये टाचणीच्या डोक्यासारखे गोलाकार छिद्र पाडून आतील अन्नावर उपजीविका करतात. धान्य व प्रक्रिया केलेल्या पदार्थाची प्रत खालावते.

पिठातील तांबडा/ लाल भुंगा

हे किडे व अळी प्रामुख्याने पिठावर आणि फुटलेल्या बियाण्यावर गुजराण करतात. न फुटलेले बियाणे ते खात नाहीत. या किडीमुळे साठवणुकीत दुर्गंध येते.

धान्याला छिद्र पाडणारा भुंगा

या किडीची अळी ही धान्याला वक्राकार छिद्रे पडलेली दिसतात. धान्यात मोठ्या प्रमाणात पीठ जमा झालेले दिसून येते. कधी कधी हे पीठ पोत्याच्या बाहेर सुद्धा आलेले दिसते.

डॉ. विजेंद्र एस. बाविस्कर, ८३७४१७४७९७

(कृषी विद्यावेत्ता, अखिल भारतीय समन्वित गहू संशोधन प्रकल्प, आनुवंशिक आणि वनस्पती पैदास विभाग, आघारकर संशोधन संस्था - महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com