
भारतासारख्या कृषीप्रधान देशात इंधन समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. यामध्ये स्वयंपाकाच्या एलपीजी गॅसच्या किंमती तर दुप्पट झाल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच कुंटुंबांचं महिन्याचं बजेट विस्कटलं आहे. एलपीजी गॅसच्या (LPG Gas) किंमती वाढल्यामुळे ग्रामीण भागातील स्त्रिया पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्यास प्राधान्य देत आहेत. ग्रामीण भागातील स्त्रियांचा दिवसातील बराचसा वेळ स्वयंपाकासाठी इंधन गोळा करण्यात जातो. लाकूड, कोळसा, पिकाचा वाया जाणारा भाग आणि गोवऱ्या जाळून चुलीवर स्वयंपाक केला जातो. त्यामुळे स्त्रियांना आरोग्यासंबंधी विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये श्वसनाशी संबंधित विविध आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे. यावर उपाय म्हणून स्वयंपाकासाठी सौरचुलीचा (Solar Cooker) वापर केला तर कमी खर्चात चांगला उर्जेचा स्त्रोत उपलब्ध होईल.
आपल्याकडे सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे परंतु अजूनही आपण त्याचा पुरेसा वापर करत नाही. दैनंदिन कामासाठी आपल्याला सौरऊर्जा किफायतशीर ठरु शकते. यामध्ये प्रामुख्याने सौर दिवे, सौरकुकरचा वापर उपयोगी ठरणारा आहे. सौर ऊर्जेचा वापर करून अन्नपदार्थ शिजविणे, फळे, भाज्या किंवा अन्न, धान्य वाळवणे शक्य आहे. अन्न चुलीवर न शिजवता सौरचूल हा कमी खर्चाचा पर्याय उपलब्ध आहे. पारंपारिक उर्जेला पर्याय म्हणून अपारंपारिक ऊर्जा वापरणे आरोग्य तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने फायद्याचे आहे.
कशी असते सौरचूल/ सौर कुकर ?
- सौरचूल म्हणजे चारही बाजू व बूड बंद असलेली व वरच्या भागावर काचेचे झाकण असलेली पेटी. यामध्ये सूर्याची उष्णता शोषली किंवा जमा केली जाते. त्यामुळे त्यात ठेवलेल्या काळ्या रंगाच्या भांड्यातील भात, डाळ, बटाटे, रताळे वगैरे पदार्थ साधारण एक ते दोन तासात शिजतात.
- सौर कुकरमध्ये पाच व्यक्तींच्या कुटुंबाचे दोन वेळचे अन्न दिवसभरात सहजपणे शिजवता येते. त्यामुळे वार्षिक इंधन खर्चात बचत होते. आरोग्यासाठीही हे अन्न अधिक चांगलं असतं.
- सौरचूल विविध आकारात उपलब्ध आहे. स्थानिक कारागीर वापरून उपलब्ध साहित्यामधून घरच्या घरी देखील १००० ते २००० रुपये खर्चात ही सौरचूल बनवता येते.
सौरचुलीचा वापर करून अन्न कसे शिजवतात?
मोकळ्या, सावली नसलेल्या जागेवर सौरचूल सूर्यप्रकाशात ठेवावी. ह्या चुलीमध्ये अन्नाची भांडी ठेवण्यापूर्वी ही चूल किमान ४५ मिनिटे सूर्यप्रकाशात ठेवावी. म्हणजे ती अगोदरच गरम होऊन अन्न शिजण्यास कमी वेळ लागेल. चूल अशा स्थितीत ठेवा ज्यायोगे सूर्यकिरण आरशावरून परावर्तित होऊन ते काचेच्या झाकणावर पडतील. सौरचुलीचे झाकण उघडून भांडी आत ठेऊन झाकण बंद करावे. एकदा ही भांडी आत ठेवल्यानंतर मध्येच झाकण उघडू नये. अन्न शिजल्यानंतरच झाकण उघडावे. आतील भांडी खूप तापलेली असतात, कपड्यामध्ये धरून ती बाहेर काढावीत नाहीतर बोटे भाजतील.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.