
अॅग्रोवन वृत्तसेवा
Solapur News : गोकूळ दूध संघाच्या वतीने करमाळ्यातील या सौर प्रकल्पासाठी ३३ कोटी रुपये खर्च केला आहे. या प्रकल्पातून दैनंदिन साडेसहा मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. या विजेमुळे गोकुळ दूध संघाची महिन्याकाठी सुमारे ५० लाख रुपयांच्या विजेची बचत होणार आहे, याचा फायदा थेट गोकुळच्या सभासदांना होणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ) यांचा ओपन ॲक्सेस स्कीम अंतर्गत ६.५ मेगॅावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प लिंबेवाडी येथे स्वमालकीच्या १८ एकर जागेवर कार्यान्वित करण्यात आला असून, दूध संघाच्या ६२ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून या प्रकल्पाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार नारायण पाटील, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले व गोकुळचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते
मंत्री मुश्रीफ म्हणाले, की यापूर्वी सूर्यापासून सौर प्रकल्प करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आधुनिक तंत्रज्ञान वापरात नव्हते. परंतु आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सौर ऊर्जाचे अत्याधुनिक पॅनेल निघाले आहेत. त्यामुळे विविध क्षेत्रासाठी लागणाऱ्या वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात सौरऊर्जेचा वापर होत आहे.
पंतप्रधानांनी सूर्यघर योजना जाहीर केली आहे. तसेच राज्य शासनानेही सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेतला असून, शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा वीज पुरवठा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे, असे ते म्हणाले.
यावेळी आमदार पाटील म्हणाले, की रिटेवाडी उपसासिंचन या भागात कार्यान्वित केल्यास या भागातील बराचसा भाग हा बागायत क्षेत्राखाली येणार आहे. तसेच हा भाग जर बागायती क्षेत्राखाली आला, तर येथे होणारे स्थलांतर मोठ्या प्रमाणात रोखले जाणार असून रिटेवाडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच या भागात गोकूळ सौरऊर्जा प्रकल्प आपल्याबाबत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे आभार मानले. सहकारी दूध संघाचा देशातील पहिलाच प्रकल्प
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले, हा सौर ऊर्जेचा प्रकल्प करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी गावामध्ये १८ एकर माळरान जमिनीवर पुणे येथील एका खासगी कंपनीच्या सहकार्यातून उभा केला आहे. येथे तयार झालेली वीज महावितरण कंपनीला देण्यात आली आहे. यासाठी सुमारे १८ किलोमीटरपर्यंतची वीज जोडणी स्वत: दूध संघाने केली आहे. आतापर्यंत दूध आणि त्यापासून बनवणारे पदार्थ यांच्या विक्री आणि नफ्यातून गोकुळने प्रगती केली आहे. आता सौर ऊर्जा प्रकल्प करणारी गोकूळ ही देशातील पहिली सहकारी संस्था बनली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.